Essay On My Favourite Hobby Drawing In Marathi: चित्रकला कुणाला आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. रिकाम्या कागदावर उभ्या आडव्या रेषा मारून त्यामध्ये रंग भरायला सर्वांनाच आवडतात. विविध प्रकारचे आकार काढून त्यामध्ये सौंदर्य भरण्याची कला म्हणजे चित्रकला होय. चित्रे काढत असताना आपण त्यामध्ये रममाण होऊन जातो आणि सर्व चिंता विसरून आपण एकाच ठिकाणी तल्लीन होऊन जातो. चित्रे काढून त्यामध्ये रंग भरताना आपल्याला एक वेगळेच सुख वाटत राहते. आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये माझा आवडता छंद चित्रकला या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध पाहणार आहोत.
माझा आवडता छंद चित्रकला निबंध मराठी
श्री गणेशांना 64 कलांचे अधिपती असे म्हटले जाते या 64 कलांपैकी एक म्हणजेच चित्रकला. आपल्याला शालेय जीवनामध्ये सर्वात आवडीचा असणारा विषय म्हणजे चित्रकला. इतर विषय जसे की गणित, भूगोल हे विषय सर्वांना आवडतीलच असे नाही मात्र चित्रकला सर्वांचा अत्यंत आवडीचा विषय आहे.
शाळेमध्ये जेव्हा वर्गशिक्षिका आपल्याला एखाद्या आवडत्या विषयावर चित्र काढण्यास सांगतात तेव्हा प्रत्येक जण आपले कला कौशल्य त्या कागदावर रेखाटत असतो. चित्रकलेचे विषय देखील आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील तर मग चित्र रेखाटण्याची मजाच काही और असते.
क्रिकेट खेळणारी मुले, पावसात नाचणारी मुले, फुगेवाला , नंदीबैलवाला , सार्वजनिक गणेशोत्सव , उद्यानात खेळणारी मुले असे एक ना अनेक विषय हे चित्रकला साठी आपल्या वर्ग शिक्षिका आपल्याला सांगतात. चित्रकला ही जरी फक्त रंग आणि रेषा यांचा वापर करून साकारता येते तरी त्यामध्ये समाजाला शिकवण देण्याची ताकद देखील आहे. आपल्याला अनेक चित्रे अशी मिळतील जी आपल्याला काहीतरी शिकवत असतात.
चित्रामधील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भावना न बोलता ही आपल्याला त्या व्यक्तीच्या मनात काय असेल याबद्दल अंदाज देऊन जातात. चित्रकला ही फक्त चित्र काढणाऱ्यालाच अवगत असते मात्र ती बघणाऱ्याचाही दृष्टिकोन बदलून ठेवू शकते एवढी ताकद चित्रकलेमध्ये आहे.
अगदी पुरातन कालापासून चित्रकला ही कला सर्वजणांमध्ये लोकप्रिय आहे. अश्मयुगीन काळामध्ये देखील आपल्याला अनेक ठिकाणी गुहांमध्ये कोरलेली चित्रे आढळतील. या चित्रांमधून माणूस त्या काळामध्ये आपली उपजीविका शिकार करून कशी भागवत होता हे देखील आपल्याला समजते.
तसेच या चित्रांमध्ये आपल्याला आढळून येते की माणूस हा समूहाने राहणारा प्राणी आहे. आपल्याला चित्रकलेच्या माध्यमातूनच पूर्वीच्या काळात घडलेल्या घटनांचे ज्ञान आले. ही कला जतन करण्याने आपल्या येणाऱ्या पिढ्यांना देखील जुन्या पिढ्यांची ओळख राहते.
चित्रकलेमध्ये अजून एक नाव वाखाणण्याजोगे आहे ते म्हणजे चित्रकार राजा रवि वर्मा. आपण उघड्या डोळ्यांनी आजवर देव पाहिलेला नाही. जर देव आपल्याला दिसले असते तर त्यांचे रूप कसे असते हे आपल्याला कल्पनेमध्ये देखील शक्य होणार नाही मात्र राजा रविवर्मा यांनी मात्र या देवी देवतांचे खूप सुंदर असे चित्र काढून ठेवलेले आहेत. आपल्या देवघरांमध्ये ज्या काही देवी देवतांचे फोटो आपल्याला आढळतात हे सर्व सर्वप्रथम राजा रविवर्मा यांनीच चित्रीत केलेले आहेत. देवी लक्ष्मी कशी दिसत असेल तर राजा रविवर्मा यांनी काढलेल्या देवी लक्ष्मीसारखीच. खरेच चित्रकाराला कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन स्वतःची कला सिद्ध करता येते.
