Mansik Aarogyache Mahtva Marathi Speech व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, मानसशास्त्रामधे भविष्य घडवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना नमस्कार. मित्रांनो आज आपण विश्व मानसिक स्वास्थ्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहोत. आज दिनांक 10 ऑक्टोबर आजच्या दिवशी संपूर्ण जगभर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो.
शारीरिक आरोग्यप्रमाणेच व्यक्ती चे मानसिक आरोग्य ही तितकेच महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत असावे या विचारातून हा दिवस साजरा करण्यात येतो.माणूस जर मानसिक दृष्टिकोनातून स्वस्थ असेल तर तो आपले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन देखील यशस्वीपणे जगू शकतो असे मानसशास्त्र सांगते.
माणसाचे शारीरिक स्वास्थ्य जितके महत्वाचे आहे तेवढेच त्याचे मानसिक स्वास्थ्य देखील महत्त्वाचे आहे. एखादा व्यक्ती मानसिक दृष्टिकोनातून ठीक नसेल तर तो स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वतःच तयार करत असतो.आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये माणूस स्वतःचे मानसिक स्वास्थ्य हरवत चालला आहे.
पुर्वी पेक्षा आजचा काळ हा जास्त स्पर्धात्मक झाला आहे. आजकाल लोकांना नवनवीन तंत्रज्ञान अगदी सोप्या पद्धतीने शिकता येते तसेच मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत मात्र त्याबरोबर येणाऱ्या कामाच्या दडपणामुळे अथवा प्रत्येक गोष्टी उत्कृष्ट च झाली पाहिजे या अट्टाहासामुळे माणूस मानसिक दृष्ट्या खचत चालला आहे.
सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक जण आपली तुलना इतरांशी करत आहे. एखादा व्यक्ती जे आयुष्य सोशल मीडियावर दाखवतो तसेच त्यांचे आयुष्य प्रत्यक्षात चालू आहे असे प्रेक्षक वर्गाला वाटते आणि त्यातून आभासी जगामध्ये राहण्याचा प्रयत्न प्रेक्षक करतात. मात्र हे असे आभासी जग जेव्हा खऱ्या व्यवहारी जगाला सामोरे जाते तेव्हा या लोकांना सत्य पचविणे थोडे कठीण होते.
अपेक्षाभंग सहन न झाल्यामुळे अनेक जण हे ताणतणावला सामोरे जातात.एकत्र कुटुंबपद्धती ऐवजी संयुक्त कुटुंबपद्धती मध्ये राहायला लागल्यामुळे भावनांची काळजी घेतली जात नाही. स्वतःच्या मनातील भावना कोणी समजू शकणार नाही या भावनेतून लोक आतल्या आत आपले विचार दाबतात आणि मग शेवटी ही घुसमट जेव्हा असह्य होते तेव्हा लोक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
आजच्या नवीन युगामध्ये मोठमोठ्या आजारांवर औषधे उपलब्ध आहेत. एखादा दुर्धर आजार देखील आजच्या काळामध्ये बरा होऊ शकतो इतकी वैद्यकीय क्षेत्राने प्रगती केली आहे. मानसिक आरोग्यामध्ये मात्र कुठल्याही औषधापेक्षा सर्वात जास्त जालीम ठरते ती इच्छाशक्ती. मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी माणसाने खूप साऱ्या गोष्टींचा अतिविचार करणे टाळले पाहिजे.अपेक्षांचा अतिरेक करणे टाळले पाहिजे.
अनेक ठिकाणी आपण स्वतःकडून देखील अपेक्षा ठेवतो. गरोदर स्त्रियांसाठी देखील मुल जन्माला आल्यानंतरचा काळ हा थोडा ताणतणावाने भरलेला असतो. अशा वेळी स्त्रियांना मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. शारीरिक बदलांमुळे स्त्रिया या मानसिक रित्या थोड्या खचल्या जातात अशा वेळी घरातल्या लोकांनी त्यांना प्रेमाने आपलेसे केले पाहिजे.
जेव्हा परीक्षेत कमी गुण मिळतात तेव्हा घरातील पालकांनी मुलांना न ओरडता त्यांना समजून घेतले पाहिजे पालकांच्या अती अपेक्षांमुळे मुलांचे बालपण देखील हरवून जाते. बहुतांश वेळा एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक असंतुलन दिसत असेल तर ते भूतकाळातील काही घटनांमध्ये दडलेले असते.
मानसिक आरोग्य स्वस्थ असणे हे व्यक्तीच्या बांधणीसाठी अत्यंत गरजेचे आहे. आपण सर्वांनी याकडे वेळेवर लक्ष दिले पाहिजे तसेच मानसिक आरोग्याविषयी जनजागृती देखील केली पाहिजे.
मानसिक आरोग्य आणि भूतबाधा यांचा काहीही संबंध नाही आणि जर कोणी या अंधश्रद्धेचा गैरवापर करून फायदा घेत असेल तर अशा व्यक्तींना कडक शासन केले पाहिजे.चला तर मग विश्व मानसिक स्वास्थ्य दिनी आपण सर्व जण आपले मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी संकल्प करूया. धन्यवाद.
मानसिक आरोग्याचे महत्त्व या विषयावर दहा ओळींमध्ये भाषण
- मित्रांनो आज 10 ऑक्टोबर म्हणजे जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे.
- दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य संस्था हा दिवस मानसिक आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी साजरा करते.
- माणसाच्या मानसिक आरोग्याचा परिणाम हा त्याच्या सामाजिक तसेच वैयक्तिक आयुष्यावर होत असतो.
- आपण जर मानसिक दृष्ट्या सुदृढ नसू तर त्यामुळे आपले हितसंबंध बिघडू शकतात.
- मानसिक आरोग्य ठीक राहण्यासाठी आपल्याला अपेक्षांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.
- अपेक्षांचा अतिरेक आणि त्यामुळे येणारा ताण यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
- कधी काळी छोट्या आणि क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी बोलून न दाखवल्यामुळे देखील मनाची कुचंबना होत असते परिणामी आपली घुसमट होत राहते.
- गोष्टी बोलताना त्यामध्ये भावनांना अवाजवी महत्व दिल्यास मूळ मुद्दा बाजूला ढकलला जातो आणि त्यामुळे काही निर्णय चुकतात.
- माणूस हा भावनाप्रधान असतो म्हणूनच त्याच्या भावनांचे नीट आकलन करून घेतले पाहिजे.
- पालक म्हणून वागताना आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवता आले पाहिजे जेणेकरून मूल तुमच्यासमोर व्यक्त होताना कचरनार नाही.
मानसिक स्वास्थ्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी मानसिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो.
मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी कोणती जागतिक संस्था कार्य करते?
जागतिक मानसिक आरोग्य संस्था ही मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करते.
मानसिक आरोग्य का बिघडते?
अपेक्षांचा अतिरेक आणि त्यामुळे येणारा ताण यामुळे मानसिक आरोग्य बिघडते.