Majhe Baba Nibandh In Marathi: जसे निसर्गामध्ये पर्वतांचे एक अढळ स्थान आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक पर्वताप्रमाणे अढळ व्यक्तिमत्व असते ते म्हणजे आपले वडील. आयुष्यात कितीही वादळे येऊ आपल्याला त्या वादळांची झळ न लागू देता कायम सावली देण्याचं काम हे पर्वत करत असतो. म्हणूनच आज आपण या पर्वतासारख्या ताकदवान आणि लोण्याहूनही मऊ असे माझे बाबा या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध पाहणार आहोत.
My Father Essay In Marathi: माझे बाबा निबंध मराठी
‘ देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई, पूजा रोज करितो त्यांची, अन्य देव नाही. ‘ या कवितेच्या ओळींप्रमाणे जर आपले आचरण राहिले तर तर आयुष्यात सुख आणि समाधान दोन्ही नांदेल यात शंकाच नाही. आईची थोरवी जर फार मोठी आहे मात्र आज मी माझ्या बाबांबद्दल काही गोष्टी लिहिणारा आहे.
कायम सर्वांचा विचार करत जगणारे माझे बाबा!खरंच जशी आई थोर आहे तसेच माझे बाबा देखील थोर आहेत. माझे बाबा बाहेर फणसासारखे काटेरी आहेत आणि आतून गऱ्यांसारखे गोड आहेत. माझे बाबा म्हणजे माझी शक्ती स्थान आहे. जर माझी आई ही मी जन्मल्यानंतर माझ्यावर प्रेम करणारी पहिली व्यक्ती असेल तर माझ्या जन्मानंतर फक्त माझाच विचार करणारे आणि माझ्यासाठी रात्रंदिवस एक करून राबणारे एकच व्यक्ती आहे ते म्हणजे माझे बाबा.
माझे बाबा हे पेशाने सैनिक आहेत. सैनिक असल्याकारणाने त्याप्रमाणे त्यांच्या अंगी शिस्त मुरलेली आहे. आम्हाला देखील शिस्तीचे महत्व वेळोवेळी ते पटवून देत असतात. रोज सकाळी लवकर उठून त्यांची दिनचर्या ची सुरुवात होते. रोज व्यायाम केला पाहिजे हे नियम त्यांनी आम्हाला घालून दिलेले आहेत.
माझे बाबा हे सैनिक असल्याकारणाने माझ्या घरचे वातावरण पूर्णपणे शिस्तीचे आहे. आम्ही मुलांनी कायम देशहिताचा विचार केला पाहिजे अशी शिकवण माझे बाबा आम्हाला रोज देत असतात. माझे बाबा हे लवकर जबाबदारी मिळाल्यामुळे घरात वयाने लहान असून देखील खूप लवकर कष्ट करण्यासाठी घराबाहेर पडले. माझ्या बाबांनी आम्हाला कायमच खूप प्रेम दिले आहे. प्रेमाबरोबरच आम्ही जर कुठे चुकत असू तर धपाटेही दिले आहेत.
माझे बाबा आमच्या शिक्षणाविषयी नेहमी जागरूक असतात. जेव्हा शाळेमध्ये पालकांना बोलावले जाते तेव्हा माझे बाबा आवर्जून शाळेला भेट देतात. आपल्या पाल्याची शाळेमध्ये वागणूक कशी आहे याबद्दल माझे बाबा कायम दक्ष असतात. माझ्या बाबांनी आजवर आम्हा भावंडांमध्ये कुठलाही भेदाभेद केला नाही.
आम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी माझे बाबा खूप कष्ट करतात. माझ्या बाबांच्या कष्टाची मी नेहमीच जाणीव ठेवते. जेव्हा माझे बाबा कामावरून थकून घरी येतात तेव्हा आम्ही सर्वजण त्यांना आराम देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
माझे बाबा माझ्या आईची ही व्यवस्थित काळजी घेतात. जेव्हा माझी आई खूप थकलेली असते तेव्हा माझे बाबा तिला आराम करायला सांगतात. माझ्या आईला स्वयंपाक कामामध्ये आणि इतर घर कामांमध्ये देखील माझे बाबा मदत करतात. आमच्या बाबांकडे पाहून आम्हाला कायमच अभिमान वाटतो कारण ते त्यांच्या जीवनसाथीची साथ प्रत्येक कामामध्ये देतात. माझे बाबा एक आदर्श बाबा आहेत.
माझे बाबा निव्वळ चांगले संस्कार करतात असे नाही तर स्वतःच्या आचरणातून देखील आम्हाला कसे वागले पाहिजे याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. माझे बाबा दुकानात जाऊन भाजीपाला घेऊन येतात आणि ही अशी कामे करताना ते आम्हाला देखील ही कामे कशी केली पाहिजेत याबद्दल कायम शिकवत असतात.
