Importance Of Exercise Essay In Marathi: व्यायामाचे महत्त्व मराठी निबंध

Importance Of Exercise Nibandh In Marathi: परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला एक सुंदर असे शरीर दिलेले आहे. प्रत्येक व्यक्ती हा इतरांच्या नसला तरी स्वतःच्या नजरेत त्याला आपण किती सुंदर आहोत असेच वाटत असते. पण बाह्य सुंदरते इतकेच आंतरिक सुंदरतेला देखील महत्त्व आहे. माणसाचे आयुष्य हे केवळ सुंदरतेवर अवलंबून नाही तर त्याच्या निरोगी असण्यावर जास्त अवलंबून आहे.

आजच्या घडीला माणसाचे आयुष्य हे केवळ पैसा कमावणे आणि सोयीसुविधांचा उपभोग घेणे असे झाले आहे. आपल्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या आरोग्याकडे काही अंशी दुर्लक्ष करत असते. जेव्हा माणूस आपल्या शरीराने दिलेले धोक्याचे संकेत दुर्लक्ष करतो आणि मग डॉक्टर कडे जातो तेव्हा डॉक्टरांना देखील त्या व्यक्तीच्या आरोग्याची खात्री देता येतेच असे नाही.

आरोग्याने ही धोक्याची घंटा देण्याआधीच प्रत्येक व्यक्तीने सावधान झाले पाहिजे आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सगळ्यात मोठा हुकमी एक्का म्हणजे व्यायाम होय. जो व्यक्ती व्यायामाची साथ ठेवतो त्याच्यापासून कितीतरी रोख हे नेहमी दूर राहतात हे आजवर सिद्ध झालेले आहे.
सगळ्यांना व्यायामाचे अनेक फायदे आहेत म्हणून तो जरूर केला पाहिजे.

पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माणसे रोजचे व्यवहार करत असताना त्यांच्या शरीराची भरपूर हालचाल होत असे. रोजच्या हालचालीमुळे माणसाचे आरोग्य देखील अगदी उत्तम राहत होते. पूर्वीच्या काळातील लोक जेवढे जेवण जेवण होते तेवढ्याच त्यांच्या कॅलरीज देखील बर्न होत असत.

लोकांची चयापचय क्रिया अगदी उत्तमपणे काम करत असे. पूर्वीच्या काळातील लोकांचे आयुष्मान देखील त्यामुळे अगदी 100 वर्षापर्यंत होते. लोकांच्या दीर्घायुष्याचे कारण हेच होते ते म्हणजे त्यांची दिनचर्या ज्या दिनचर्यामध्ये अनेक शारीरिक कष्टाची कामे त्या लोकांना करावी लागत असत.

बहुतांश पुरुष लोक हे शेती व्यवसायामध्ये काम करत असल्याने आणि स्त्रिया घरातील सर्व कामे स्वतः करत असल्यामुळे त्यांच्या शरीरात चरबी साठण्याची आवश्यकताच निर्माण झाली नाही. परिणामी पूर्वीच्या लोकांना हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल मधील वाढ, लठ्ठपणा असे आजच्या नवीन युगातील आजार कधी झालेच नाहीत.

आजच्या काळात या आजारांनी आपल्या आसपासच्या कितीतरी लोकांना ग्रासलेले आहे. हे आजार फक्त लठ्ठ प्रकृतीच्या लोकांना होतात असे नाही तर कोणतीही प्रकृती असेल तरीही हे आजार आपल्याला आढळतीलच. या आजारांवर जर कोणता रामबाण उपाय असेल तर तो म्हणजे व्यायाम करणे होय. व्यायामाने आपल्या शरीरात शिथिल झालेले सगळे अवयव पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन जातात.

आपल्या शरीरातील चांगले हार्मोन्स क्रियाशील होतात. व्यायाम करण्याने आपल्याला उत्साह वाटतो. एक तास व्यायाम केल्यानंतर आपला संपूर्ण दिवस अगदी छान जातो. व्यायाम करण्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते. व्यायामामुळे अनेक रोग आपल्यापासून लांब राहतात. जर शरीरातले सगळे अवयव योग्य प्रकारे आपले नेमून दिलेले काम करत असतील तर माणसाला कोणताही रोग जडत नाही आणि म्हणूनच हे अवयव चांगले काम करण्यासाठी आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.

चालणे हा तर सर्वात उत्तम व्यायामा आहे. चालण्यामुळे माणसाचे हृदय उत्तमरीत्या काम करते हे विज्ञानाने देखील सिद्ध केलेले आहे. योगासने हा व्यायाम प्रकार तर भारतानेच पूर्ण जगाला दिलेला आहे. योगासनांमुळे आपले शरीर लवचिक होते परिणामी आपण कोणतेही काम करण्यास सक्षम होतो.