जागतिक स्तरावर देखील असे अनेक महान चित्रकार होऊन गेले त्यांपैकी एक म्हणजे लिओनार्डोदा विंची. लिओनार्डो द विंची यांनी चित्रित केलेली मोनालिसा कोणाला माहित नाही असे होणार नाही. जो व्यक्ती ज्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघेल तसे त्या व्यक्तीला तिचे हास्य भासते. प्रत्येक बघणाऱ्याला मोनालिसा ही वेगळ्या पद्धतीने दिसते , असे चित्र एखादा अवलिया, हरहुन्नरी व्यक्तीच रेखाटू शकतो. आजवर मोनालिसाच्या या पेंटिंग मागे काय कलाकुसर आहे हे कोणीच शोधू शकले नाही.
जागतिक स्तरावर चित्रकारांमध्ये घेतले जाणारे आणखी एक नाव म्हणजे पाब्लो पिकासो. बॉम्बिंग झाल्यानंतर तेथील मनुष्य जातीवर आधारित आणीबाणीची परिस्थिती रेखाटण्यासाठी पाबलो पिकासोला सरकारकडून सांगण्यात आले. कलाकाराने फक्त माणसांचीच व्यथा या चित्रांमध्ये रेखाटली नाही तर त्याचबरोबर मूक जनावरे, निसर्ग यांची देखील व्यथा त्याने अगदी उत्कृष्टपणे रेखाटलेली आहे.
भारतीय चित्रकारांमध्ये आणखीन एक नाव आवर्जून घ्यावे लागते ते म्हणजे चित्रकार एम. एफ. हुसेन. प्रस्थापित संस्थेविरुद्ध बंड वादी चित्रण करणे जमले ते एम एफ हुसेन यांनाच. ते एक बंडखोर चित्रकार जरी असले तरी त्यांची चित्रे देखील आपल्याला खूप सार्या गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडतात.
चित्रकलेमध्ये विविध प्रकार आढळतात. मधुबनी पेंटिंग, वारली पेंटिंग, कालीघाट पेंटिंग, गोंड पेंटिंग, कलमकारी पेंटिंग, पिथोरा पेंटिंग आणि पटचित्र पेंटिंग. चित्रकलेमध्ये याहूनही विविध प्रकार आहेत यांपैकी वारली पेंटिंग हा प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतो.
जुन्या काळामध्ये जेव्हा माणूस आजच्या इतका प्रगत नव्हता मात्र त्याच्याकडे चित्रकलेची कला त्याआधी पासूनच अस्तित्वात आहे. त्या काळातील स्त्रिया तांदळाच्या लेपा चा वापर करून पिवळ्या अथवा लाल रंगाच्या भिंतीवरती वारली पेंटिंग करत असत. वारली पेंटिंग मध्ये प्रामुख्याने समूहाने करत असलेली शेती अथवा विवाह समारंभ यांचे चित्रण केलेले आढळते.
चित्रकला या विषयावर लिहावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल. आजवर जगात खूप थोर चित्रकार होऊन गेले. त्या चित्रकारांनी या कलेतून समाजाला प्रबोधन घडेल असे अनेक सुंदर सादरीकरण देखील केलेले आहे. मला देखील या चित्रकारांचा हेवा वाटतो. चित्रकलेमध्ये मन हरवून जाते , समाजाला या कलेतून प्रबोधन करता येते , म्हणूनच मला चित्रकला फार आवडते.
माझा आवडता छंद चित्रकला या विषयावर दहा ओळींमध्ये निबंध
- शालेय वर्गात असल्यापासून मला चित्रकलेचा अगदी नादच लागलेला आहे.
- चित्रकले साठी लागणारे विविध रंग आणि कॅनव्हास पेपर यांचा संग्रह करायला देखील मला फार आवडते.
- चित्रे हे समाजाला प्रबोधन करण्याचे एक माध्यम आहे असे मी समजतो.
- चित्रकला ही 64 कलांपैकी एक कला आहे.
- आजवर जागतिक स्तरावर अनेक मोठे चित्रकार होऊन गेले, आज ते चित्रकार हयातीत नसले तरी त्यांनी काढलेली पेंटिंग्स आजही त्यांची आठवण देत राहतात.
- लिओनार्डोदा विंची यांनी काढलेले मोनालिसाचे चित्र हे जगप्रसिद्ध आहे.
- भारतामध्ये देखील चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले देवी देवतांची चित्रे घरोघरी पूजली जातात.
- चित्रकलेचे निरनिराळे प्रकार वेगवेगळ्या भागांमध्ये आढळतात जसे की बिहारमध्ये मधुबनी पेंटिंग आढळते तर महाराष्ट्रामध्ये वारली पेंटिंग.
- वारली पेंटिंग हे तांदळाच्या लेपा पासून बनवले जात आणि लाल आणि पिवळ्या प्रकारच्या भिंतीवरती ते केले जात असे, वारली पेंटिंग मधून आपल्याला जुन्या काळामध्ये सर्वजण कसे एकोप्याने राहत होते ते दिसते.
- मला मोठे होऊन एक उत्तम चित्रकार बनायचे आहे आणि माझ्या चित्रकले मधून लोकांच्या मनाला हात घालायचा आहे.
आज आपण माझा आवडता छंद चित्रकला या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केलेला आहे. आपल्याला हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊ नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद!