Jhade Lava Jhade Jagva Nibandh In Marathi: निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे झाडे आणि झुडपे. जर निसर्गामध्ये झाडेझुडपे नसतील तर निसर्गाचे सौंदर्य ते काय उरणार? निसर्गाला जे सौंदर्य लाभले आहे ते या झाडेझुडपे आणि वेलींमुळेच. झाडे झुडपे अस्तित्वात नसतील तर निसर्ग देखील रिता भासतो. झाडे झुडपे हे नुसते निसर्गाचे सौंदर्य वाढवत नाहीत तर निसर्गातील इतर प्राणिमात्रांना आणि पशु पक्षांना जीवनासाठी आवश्यक असणारे घटक झाडांमुळेच मिळतात. निसर्गातील झाडांचे महत्त्व सर्वांना समजावे म्हणून आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये झाडे लावा झाडे जगवा या विषयावर निबंध सादर करत आहोत.
Jhade Lava Jhade Jagva Essay In Marathi
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे”
संत महात्म्यांनी आपल्या अभंगांमध्ये या झाडांना आपले नातेवाईकच म्हटले आहे. ही झाडे आम्हाला आमच्या जिवलगांप्रमाणेच आहेत. झाडापासून माणसाला होणारे फायदे अनंत आहेत. आज कालच्या जागतिक तापमान वाढीच्या संकटांमधून फक्त झाडेच आपल्याला वाचवू शकतात. झाडे आपल्या अत्यंत उपयोगाची आहेत.
माणूस कितीही बुद्धिमान असला , स्वतःला सर्व शक्तीमान समजत असला तरी निसर्गातील काही गोष्टी अशा आहेत की त्यांच्याशिवाय माणूस हा शून्य आहे. जर झाडे अस्तित्वातच नसती तर ऑक्सिजनची निर्मिती झाली नसती. जर ऑक्सिजन हा प्राण वायू माणसाला मिळाला नसता तर माणूस अस्तित्वात राहिला नसता. माणसाने आपल्या अस्तित्वाचा कधीच माज करू नये कारण त्याचे अस्तित्व हे निसर्गावर अवलंबून आहे.
झाडे ही निसर्गातील समतोल सांभाळून ठेवतात. झाडांमुळे जमिनीची धूप होत नाही. झाडांची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात. जर झाडे अस्तित्वात नसती तर मातीची धूप होऊन जमीन ही पूर्णपणे नापीक झाली असती. झाडे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.
माणूस आपला उदरनिर्वाह या झाडांवरती च चालवतो. झाडांपासून मिळणारी फळे माणूस आवडीने खातो. फक्त माणूसच नाही तर झाडांवरती अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी खाद्यासाठी अवलंबून असतात. पक्षी झाडाच्या ढोलीमध्ये आपले घर करून राहतात. काही पक्षी झाडांवरती घरटे बांधतात.
माणसाने या गोष्टीचे भान राखले पाहिजे. जेव्हा माणूस लाकूड मिळावे या हव्यासासाठी हिरवेगार झाड तोडत असतो तेव्हा तो फक्त एका झाडाचा जीव घेत नसतो तर त्यावर ज्या ज्या प्राणी आणि पक्षांची उपजीविका चालू असते त्यांचे हक्काचे घर तो हिरावून घेत असतो हे माणसाने कायम लक्षात ठेवले पाहिजे.
माणसाला कोणाचेही घर हिरावून घेण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला नाही. अशाप्रकारे गैर कर्म करणाऱ्या प्रत्येकालाच मग निसर्ग कोपला की शिक्षा मिळतेच. आपण जर झाडे जगवली नाहीत तर झाडांमुळे होणारे फायदे गमावून बसू. झाड आपल्याला सावली देते. वाट सरू ला आराम करायचा झाल्यास तो झाडाच्या सावली खाली आराम करू शकतो.
झाड स्वतः कार्बन डाय-ऑक्साइड आत घेते आणि ऑक्सिजन हा प्राणवायू बाहेर सोडत असते जो आपल्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपण झाडांची कत्तल केली तर ऑक्सिजन हा प्राणवायू तयार होणे बंद होईल आणि हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड तसेच इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढवून ते आपल्यासाठी जीव घेणे ठरतील.
