Village Essay In Marathi: माझे गांव मराठी निबंध

Village Nibandh In Marathi: माणसाच्या जडणघडणी मध्ये त्याच्या घरातील व्यक्तींचा मोठा पगडा असतो. माणूस जिथे लहानाचा मोठा होतो, त्या भागातील प्रत्येक गोष्टींबद्दल त्याला प्रेम वाटत असते. असाच व्यक्तींच्या जिव्हाळ्याचा भाग म्हणजे प्रत्येकाचा गाव. प्रत्येकालाच आपले गाव कायम आकर्षित करत असते. माणूस शहरात राहून कितीही मोठा का होईना पण त्याला त्याचे गाव कायमच खुणावत असते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही आपणासाठी 100 ते 500 शब्दांमध्ये माझे गाव या विषयावर निबंध लिहिला

My Village Essay In Marathi

गाव म्हटलं की तिथं व्यक्तीची नाळ जुळलेली असणार हे स्वाभाविक आहे. आपल्या मातीशी कायम नाळ जोडून ठेवण्याचं काम आपलं गाव करत असतं. गाव म्हणजे जगलेलं बालपण, दोस्तांंबरोबर मज्जा मस्तीत घालवलेले क्षण, यांची साक्ष देणार.

एखाद्या सुवासिनी स्त्रीने हिरवा शालू नेसून उभं असावं त्याप्रमाणे माझं गाव भासतं. माझ्या गावात सर्वांनाच मुबलक शेती उपलब्ध आहे. शेतीमध्ये कष्ट करण्याला कोणीही लाजत नाही. माझ्या गावामध्ये सर्वजण अगदी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. माझ्या गावातील बहुसंख्य लोक हे शेतीवर आपली उपजीविका चालवतात. शेती हा प्रमुख धंदा असल्याकारणाने पशुपालन हा येथे जोडधंदा म्हणून चालत आलेला आहे.

माझ्या गावामध्ये ग्रामदैवताचे मोठे मंदिर आहे.माझ्या गावातून जीवनदायिनी नदी वाहते जी गावातील मनुष्य, प्राणी, पक्षी यांची तहान भागवत जाते. गावातील प्रत्येक व्यक्ती ही जीवाला जीव देणारी आहे. जेव्हा गावावर एखादे संकट कोसळते तेव्हा माझ्या गावातील लोक एकजुटीने त्यातून मार्ग काढतात. माझ्या गावामध्ये दरवर्षी ग्रामदेवतेच्या आशिर्वादाने यात्रा भरते. जेव्हा यात्रा असते तेव्हा आमचे सर्व नातेवाईक गावी येतात.

सर्वांसोबत यात्रेचा आनंद द्विगुणित होऊन जातो. गावातील वडीलधारे व्यक्ती आम्हाला यात्रेमागचे महत्व आणि यात्रा का साजरी होते हे समजून सांगतात. यात्रेमध्ये मुलांसाठी खास आकर्षण असते ते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे झुले. या झुल्यांमध्ये बसून मौजमजा करण्यात आम्ही सगळे दंग होऊन जातो. यात्रेमध्ये कुस्तीचा खेळ हे प्रमुख आकर्षण असते. कुस्ती खेळण्यासाठी लांब गावातील पहिलवान मंडळी देखील आपले कौशल्य दाखवायला यात्रेमध्ये येतात.

गावातील यात्रेमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू विकणारी दुकाने ही असतात. स्त्रिया या दुकानातून त्यांच्या आवडीच्या गोष्टी खरेदी करतात. माझ्या गावामध्ये सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखाना उपलब्ध आहे. गावामध्ये टपालखाते आहे, गावामध्ये मोठी शाळा आहे. रोज शाळेत मुले गणवेशामध्ये जातात तेव्हा आमच्या गावाचे उज्ज्वल भविष्यच चालत आहे असा भास होतो. आमचे गाव सरकारी योजना अंमलात आणून त्यातून गावाचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी कायम प्रयत्नशील असते.

