My Favourite Season Essay In Marathi: दररोज एक सारखेच वातावरण राहिले असते तर माणूस कंटाळून गेला असता म्हणूनच कदाचित निसर्गाने आपल्या सर्वांसाठी ऋतू निर्माण केले असावेत. या विविध ऋतूंची मज्जाच वेगळी आहे. निसर्ग कधी देतो उन्हाचा चटका तर हिवाळ्यात जाणवतो थंडगार वारा आणि पावसाळा त्याची तर बातच न्यारी डोळ्यांना आल्हादायक वाटणारा सुंदर निसर्ग पाहायला मिळतो तो खरा पावसाळ्यातच म्हणूनच मला पावसाळा ऋतू फार आवडतो. आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर निबंध पाहणार आहोत. चला तर मग पाहूया.
My Favourite Season Essay In Marathi
‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’
अगदी अंगणवाडी पासून हे गाणं आपल्या कानावर पडतं. हे गाणं कधीच कुणाला शिकवलं जात नाही ते सर्वांना पाठ होऊन जातं आणि घरात बसून बाहेरचा पाऊस न्याहाळताना आपसुकच हे गाणं ओठांवर येत. पाऊस म्हटलं की सुरुवात होते या अंगणवाडीतील गाण्यापासून.
प्रत्येकासाठी पाऊस तोच असतो असं नाही काही ना पावसात कुणाची तरी आठवण येते आणि मन खुश होऊन जातं तर काहींना कुणाचीतरी त्या पावसात कमी जाणवते आणि मन दुखी होऊन जातात प्रत्येकाचा स्वतःच्या पावसाचा अनुभव वेगळा. कोणी पावसात प्रेम गीत गात तर कोणी पावसाच्या पाण्यात आपले अश्रू मिसळून टाकतात. पावसाच्या पाण्यात आनंदाश्रू आणि दुःखाश्रू एक होऊन जातात आणि उरतो तो फक्त धुंद पाऊस.
मला पावसाळा आवडतो कारण तो शेतकऱ्यांना सुखावून जातो. कडक उन्हाळा झेलल्यानंतर वरून राज्याची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी जेव्हा पाऊस बरसतो तेव्हा एखाद्या राजाप्रमाणेच भासतो. पाऊस म्हणजे शेती कामाची लगबग. पाऊस शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याकारणाने बळीराजा या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.
पाऊस मनाप्रमाणे बरसला तर बळीराजा खुश होऊन जातो पण कधी कधी हा वरून राजा सुद्धा अति करतो आणि बळीराजाला नाराज देखील करतो. अतिवृष्टी होऊन कधी कधी शेतकऱ्यांचं नुकसान देखील होतं फक्त या एका कारणासाठी कधीतरी वाटतं की पावसानेही थोडं शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे. “बळीराजाचं नुकसान होईल, इतकंही बरसू नकोस वरुण राजा” असे म्हणावसं वाटतं.
पावसाळ्यामध्ये तर शाळांना बहुतांशी वेळा अतिवृष्टीमुळे सुट्टी देखील मिळते. लहान मुलांना शाळेला सुट्टी म्हणजे जणू काही आनंदाची पर्वणीच असते. शाळांना सुट्टी मिळते म्हणून देखील मला पावसाळा फार आवडतो. पावसाळ्यामध्ये शाळेला जाताना रेनकोट घातला जातो. पावसाळी बूट घातले जातात.
पावसाळ्यात दप्तर भिजू नये यासाठी आम्हा मुलांची तारांबळ उडते. शाळेत जाताना पावसात भिजत जाण्याची मजा ही काही औरच असते. आम्ही वर्गमित्र-मैत्रिणी शाळेला जाताना पावसामध्ये धमाल मस्ती करत जातो. पावसाळ्यात एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला तर फार फार आवडते. आम्हा मित्र-मैत्रिणींना ही मस्ती मजा करायला मिळते म्हणूनही मला पावसाळा ऋतू फार आवडतो.
