Raksha Bandhan Essay In Marathi: रक्षा बंधन निबंध मराठी १००० शब्द ते १० ओळींमध्ये

Raksha Bandhan Essay In Marathi: कोणतीही नातं हे क्षुल्लक नसतं.नातं मग ते कोणतेही असू त्याच्यामागे कितीतरी मोठा अर्थ दडलेला असतो. आई वडिलांचं नातं, बाप लेकीच नातं, माय लेकाच नातं. असच एक घट्ट आणि पवित्र नातं म्हणजे भाऊ आणि बहिणीच नातं. या नात्याची वीण अजूनच घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज आपण रक्षाबंधन या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध लिहिलेला आहे तसेच दहा ओळींमध्ये देखील निबंध उपलब्ध आहे. चला तर मग पाहुयात.

Raksha Bandhan Essay In Marathi | रक्षा बंधन मराठी निबंध

रक्षाबंधन हा केवळ सण नाही तर ही नात्यांची गुंफण आहे. ही गुंफण भावाला आणि बहिणीला कायम एकमेकांसोबत जोडून ठेवते. आई वडील यांच्यानंतर जगात सर्वात जवळच नातं म्हणजे भावा बहिणीच पवित्र नातं असत. या नात्यामध्ये जी रंगत काळानुसार चढत जाते ती जगण्याला एका वेगळ्याच आयामात घेऊन जाते.

बहीण भाऊ म्हटलं की राग लोभ हा येतोच पण शेवटी जे शिल्लक राहत ते म्हणजे निस्सिम प्रेम आणि लळा. भारतीय परंपरेमध्ये तर भावा बहिणीच नातं म्हणजे अगणित प्रेम. ज्ञानेश्वर आणि मुक्ताई भावा बहिणीच्या नात्याच एक अनमोल उदाहरण.

जिथे भाऊ निराश होतो आणि हार मानून गप्प बसतो तेव्हा तिथे मुक्ताई रुपी बहीण भावाला त्याच्या अंतर्मनातील आवाज ऐकायला प्रेरित करते आणि त्याला नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करते. प्रत्येक भावाच्या आयुष्यात एक मुक्ताई रुपी बहीण पाहिजेच.

आज या जगामध्ये प्रत्येक बहिणीला समजून घेणाऱ्या एका भावाची नितांत गरज आहे. आजचा काळ हा कलियुगाचा आहे. इथे स्त्री सुरक्षित नाही असे म्हटले जाते पण जर कृष्णरूपी भाऊ असेल तर कधीच कुठल्या बहिणीला या जगामध्ये असुरक्षित वाटणार नाही. मी इथे मुद्दाम श्रीकृष्णाचे उदाहरण दिले आहे कारण रक्षाबंधन या सणामागे महाभारतातील एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.

जेव्हा महाभारतातमधे द्रौपदी ला भर सभेमध्ये दुःशासन विवस्त्र करण्यासाठी टपलेला होता तेव्हा तिने सभामंडपातील सगळ्या शूरवीरांना स्वतःला वाचविण्यासाठी आवाहन केले मात्र एक ही शूर वीर तिला वाचवण्यासाठी पुढे धजवला नाही शेवटी द्रौपदी ने डोळे बंद करून श्री कृष्णाचे नामस्मरण केले तेव्हा श्रीकृष्णांनी तिथे तिचे विवस्त्र होण्यापासून रक्षण केले आणि दुःशासनला धडा शिकवला.

या कथेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते की जेव्हा श्री कृष्णाने शिशुपालाचे शंभर अपराध भरले तेव्हा त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडले होते तेव्हा त्या चक्रामुळे श्री कृष्णाच्या बोटाला दुखापत झाली होती तेव्हा द्रौपदीने स्वतःच्या शालूचा पदर फाडून तो श्री कृष्णाच्या बोटाला बांधला होता. त्या गोष्टीची श्री कृष्णाने कायम जाण ठेवली होती आणि जेव्हा द्रौपदी संकटात होती तेव्हा तिचे संरक्षण देखील केले.

द्वापारयुगामध्ये एका चिंधी मुळे श्री कृष्ण द्रौपदी च्या मदतीला तिचे संरक्षण करण्यासाठी धावून गेला पुढे त्याचीच राखी झाली आणि आज आपण राखी बांधून भावाकडून आपल्या संरक्षणाचं वचन घेतो.रक्षाबंधनामधे आपण भावाला ओवाळतो आणि त्याला राखी बांधतो मग आपला भाऊ देखील आपल्याला आपले संरक्षण करण्याचे वचन देतो. आजच्या काळात आपल्या आवडीच्या वस्तू देखील जो तो भाऊ देत असतो.