माझ्या गावातील श्री हालसिद्धनाथ महाराजांचे मंदिर हे गावातील प्रमुख आकर्षण आहे. महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून लोक सतत येत असतात. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या कामाची सुरुवात ही सकाळी मंदिरात जाऊन महाराजांचे दर्शन घेऊनच होते. देवाचा भंडारा भाळी लावून प्रत्येक व्यक्ती कृतज्ञता भावाने दिवसाची सुरुवात करतो. सायंकाळी देवळांमध्ये आरती केली जाते. नगारा वाजवला जातो.

देवळामध्ये एक वेगळ्याच प्रकारची मनशांती लाभते. देवळाचा परिसर हा प्रचंड मोठा आहे त्यामुळे तिथे लहान मुले सहजपणे बागडतात. देवळात गेल्यावर तिथून पाय निघवतच नाही. माझ्या गावामध्ये देवळाच्या बाजुला पाण्याचे तळे आहे. या पाण्याच्या तळ्यामध्ये लहान मुले कितीतरी वेळ जलक्रीडा करत असतात. असा हा नयनरम्य भाग मनाला खूप आल्हाददायक वाटतो.

माझ्या गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा वडाची मोठी मोठी झाडे आहेत, त्यावर लटकणाऱ्या पारंब्या आपली मुळे जमिनीत रुजवून वटवृक्षात रूपांतरित होत राहतात. निसर्गाशी नाळ घट्ट ठेवली, जमिनीवर पाय ठेवून राहिलो तर आपण ही वटवृक्षासारखे महान होऊ हा संदेश जणू काही त्या पारंब्या देत असतात. गावामध्ये पशुपालन हा जोडधंदा असल्या कारणाने बैल,गाई, म्हशी, शेळी,मेंढी आणि कोंबडी हे प्राणी सर्वत्र आढळून येतात. या प्राण्यांच्या सहवासामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा जाणवतो.

हे प्राणी देखील माणसाला जीव लावतात. पावसाळा जवळ आला की शेतकरी राजा या प्राण्यांच्या चाऱ्याचे नियोजन करण्यात व्यग्र होतो.
मी स्वतःला खूपच भाग्यशाली समजतो की निसर्गाने भरभरून दान दिलेल्या माझ्या वैभवशाली गावामध्ये मी राहतो. प्रत्येक जन्मी मला याच गावात जन्म मिळावा अशी प्रार्थना मी देवाजवळ करत असतो.

Village Essay Marathi In 10 Lines

  1. माझं गाव म्हटलं की मला आठवते ती हिरवाईने नटलेली शेती, झुळझुळ वाहणारी नदी .
  2. माझ्या गावाला भरपूर निसर्गसंपन्नता लाभलेली आहे.
  3. माझ्या गावामध्ये निरनिराळ्या प्रकारची पिके घेतली जातात.
  4. माझ्या गावामध्ये शाळा, मंदिर, दवाखाना आणि सरकारी कार्यालय आहे.
  5. माझ्या गावामध्ये दरवर्षी मोठी यात्रा भरते ज्यामध्ये सामील होण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येत असतात.
  6. माझ्या गावाला राज्य सरकारकडून आदर्श ग्राम हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
  7. अनेक सरकारी योजना गावाने अंमलात आणून त्याद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साध्य केला आहे.
  8. माझ्या गावामध्ये अबाल, वृद्ध सर्वजण आनंदने राहतात,
  9. माझ्या गावामध्ये तंटामुक समिती स्थापन करण्यात आली आहे जेणेकरून कोणत्याही वादावर तात्काळ निवारण केले जाते.
  10. असा हा माझा गाव मला खूप आवडतो माझ्या गावावर माझे फार प्रेम आहे आणि माझ्या गावाचा मला अभिमान वाटतो.

मित्रांनो, तुम्हाला आम्ही लिहिलेला माझा गाव या विषयावरील निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील निबंधांसाठी आमच्या साईट ला नक्की भेट द्या. पुढच्या वेळी तुमच्यासाठी असेच नवनवीन विषय घेऊन यायला आम्हाला खुप आवडेल.
धन्यवाद!

Leave a Comment