पावसाळ्यामध्ये निसर्ग तर हिरवाईने नटून जातो. मला मुळातच निसर्गाची फार आवड आहे. निसर्गातील झाडे , झुडपे, वेली, पशु आणि पक्षी हे देखील पावसाळा ऋतूमध्ये अगदी वेगळेच भासतात. या सर्व नैसर्गिक घटकांना पावसाळ्यामध्ये पाहिलं की असं वाटतं जणू ते या वरुण राजाच्या बरसण्याची वाटच पाहत होते. मोर तर पावसाळ्याचे स्वागत स्वतःचा पिसारा फुलवून करतो.
पावसाळ्यामध्ये पिसारा फुलवलेला मोर पाहायला मिळणं म्हणजे अहो भाग्यच! उन्हाळ्यामध्ये शुष्क झालेली झाडे झुडपे, पावसाळ्यामध्ये पुन्हा ताजी टवटवीत होतात. एरवी वणवा लागून जळालेले डोंगर पावसाळ्यामध्ये पुन्हा हिरवाईने सजून आम्हा निसर्गप्रेमींना स्वतःकडे आकर्षित करत असतात. पावसाळा ऋतू म्हणजे निसर्गाची अनमोल देणगी आहे असं मी मानते.
पावसामध्ये भिजायला मला फार फार आवडते मग आजारी पडलं तरी काहीच हरकत नाही. पावसाचे पहिले थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा मातीचा तो खरपूस सुगंध कोणत्याही अत्तराला देखील मागे टाकेल इतका सुंदर भासतो. पावसात भिजून घरी आल्यानंतर खिडकीकडे बघत गरमागरम भजी खात पावसाचा आनंद घेणे म्हणजे स्वर्गच. पाऊस पडून गेल्यानंतर आभाळात येणार इंद्रधनुष्य म्हणजे निसर्गाची कमालच .निसर्गाने भरभरून दिलेलं हे दान डोळ्यात साठवून घ्यावंसं वाटतं.
पावसाळा ऋतू हा नेहमीच मला आशावादी वाटतो. उन्हाळा संपल्यावर पावसाळा येतो तेव्हा जीवाची झालेली काहीली थंड होऊन जाते.
उन्हामुळे तापलेली जमीन पावसाच्या थेंबांनी अगदी शांत होऊन जाते. आजवर कोणी उन्हाळ्यावर कविता केल्या नसतील मात्र पावसावर कविता नाही असे शोधून सापडणार नाही. पावसाळा म्हणजे कवींचा हक्काचा ऋतू म्हणायला हरकत नाही. असा हा रंगीबिरंगी छटांनी नटलेला पावसाळा हा ऋतू अनुभवायला मला फार फार आवडतो.
Majha Avadta Rutu Nibandh In Marathi 10 Lines: माझा आवडता ऋतू निबंध १० ओळी
- निसर्गचक्रातील ऋतूंमध्ये मला पावसाळा ऋतू फार फार आवडतो.
- पावसाळा या ऋतूमध्ये संपूर्ण निसर्ग हिरवाईने नटून जातो.
- पावसाळा ऋतू हा शेतकऱ्यांसाठी मदतीचा ठरतो त्यावरच शेतीची कामे अवलंबून आहे.
- पावसाळ्यामध्ये शाळांना सुट्टी मिळते म्हणून मला पावसाळा फार आवडतो.
- पावसाळ्यामध्ये मोर आपला पिसारा फुलवून आपला आनंद व्यक्त करतो.
- पावसाळ्यामध्ये घरी आई गरमागरम भजी तयार करून सर्वांना खाऊ घालते.
- पावसाळ्यात मला घरात बसून बाहेर पडणारा पाऊस न्याहाळायला फार आवडते.
- पावसामध्ये नंतर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य पाहायला मला फार आवडते.
- पावसामध्ये खेळायला, नाचायला आणि पावसाचे पाणी अंगावर उडवायला मला फार आवडते.
- पावसाळा या ऋतूमध्ये एक आशावादी चित्र वाटते ज्यामुळे निसर्गातील प्रत्येक घटक हा नवीन आव्हानांसाठी आणि संधींसाठी तयार होत आहे असे भासते.
नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणा सर्वांसाठी माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर शंभर ते पाचशे शब्द आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. आपल्याला हे निबंध कसे वाटले हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अशाच विविध शैक्षणिक विषयांवरील निबंधांसाठी आमच्या निबंध मालिकेला नक्की भेट द्या. धन्यवाद!