काही सामाजिक संस्था रक्षाबंधन अगदी हटके पद्धतीने साजरी करतात. सीमेवर आपल्या देशासाठी लढणारे जवान घरी जाऊ शकत नाहीत अशा वेळी आपले सैनिक, आपले रक्षक यांना सीमेवर राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो. सीमेवर तैनात सैनिक हे रक्षाबंधनाचे पवित्र कर्तव्य बजावत असतात.

भावा बहिणीच नातं हे फक्त एका आई वडिलांच्या पोटी जन्म घेतल्यावरच बनत अस नाही. आजकाल रक्तापेक्षा देखील मनाने जोडली गेलेली नाती खूप टिकत आहे. सख्ख्या नात्यासारखंच गहिरं प्रेम या जोडलेल्या नात्यामध्ये आढळतं. भाऊ बहीण म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असतात.

बहीण असते साधी भोळी तर भाऊ असतो खोडकर. बहीण म्हणजे मायेचा आधार, आईची जणू सावली तर भाऊ म्हणजे भक्कम खांदा, वडिलांनंतर त्याचाच खंबीर खांदा बहिणीला आधार देत असतो. या नात्याला एकप्रकारे जपून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

आमच्या शाळेत देखील रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. शाळेतील मुली राखी घेऊन येतात आणि वर्गातील आपल्या भावाला राखी बांधतात. शाळेमध्ये रुजलेले हे नाते मोठे झाल्यावर देखील कायम सोबत राहते यापेक्षा सुंदर आणखी काय असेल.शाळेमध्ये सर्वांना बंधुत्वाची ही शिकवण एक सजग आणि जागरूक नागरिक घडवायला मदत करते. जितके संस्कार चांगले होतात तेवढी चांगली पिढी घडत जाते अस मला वाटतं.

रक्षाबंधनाच्या दिवशी मुली तर फारच खुश असतात . राखी बांधल्यानंतर आपला भाऊ एखादी छान भेटवस्तू देतो. खरे जुन्या काळी स्त्रिया कामासाठी कुठे बाहेर पडत नव्हत्या.

स्त्रियांना स्वतः खर्च करण्यासाठी हातात पैसे नव्हते शिवाय त्यांना एक एक वर्ष भर एक ते दोन साड्या वापरायला मिळत अशा वेळी रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने भाऊ बहिणीला भेटायला जात असे आणि जाताना एखादी भेटवस्तू घेऊन जात असे त्यामुळे तिला देखील नवीन वस्तू वापरायला मिळत. असा हा रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याच्या प्रेमाचा दिवस होय

Raksha Bandhan Nibandh In Marathi

  1. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या नात्यामधील गोडवा टिकवून ठेवणारा सण.
  2. रक्षाबंधन या सणांमध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून आपले रक्षण करण्याचे वचन मागून घेते.
  3. रक्षाबंधन या सणांमध्ये भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.
  4. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा होतो.
  5. रक्षाबंधन हा सण नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा होतो या दिवशी कोळी राजा समुद्राला नारळ अर्पण करून आभार व्यक्त करतो.
  6. रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते.
  7. रक्षाबंधन हा सण साजरा करण्यामागे द्वापार युगातील द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या बहिण भावाच्या नात्याचे कारण आहे.
  8. भारतामध्ये सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना राखी पाठवून तसेच प्रत्यक्ष राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली जाते.
  9. रक्षाबंधन सण साजरा करताना फक्त सख्खे बहीण भाऊ नव्हे तर मनाने ज्यांना भाऊ-बहीण मानले जाते ते लोकही रक्षाबंधन साजरी करतात.
  10. भारतीय परंपरेमध्ये रक्षाबंधनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे स्त्री आणि पुरुषांमधील एक पवित्र संबंध भारतामध्ये एका सणाच्या रूपाने साजरा केला जातो.

मित्रांनो आज आपण रक्षाबंधन या सणावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध लिहिला आहे. आपणास हा निबंध शालेय अभ्यासक्रमासाठी निश्चितच उपयोगी पडेल. आपल्याला हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद!

Leave a Comment