Grandfather Essay In Marathi: माणसाच्या जडणघडणीत त्याच्या घरातील व्यक्तींचा फार मोठा वाटा असतो. घरामध्ये वडीलधारी माणसे असली तर त्या घराला घरपण येते. घर म्हणजे निव्वळ भिंती नव्हे तर प्रेमाने विणलेल्या नात्यांची गुंफण असते.घरातील एक हवहवसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे घरातील आपल्या सर्वांचे लाडके आजोबा. घरातील आजोबा म्हणजे आपले मित्र. कोणतीही गोष्ट आपण हक्काने आजोबांना सांगू शकतो त्यांच्याकडून मागून घेऊ शकतो. इतकी निर्भयता आजोबांच्या नात्यांमध्ये आढळते. आज आपण माझे आजोबा या विषयावर आधारित 100 ते 500 शब्दांचा निबंध पाहणार आहोत. माझे आजोबा या विषयावर दहा ओळीत निबंध लिहिण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे.
Grandfather Essay In Marathi | माझे आजोबा निबंध
आजोबा म्हणजे कोण? आजोबा म्हणजे नातवंडांच्या इवल्याशा पावलांची चाहूल लागताच स्वतःच्या आतील बालपण खळखळून जगणारे व्यक्तिमत्व. स्वतःच आयुष्य कर्तव्याच्या आड हरवून बसलेले आजोबा जेव्हा नातवंडांना पाहतात ना तेव्हा ते पुन्हा एकदा लहान होऊन आपल्या नातवंडांसोबत खेळतात, हसतात. माझे आजोबा असेच आहेत माझ्या आनंदात स्वतःचा आनंद मानणारे. माझ्या आजोबांचं शरीर जरी थकलेलं असेल तरी त्याचं मन मात्र कायम प्रफुल्लीत असतं आणि तेच माझे स्फूर्तीस्थान आहेत. माझ्या आजोबांचं वय जवळपास सत्तर वर्षे असेल त्यांनी आजवर कितीतरी उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत आणि त्यांचा हाच अनुभव ते आम्हाला वेळोवेळी सांगतात.
माझे आजोबा हे पेशाने शेतकरी आहेत. आजवर त्यांनी आपली आणि घरातील इतर सदस्यांची गुजराण शेतीवर केली आहे. शेतकरी म्हणून शेतजमिनी आणि पीकपाणी याबद्दल त्यांचा अनुभव खूपच मोठा आहे. त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून ते आम्हाला शेतीबद्दल आजपण वेळोवेळी जागरूक करत असतात.
शेतीमध्ये कोणते पीक घेतले पाहिजे त्यासाठी कोणते बियाणे वापरले पाहिजेत याबद्दलचा त्यांचा फारच गाढा अभ्यास आहे. शेतीमध्ये वापरली जाणारी खते देखील जास्तीत जास्त नैसर्गिक असावीत यावर त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. शेणखत, गांडूळखत वापरणे आणि त्यातून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे हा त्यांचा मूळ उद्देश असतो. मला ते नेहमी निसर्गाबद्दल कृतज्ञ कसे राहिले पाहिजे हे आवर्जून सांगतात.
स्वतःला मिळालेला ठेवा आपल्या पुरता न वापरता आपल्या पुढच्या पिढी साठी तो जतन करून ठेवला पाहिजे असा माझ्या आजोबांचा जीवनाविषयी निःस्वार्थी दृष्टिकोन आहे. त्यांची ही शिकवण आम्ही सारी भावंडे आचरणात आणण्याचा कायम प्रयत्न करत असतो. माझे आजोबा ज्याप्रमाणे शेतीविषयक सर्व माहिती जाणतात त्याचप्रमाणे आपली नातवंडे भरपूर शिकावीत याकरता कायम तत्पर असतात.
आम्ही आमचे शालेय शिक्षण व्यवस्थित करतो की नाही यावर देखील त्यांचे पूर्ण लक्ष असते. कधी कधी ते आवर्जून आमच्या शाळेत भेट देतात आणि गुरुजींकडे आमच्या अभ्यासातील प्रगतीबद्दल विचारपूस करत असतात. आम्हाला वही, पेन, पुस्तके यांपैकी कशाचीही कमतरता भासू देत नाहीत.
