Forgiveness In Marathi: क्षमा म्हणजे काय? – क्षमा कोणाला करावी आणि क्षमा कोणी करावी

क्षमा म्हणजे काय: (Forgiveness In Marathi) एखादी व्यक्ती जेव्हा हातून चूक घडते आणि अपराध बोध झाल्यानंतर त्याबद्दल याचना करते आणि माफी मागते तेव्हा त्या व्यक्तीला उदार मनाने माफ करण्याची क्रिया म्हणजेच क्षमा.

क्षमा कोणाला करावी?

एखादी व्यक्ती ज्याला आपल्या हातून घडलेल्या दुष्कर्माचा पश्चाताप होतो अशी प्रत्येक व्यक्ती ही क्षमेला पात्र असते.

क्षमा कोणी करावी?

क्षमा कोणी ही करू शकतो वयाने ‘लहान असो अथवा मोठा’ पण एक मात्र नक्की की जो व्यक्ती क्षमा करू शकतो तो मनाने कायम “थोर” असतो.

क्षमा करण्याकरता कोणते गुण अंगी हवे

क्षमा करण्याकरता माणसामध्ये मनाचा मोठेपणा असला पाहिजे. समोरच्या व्यक्तीचे दोष शोधण्याऐवजी त्या व्यक्तीचा चांगुलपणा ओळखता येणे गरजेचे आहे. संत महात्मा ज्याप्रमाणे सहजतेने एखादी चूक माफ करतात तशी सहजता माणसाच्या आचरणात हवी. आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या निर्मात्याने आपल्या चांगल्यासाठी घडवून आणलेल्या असतात हे कायम लक्षात ठेवून त्याप्रमाणे आचरण करावे.

कोणती व्यक्ती क्षमा करू शकत नाही

समोरच्याने आपले नुकसान केले तर मी देखील त्याला धडा शिकवणार ही विघातक प्रवृत्ती इतरांसोबत आपला देखील सर्वनाश करते हे कायम लक्षात असावे. अशा प्रवृत्ती ची व्यक्ती ही समाजासाठी देखील नुकसानकारक ठरते.
तसं पहायला गेलो तर क्षमा हा केवळ दोन अक्षरी शब्द आहे पण जो व्यक्ती क्षमा करायला शिकतो किंवा क्षमा करू शकतो तो आभाळापेक्षा ही मोठा होतो.

क्षमा उदाहरणार्थ

संपूर्ण जगाची माऊली म्हणून ओळख असणारे संत ज्ञानेश्वर महाराज एकदा भिक्षा मागण्यासाठी संपूर्ण गावामध्ये भटकत होते तेव्हा त्यांना गावामध्ये कोणीही भिक्षा दिली नाही तेव्हा ती अवहेलना सहन न झाल्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊली दुःखी होऊन घरी आले आणि त्यांनी ताटी लावली व घरामध्ये अगदी दुःखी भावामध्ये बसले अशावेळी त्यांच्याहून वयाने लहान असलेल्या संत मुक्ताई तिथे आल्या आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे म्हणत त्यांनी अभंग गायले जे आज ताटी चे अभंग म्हणून प्रसिध्द आहेत.

या अभंगातून संत मुक्ताई यांनी अगदी सुंदरपणे क्षमा करण्याचा उपदेश ज्ञानेश्वर महाराज यांना केला आहे त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली ना या उपदेशानंतर स्वतःच्या आंतरिक शक्तीचा अनुभव आला. म्हणूनच म्हणावे वाटते की क्षमा करण्याने तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या अंगी असणाऱ्या चांगल्या गुणांना ओळखून स्वतःची आंतरिक शक्ती जागरूक करू शकता.”संत तोची जाणा जगी , दया क्षमा ज्याचे अंगी”.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आयुष्यात असंख्य लोक येतात आणि जातात. त्यातले कित्येक जण आपलं मन दुखावतात तर कित्येक जण त्या दुखावलेल्या मनावर प्रेमाची हळुवार फुंकर मारतात. आपल्या मनात कायम प्रेम देणाऱ्यांबद्दल स्नेह असतो मात्र त्रास देणाऱ्यांबद्दल तेवढाच राग.

जेव्हा आपण त्रास देणाऱ्या व्यक्तींना देखील प्रेमाने वागवू तेव्हा आपल्या मध्ये क्षमा गुणधर्म अस्तित्वात येईल. जगातलं अंत्यंत सुंदर न नाजूक प्रेमाचं नातं म्हणजे नवरा बायकोचं. सप्तपदी चालून सोबत रहायची वचन घेतली जातात पण नंतर कशात बिनसलं तर संसाराची पूर्ण वाताहत होते अशावेळी नवरा बायको या दोन जीवांनी जर क्षमा गुणधर्म अंगिकारला तर संसार नुसताच सुरळीत राहत नाही तर तो बहरतो सुद्धा.

क्षमा या एका विषयावर आधारित पार्किंग नावाचा एक सुंदर चित्रपट आहे एक चूक माफ करण्याऐवजी जशास तसे वागणे या प्रवृत्ती मुळे दोन कुटुंबांची झालेली वाताहात या चित्रपटात अगदी सुंदरपणे दाखवली आहे हा चित्रपट समाजातील प्रत्येक जनमानसावर एक वेगळी छाप सोडून जातो. अविवेकी पद्धतीने घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे नुकसान कसे करतो हे या चित्रपटात उत्तमरित्या दर्शवले आहे.

Leave a Comment