जेव्हा माझ्या बाबांना कामावर सुट्टी असते त्या दिवशी आमचे बाबा आमच्याशी मनसोक्त खेळतात. बाबांच्या सुट्टीच्या दिवशी आम्हा मुलांची मात्र चांगलीच चांदी असते. आमचे बाबा आमच्याबरोबर लहान होऊन खेळ खेळतात. तेव्हा मला असे वाटते की हेच का ते माझे बाबा जे एरवी आम्ही व्यवस्थित राहावं म्हणून आमच्यावरती शिस्त लादत असतात मात्र जेव्हा वेळ असते तेव्हा आमच्याबरोबर आमचे मित्र होऊन जातात.
माझे बाबा म्हणजे माझं आभाळ आहे. माझ्या बाबांच्या छत्रछायेखाली मला एकदम सुरक्षित वाटतं. जेव्हाही माझ्यावर कुठलं संकट येतं तेव्हा मला सर्वात आधी माझ्या बाबांची आठवण येते. मला कायम वाटतं की मला या संकटातून माझे बाबाच बाहेर काढतील. असे म्हटले जाते की जेव्हाच संकट छोटे असते तेव्हा आपल्याला आई आठवते आणि जेव्हा संकट फार मोठे असते तेव्हा आपल्याला बाबा आठवतात माझ्या बाबतीतही असंच आहे.
आई आपल्या जीवनाचा पाया असते हे मान्य आहेच पण त्याचबरोबर बाबा हे देखील आपल्या आयुष्याचा कळस असतात हेही तितकच खरं आहे. माझे बाबा आम्ही सुदृढ राहावे यासाठी कायम प्रयत्नशील असतात. माझे बाबा स्वतः व्यायाम करतात आणि आम्हा भावंडांना सुद्धा ही चांगली सवय त्यांनी लावलेली आहे. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालून आम्ही व्यायामाची सुरुवात करतो. थोडा वेळ आम्ही चालून येतो.
या व्यायाम प्रकारांमुळे शरीर खूप ताजेतवाने होऊन जाते आणि त्याचबरोबर मन देखील प्रसन्न होत असते. माझ्या बाबांनी मला दिलेलं हे सुंदर आयुष्य मला कायम त्यांच्या सेवेत घालवायचं आहे. माझ्या बाबांना माझा अभिमान वाटेल असं कर्तुत्ववान काम मी करून दाखवणार आहे. जेव्हाही मला कोणत्या क्षेत्रात यश मिळतं तेव्हा माझ्या बाबांची छाती अभिमानाने फुलून जाते.
माझ्या बाबांना असं खुश झालेलं पाहून मला अजून चांगलं काम करण्याची स्फूर्ती मिळते. आज मी आयुष्यात जे काही कमावत आहे ते केवळ आणि केवळ माझ्या बाबांमुळे. मी माझ्या बाबांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांसाठी कायमच कृतकृत्य राहील.
My Father Nibandh Marathi 10 Lines
- माझ्या मनामध्ये ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ असे एका व्यक्तीचे स्थान आहे ते म्हणजे माझे बाबा.
- माझे बाबा पर्वताप्रमाणे अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी कायम उभे राहतात.
- माझे बाबा हे स्वभावाने अगदी शिस्तीचे आहेत पण त्याचबरोबर ते आमच्या सोबत खेळकर देखील असतात.
- माझे बाबा माझ्या आईला घर कामात मदत करतात.
- माझे बाबा आमच्यावर कायम चांगले संस्कार होतील याकडे लक्ष देऊन असतात.
- माझ्या बाबांचे आमच्या भावंडांवर खूप प्रेम आहे.
- आमच्या शालेय जीवनामध्ये काय घडामोडी होत असतात यावर माझ्या बाबांचे बारीक लक्ष असते.
- माझे बाबा हिंदू पारंपारिक सण अगदी आनंदाने साजरी करतात आणि त्याविषयीची माहिती आम्हा भावंडांना वेळोवेळी देत असतात.
- माझ्या बाबांना शेती करायला खूप आवडते आणि ते आम्हाला शेतीतील पीक पिकांविषयी वेगवेगळे ज्ञान कायम देत असतात.
- माझे बाबा माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत आणि माझ्या बाबांवर माझे फार प्रेम आहे.
मित्रांनो आज आपण माझे बाबा या विषयावर 100 ते 500 शब्द आणि दहा ओळींमध्ये निबंध पाहिला आहे. बाबा म्हटलं की आपसूकच एक आधार डोळ्यासमोर येतो. आपल्याला आम्ही लिहिलेले हे निबंध कसे वाटले हे अभिप्राय देऊन नक्की कळवा. अशाच नवनवीन विषयांवरील निबंध वाचण्यासाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या धन्यवाद!