माझे आजोबा माझ्यासाठी माझे दैवतच आहेत. माझे आजोबा कायम आमच्यावर चांगले संस्कार करतात. माझ्या आजोबा आम्हाला चांगले वागा असे केवळ सांगत नाहीत तर स्वतःही तसेच आचरण करतात म्हणूनच मला ते फार आवडतात. माझे आजोबा वारकरी आहेत.
माझ्या आजोबांच्या मुखात कायम विठुरायांचे नाव असते. मंदिरामध्ये जेव्हा आजोबा अभंग म्हणतात तेव्हा सर्वजण अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात.माझे आजोबा कायम पंढरपूरची वारी करतात. माझे आजोबा जेव्हा वारीला जातात तेव्हा तेव्हा ते येताना आमच्या सर्वांना काही ना काही भेटवस्तू घेऊन येतात. कायम दुसऱ्यांसाठी जगणे हे माझ्या आजोबांचे ब्रीदवाक्य आहे.
माझे आजोबा आज या वयात देखील तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने काम करतात. आज देखील ते शेतात जाऊन काम करतात. थांबला तो संपला हा निसर्गाचा नियम ते जाणतात. माझ्या आजोबांना बैलगाडा शर्यती पाहायला फार आवडतात. त्यांच्या तरुणपणी देखील त्यांनी अनेक शर्यती स्वतः गाजवल्या आहेत. त्यांना शर्यती मध्ये मिळालेली बक्षिसे पाहून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
माझे आजोबा हे अगदी पट्टीचे पोहणारे आहेत. त्यांनी त्यांच्याप्रमाणेच आपल्या मुलांना आणि नातवंडांना देखील पोहण्यामध्ये आवड निर्माण केली आहे. पोहायला शिकणे म्हणजे फक्त एक कला नाही तर स्वसंरक्षणाचे ते एक साधन देखील आहे हे त्यांनी आम्हाला पटवून दिलेले आहे.
माझे आजोबा हे आमच्यासाठी कायमच धावून येतात . मी जर कधी फारच निराश वाटत असेन तर मला ते त्यातून बाहेर काढण्यासाठी निरनिराळ्या कथा सांगून माझे मनोरंजन करतात आणि मग आपसुकच मनातील निराशा निघून जाते.
मला देवाकडून मिळालेली सगळ्यात अनमोल देणगी म्हणजे माझे आजोबा आहेत. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी मी कायम प्रार्थना कर असते. असे हे माझे आजोबा म्हणजे मनुष्याच्या देहातील परमेश्वरच जणू!
My Grandfather Nibandh In Marathi In 10 Lines
- प्रत्येकाच्या आयुष्यात एक हळवा कोपरा असतो तसाच माझ्या आयुष्यात देखील आहे ते म्हणजे माझे आजोबा.
- माझ्या आजोबांवर माझे खूप प्रेम आहे.
- माझे आजोबा हे माझ्या मित्राप्रमाणे मला कायम साथ देतात त्यामुळे मला ते कायम आपलेसे वाटतात.
- माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर माझे आजोबा मला न ओरडता माझी चूक मला समजून सांगतात जेणेकरून मला माझी चूक तर समजतेच पण त्याचबरोबर त्यातून ते मला चांगला उपदेश ही करतात.
- माझे आजोबा हे माझ्यासाठी देवतुल्य आहेत कारण त्यांच्या चांगल्या शिकवणुकीमुळे मी घडत गेले आहे.
- माझ्या आजोबांनी मला कायमच लोकांच्या भल्याचे विचार करावा आणि निःस्वार्थी रहावे असा मोलाचा सल्ला दिला आहे.
- माझ्या आजोबांना गावामध्ये खूप मान आहे जो त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवलेला आहे.
- माझे आजोबा हे वारकरी संप्रदायातील आहेत त्यामुळे त्यांच्या मुखात कायम भगवंताचे नाम असते.
- माझे आजोबा आजदेखील सकाळी लवकर उठून त्यांची दिनचर्या सुरू करतात.
- माझ्या आजोबांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आजवर भरपूर माणसं जोडलेली आहेत.
मित्रांनो प्रत्येकाच्या नशिबात असे एकतरी आजोबा असतात ज्यांनी त्याचं बालपण पुन्हा एकदा नातवंडासोबत जगलेल असतं, तुम्हाला आमचा आजचा हा माझे आजोबा या विषयावर निबंध लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे. असेच नवनवीन विषयांवरील लेख वाचण्यासाठी आम्हाला अभिप्राय देत जा. धन्यवाद!