सूर्यनमस्कार हा तर भारतीयांसाठी व्यायामाचा खजिनाच म्हणावा लागेल. रोज जो व्यक्ती सूर्यनमस्कार घालतो त्याला इतर कोणत्याही व्यायामाची गरज पडत नाही. सूर्यनमस्कारामध्ये जे 12 आसन आहेत ते सर्व आपल्या शरीरातील एकूण एका भागाची हालचाल करतात. सूर्यनमस्काराची ही देणगी देखील भारतीय संस्कृतीतच सापडते. आज भारतातील सूर्यनमस्कार आणि योगासने हे व्यायाम प्रकार जगामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहेत.

प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. एखादा दिवस व्यायाम करणे जमत नसेल तर चालू शकते पण याचा अर्थ व्यायाम पूर्णपणे टाळणे असा होत नाही. व्यायाम केला पाहिजे पण त्याचा अतिरेक करता कामा नाही. आपण व्यायाम शाळेत गेल्यानंतर तिथे विविध उपकरणे असतात.

आपल्याला जर एखादे उपकरण कसे वापरावे हे ठाऊक नसेल तर त्याचे व्यवस्थित शिक्षण घेऊन मगच ते उपकरण आपण घेतले पाहिजे अन्यथा त्याचा उलटा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. व्यायाम करताना योग्य ती खबरदारी बाळगणे देखील गरजेचे आहे.

कधी कधी व्यायाम करताना जर आपल्याला शरीराला थकवा जाणवत असेल तर अशावेळी तो व्यायाम ताबडतोब बंद केला पाहिजे. अति तिथे माती ही म्हण आपल्या सर्वांना माहीत आहेच म्हणूनच प्रत्येक वेळी खूप जास्त व्यायाम केल्याने मी व्यवस्थित राहील हा समज करणे देखील चुकीचे आहे. व्यायामाचा अतिरेक केल्यास होणारे हे दुष्परिणाम आपण लक्षात ठेवले पाहिजेत.

व्यायामामुळे होणारे फायदे हे अगणित आहेत म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाची गोडी लावून घेतली पाहिजे.

व्यायामाचे महत्त्व दहा ओळी निबंध

  1. व्यायामामुळे नुसते शरीरच बलवान बनत नाही तर त्याबरोबर आपले मन देखील ताकदवान बनते.
  2. व्यायाम केल्यामुळे आपले चित्त देखील एका ठिकाणी स्थिर राहते असे मानले जाते.
  3. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी माणसाने व्यायाम देखील केला पाहिजे.
  4. आपल्या आसपास आपल्याला अनेक व्यक्ती दिसतील की जे आजाराने ग्रस्त आहेत अशा लोकांच्या आजारांमागे एक कारण आपल्याला नक्की आढळेल ते म्हणजे व्यायामाचा अभाव.
  5. पूर्वीच्या काळी लोकांची प्रत्येक काम करण्यासाठी भरपूर हालचाल होत असते त्यामुळे त्यांचा एक प्रकारे व्यायामच होत असेल मात्र आत्ताच्या काळामध्ये बहुतांश कामेही मशीनद्वारे केली जातात आणि त्यामुळेच आपली हालचाल ही अंशतः किंवा पूर्णतः थांबली गेली आहे.
  6. आपल्या भारताला सूर्यनमस्कार आणि योगासने या व्यायामांची परंपरा लाभली आहे ज्याचा आदर्श संपूर्ण जगाने देखील घेतला आहे.
  7. आपण व्यायाम केल्यामुळे आपले शरीर सुदृढ होते तसेच आपल्यात एक प्रकारचा उत्साह जाणवतो जो दिवसभर टिकून देखील राहतो.
  8. व्यायाम करत असताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे व्यायामाचा अतिरेक कधीच करू नये.
  9. व्यायाम ही सर्व लठ्ठ, मध्यम अथवा बारीक अशा सर्व प्रकृतीच्या व्यक्तींनी करण्याची गोष्ट आहे.
  10. व्यायामाचे अगणित फायदे आहेत ते लक्षात घेऊन आपण स्वतःला व्यायामाची गोडी लावून घेतली पाहिजे.

व्यायामामुळे आपल्या शरीरात काय फरक पडतो?

व्यायामामुळे शरीर लवचिक बनते, वजन नियंत्रित राहते आणि शरीर तंदुरुस्त राहते.

व्यायाम करण्यामुळे मनावर काय परिणाम होतो?

व्यायाम केल्यामुळे मन ताकदवान होते आणि मनाची एकाग्रता वाढते.

भारतात उगम झालेले व्यायाम प्रकार कोणते आहेत?

सूर्यनमस्कार तसेच योगासने हे भारतातील जगप्रसिद्ध व्यायाम प्रकार आहेत.

Leave a Comment