झाडे लावली आणि ती जगवली तर पर्जन्यवृष्टीचे प्रमाणही संतुलित राहते. ज्या भागांमध्ये जास्त झाडे नसतात अशा भागामध्ये पर्जन्यवृष्टी ही होत नाही परिणामी तिथे दुष्काळाचा सामना करावा लागतो. झाडांच्या पालापाचोळ्या पासून उत्तम खताची निर्मिती देखील होते.
आपली भारतीय संस्कृती ही केवळ आध्यात्मिक विचार करणारी नव्हती तर अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम साधणारी होती. आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गालाही परमेश्वरासारखेच स्थान दिलेले आहे त्यामागे निसर्गाचे महत्व आपल्या सर्वांना कळावे हा दूरदृष्टी कोण देखील दिसून येतो.
आपल्या संस्कृतीमध्ये अनेक वृक्ष हे पूज्य मानले गेले आहेत. जसे की पिंपळाच्या वृक्षा मध्ये विष्णूचा वास असतो असे म्हटले जाते . कित्येक लोक पिंपळाच्या वृक्षाची पूजा देखील करतात. अध्यात्मिक दृष्ट्या त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असेलही, मात्र त्याबरोबरच भगवान विष्णूंचा वास असल्याकारणाने कोणीही पिंपळाच्या वृक्षाची कत्तल करायला पुढे धजावत नाही अशा प्रकारे एका दृष्टीने त्या पिंपळाच्या वृक्षाचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते.
वडाच्या झाडालाही असेच महत्त्व प्राप्त आहे वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचप्रमाणे वडाच्या झाडालाही कोणी तोडायला पुढे जात नाही. अशा प्रकारे अध्यात्मातून का होईना मात्र झाडांचे संरक्षण होते. महाभारतातील कांचन वृक्षाच्या ढोली मध्ये पांडवांनी आपली शस्त्रे लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे. कांचन वृक्षालाही आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
आपण जर झाडे लावली आणि ती जगवली तर भले आपल्याला त्या झाडाचे फळ मिळेल मात्र आपल्या पुढच्या पिढीला त्याची सावली, त्याची गोड, मधुर, रसाळ फळे चाखायला निश्चित मिळतील. झाडे लावून आणि त्यांना जगवून आपण आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
झाडे आपल्याकडे कधीच काही मागत नाहीत उलट ती आपल्याला सतत काही ना काही देत असतात. नारळाच्या झाडाला तर कल्पवृक्ष म्हटले जाते. नारळाच्या झाडाचा एकूण एक भाग आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी वापरतो असा हा कल्पवृक्ष आपल्याला लाभलेली देणगीच आहे. अशा या अनमोल झाडांचे आपण संवर्धन केले पाहिजे. चला तर मग प्रत्येकाने एक झाड लावण्याचा आणि ते जगवण्याचा उपक्रम राबवूया.
Jhade Lava Jhade Jagva Nibandh 10 Lines: झाडे लावा झाडे जगवा निबंध 10 ओळी
- निसर्गाने आपल्याला भरभरून दान दिले आहे त्यांपैकीच एक म्हणजे झाडे.
- निसर्गातील या झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे मनुष्य म्हणून आपले कर्तव्य आहे.
- झाडे आपले मित्र आहेत आजवर झाडांनी मनुष्याला निस्वार्थीपणे मदत केलेली आहे.
- झाडे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू बाहेर टाकतात.
- जर झाडे अस्तित्वात नसती तर ऑक्सिजन तयार झाला नसता परिणामी आज कोणताच मनुष्यप्राणी येथे अस्तित्वात नसता.
- आपण जर झाडे लावली आणि जगवली तर ती निसर्ग आणखीन सुंदर बनवतात.
- झाडे लावल्यामुळे मृदेची धूप होत नाही परिणामी जमिनीत माती टिकते आणि तिची सुपीकताही टिकते.
- झाडांवर कितीतरी पशुपक्षी हे उपजीविकेसाठी अवलंबून असतात.
- झाडे लावून आपण त्यांचे संवर्धन केले पाहिजे जेणेकरून हा नैसर्गिक ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंत जपून ठेवला पाहिजे.
- आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावून निसर्गासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
आज आपण झाडे लावा झाडे जगवा या विषयावर 100 ते 500 शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. असेच वेगवेगळ्या विषयांवरील निबंध हवे असल्यास आमच्या साईटला नक्की भेट द्या. धन्यवाद!