My Mother Essay In Marathi: असं म्हणतात की या पृथ्वीतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाची परमेश्वराला अत्यंत काळजी असते. परमेश्वर मात्र त्या प्रत्येक सजीवाजवळ राहू शकत नाही म्हणूनच त्यांनी आई निर्माण केली असे म्हटले जाते. आई रुपी परमेश्वर देवाने प्रत्येक व्यक्तीच्या भाग्यात लिहिलेला आहे. अशाच आपल्या प्रेमळ माऊली वर आपल्या आई वर आधारित निबंध आपण आपल्या निबंध मालिकेत लिहिला आहे.
My Mother Essay In Marathi: माझी आई निबंध मराठी
‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’, हे वाक्य आपणा सर्वांनी ऐकले असेलच. या जगाला चालवणारा परमेश्वर देखील सामान्य लोकांपुढे अगदी केविलवाणा भासतो कारण त्याच्याजवळ आई नाही. आईसारखे दैवत साऱ्या जगामध्ये शोधून ही सापडणार नाही.
माझ्यादेखील आईविषयी मला हेच वाटते की ती माझे दैवत आहे. माझी आई माझे सर्वस्व आहे. माझी आई मला फार फार आवडते. मी आज जे काही आहे त्यामागे माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. माझी आई मला नेहमीच माझ्या कामामध्ये प्रोत्साहन देत असते. आज ही जेव्हा मला एखादी समस्या जाणवते तेव्हा माझी आई मला त्यावर समाधानकारक तोडगा शोधून देण्यात कायम अग्रेसर असते.
माझ्या आईचे नावं संगीता आहे. तिच्या नावाप्रमाणेच तिने आमच्या आयुष्यात संगीत भरलेलं आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. माझी आई रोज सकाळी लवकर उठते जेव्हा घरातील इतर सर्व जण झोपलेले असतात. सकाळी उठून दिनचर्या आटपून ती सर्वप्रथम स्वयंपाकाला लागते.
आमच्या शाळेचे डब्बे तयार करणे बाबांचे जेवण तयार करणे हे तिचे नित्याचे काम आहे. माझ्या आईमुळे आम्हाला छान छान जेवण जेवायला मिळते. माझ्या आईच्या हातचे जेवण म्हणजे माझ्यासाठी जणू काही अमृतच! जेव्हा केव्हा मी आईपासून दूर असते तेव्हा तिच्या प्रेमळ हाताने बनवलेल्या स्वयंपाकाची कमी मला कायम जाणवत राहते. अशी ही माझी आई म्हणजे जणू काही अन्नपूर्णाच…
मी अभ्यास करत असताना मला जर एखादे गणित सुटत नसेल तर मी माझ्या आईकडून मदर घेते. माझी आई सुद्धा तिच्या हातातील कामे बाजूला ठेवून सर्वात आधी माझ्या अभ्यासावर भर देत राहते. माझ्या आईकडे एखादा विषय शिकवण्याची जबरदस्त हातोटी आहे. जेव्हा माझी आई मला एखादा विषय समजून सांगते तेव्हा मला तो लगेचच समजतो. कोणतीही गोष्ट विनातक्रार करणे हे माझ्या आईचे कौशल्य आहे.
माझी आई स्वतः जास्त शिकलेली नाही पण आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. माझ्या आईने आम्ही भावंडे शिकावीत यासाठी स्वतःच्या गरजांना आणि हौसेला देखील मुरड घातली आहे. माझी आई स्वतः शेतात राबते आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नामधून ती आमचे शिक्षण पूर्ण करते. मोठे होऊन मला माझ्या आईला ते सगळ द्यायचं आहे ज्याचा त्याग ती आता आम्हा सर्वांसाठी करत आहे.
शिक्षणासोबतच आमच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत याकडे तिचे डोळसपणे लक्ष असते. आम्ही भावंडे कायम चांगल्या लोकांच्या संगतीत राहिली पाहिजेत यावर तिचा भर असतो. आम्ही जर कधी एखाद्या वाईट व्यक्तीच्या संगती मध्ये आहोत असे तिला जाणवले तर ती आम्हाला त्याबद्दल ओरडते देखील. वेळप्रसंगी कठोर होऊन आपल्या मुलांना सरळमार्गावर आणण्याकरता ती कायम तत्पर असते.
माझी आई सर्व सण अगदी उत्साहाने साजरे करते त्याचबरोबर आपल्या भारतीय परंपरा सर्व मुलांना देखील माहिती असायला पाहिजेत हा तिचा नेहमी आग्रह असतो. माझी आई आम्हाला प्रत्येक सणामागे लपलेला अर्थ आणि त्या सणाचे महत्व आम्हाला सांगते. सणानिमित्त जे पदार्थ तयार करायचे असतात त्यांची पाककला ती आम्हाला शिकवते त्याचबरोबर कोणताही पदार्थ खाताना तो आवडीचा, नावडीचा असे न करता सर्व पदार्थ खाल्ले पाहिजेत असा तिचा आग्रह असतो.
आईने दिलेल्या या शिकवणुकीमुळे मी अन्नाचा कधीही अनादर करत नाही. जे अन्न आपण जेवतो ते परमेश्वराचा आशीर्वाद असे समजून ग्रहण केले पाहिजेत अशी तिची शिकवण आहे.
माझी आई आम्हा भावंडांना कायम समानतेने वागवते. ती स्वतः त्या गोष्टी आचरणात आणते आणि मगच लोकांना वागणुकीचे सल्ले देते . लोकांना फक्त उपदेश करून सोडून देणे असा तिचा स्वभाव नाही. माझी आई पुरोगामी विचारसरणीची आहे.आजच्या काळात मुलामुलींनी खांद्याला खांदा लावून संसार केला पाहिजे अशा विचारांची ती आहे.
कुठलीही स्त्री ही पुरुषांपेक्षा कमी नाही किंबहुना ती आत्मनिर्भर असली पाहिजे हे माझ्या आईचे विचार आहेत. माझ्या आईच्या या स्वावलंबी विचारांमुळे मी देखील असेच बनण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून माझ्या आईला माझा अभिमान वाटेल.
माझी आई आजही स्वतःची कामे स्वतः करते. डेअरी मध्ये जाऊन दूध घेऊन येणे, दुकानात जाऊन सामान आणणे, घरातील आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवणे, मुलांच्या अभ्यासाकडे काटेकोरपणे लक्ष देणे, घरातील कोणी आजारी पडू नये या करता सुरुवातीपासूनच सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणे अशी एक ना अनेक कामे माझी आई विनामोबदला करत असते. माझी आई ही सगळी कामे आमच्यावरील प्रेमाखातर करत असते.
आजही माझ्या आई मध्ये एक लहान मुलगी दडलेली आहे ती जेवढी कठोर आहे तेवढीच खेळकर देखील आहे. ती आमच्याशी खेळताना आमच्याप्रमाणेच होऊन जाते तेव्हा खूप छान वाटतं. अशी माझी ही प्रेमळ आई मला देवाने दिली आहे. माझ्या आईवर माझे खूप खूप प्रेम आहे.
Majhi Aai Nibandh In Marathi 10 Lines
- माझी आई ही केवळ आई नाही तर माझी मैत्रीण देखील आहे.
- माझी आई केवळ यशामध्ये नाही तर माझ्या अपयशामध्ये देखील माझ्या मागे खंबीरपणे उभी असते.
- माझी आई आम्हा भावंडांना कायम नवनवीन गोष्टी शिकवत असते.
- माझी आई ही आम्हाला देवाच्या कथा सांगते त्याचप्रमाणे रोज सायंकाळी देवापुढं आवर्जून प्रार्थना करायला लावते.
- माझी आई जरी स्वतः कमी शिकली असली तरी ती आम्हाला शिक्षण देण्याबद्दल कायम जागरुक असते.
- माझी आई माझ्यावर कायम चांगले संस्कार व्हावे यासाठी प्रयत्नशील असते.
- माझ्या आईवर माझे खूप प्रेम आहे कारण ती मी एक चांगली व्यक्ती व्हावी यासाठी कायम प्रयत्न करत असते.
- माझी आई फार सुगरण आहे तिच्या हातचे जेवण फारच छान असते
- माझी आई मला कायम मी शिकून स्वतःच्या पायावर उभे रहावे याकरता प्रेरित करत असते.
- माझी आई म्हणजे मायेचा महासागर आहे जो माझ्या आयुष्याचा फार मोठा आधार आहे.
आपल्या सर्वांसाठी आज आम्ही माझी आई या विषयावर 100 ते 500 शब्दांत निबंध लिहिला आहे त्याचबरोबर 10 ओळींमध्ये देखील आई विषयावरील निबंध लिहिला आहे. आपणास हे निबंध कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. धन्यवाद!