Maza Aawdata Pakshi Mor : शाळेत जायला लागल्यापासून एक पक्षाचा उल्लेख असलेले बालगीत प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी आपल्याला ऐकू येते. हे बालगीत कोणत्या पक्षावर आधारित आहे हे तुम्ही ओळखले असेलच. अगदी बरोबर मी नाच रे मोरा या बालगीताबद्दल बोलत आहे.
” काळा काळा कापूस पिंजला रे,
ढगांशी वारा झुंजला रे,
फुलव पिसारा नाच
,नाच रे मोरा, आंब्याच्या वनात,
नाच रे मोरा नाच”
जेव्हा पाऊस बरसायला सुरू होतो तेव्हा मोर मोठ्या आनंदाने त्या पावसात नाचतो आणि त्याला हे नृत्य करतांना पाहणे म्हणजे स्वर्गसुख वाटते. हा प्रसंग या गाण्यातून आपल्याला अनुभवता येतो. शाळेत असल्यापासून अगदी सुरुवातीपासून या गाण्यामुळे मला मोर या पक्षाविषयी खूप कुतुहल निर्माण झाले होते. किंबहुना मला मोर हा पक्षी त्याच्या सौंदर्यामुळे देखील फार आवडायला लागला.
मोर हा पक्षी खरेतर नर आहे आणि त्याच्या मादीस मराठी भाषेमध्ये लांडोर असे म्हटले जाते. निसर्गतः मादी ही नरापेक्षा दिसायला सुंदर असते असा एक ठोकताळा प्रचलित आहे याला काही पशु आणि पक्षी अपवाद आहेत कारण त्यांमध्ये नराचे सौंदर्य हे मादीपेक्षा कायम उजवे ठरते त्याच अपवादांपैकी एक म्हणजे मोर होय.
मोर हा दिसायला अत्यंत देखणा पक्षी आहे.मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. भारतीय उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर आढळतात. भारतीय मोर हे प्रामुख्याने हिरव्या आणि निळ्या रंगाचे असतात. मोराचा पिसारा हा त्याच्या पाठीपासून सुरू होतो आणि हा पिसारा ते मादी ला आकर्षित करण्यासाठी फुलवतात.
मोर जेव्हा पिसारा फुलवून नाचायला चालू करतो तेव्हा त्याचे ते मोहक सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते.आमचे स्वतःचे ऊसाचे शेत आहे. एकदा आम्ही दुपारच्या शांत वेळी शेतात काम करत होतो तेव्हा अचानक काळे ढग दाटून आले होते .
मोरांचा केकारव कानावर पडला म्हणून आम्ही हातातील काम सोडून आवाजाच्या दिशेने गेलो आणि आम्हाला पिसारा फुलवलेल्या मोरांचे सौंदर्य दृष्टिक्षेपात आले. नाच रे मोरा या गाण्याचा खरा प्रत्यय मला त्यादिवशी आला.मोर हा पक्षी दाणे, धान्य खातो. मोर हा पक्षी कीटक,छोटे साप, बेडूक हे प्राणी देखील खातो. मोर हा पक्षी उंदीर देखील खातो.
मोर हा पक्षी शेतकऱ्यांना उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांना खात असल्याकारणाने तो देखील शेतकऱ्याचा मित्र म्हणावयास हरकत नाही.मोर हा पक्षी नैसर्गिक अन्नसाखळीमधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.मोर हा पक्षी इतर सर्व पक्षांच्या तुलनेमध्ये सुंदर म्हणून ओळखला जातो तसेच मोराच्या सौंदर्याच्या आसपास दुसऱ्या कुठल्याच पक्षाचा नंबर लागू शकत नाही.
मोराच्या सौंदर्यतेमुळे भारतातील अनेक प्राणी संग्रहालयांमध्ये देखील मोर ठेवले जातात. मोरांना पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी आढळून येते.मोरांना मोकळ्या रानामध्ये विहार करायला फार आवडते.
आधुनिक भारतामध्ये मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून संबोधले गेले असले तरी भारताच्या प्राचीन सांस्कृतिक कथांमध्ये मोराचा स्पष्ट उल्लेख आपल्याला आढळतो.भारतीय पुराणांमध्ये श्रीकृष्ण देवतेचा उल्लेख आपल्याला आढळतो. भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपीस आढळते. मोरपीस हे शांतता आणि संयमाचे प्रतीक समजले जाते.
भगवान कार्तिकेय जे भगवान शिव आणि देवी पार्वतीचे पुत्र तसेच श्री गणेशाचे थोरले बंधू आहेत त्यांचे देखील वाहन हे मोर होय. एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांची परीक्षा घेण्याचे ठरवले होते.
भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांना ब्रम्हांडाच्या तीन प्रदक्षिणा करण्यास सांगितल्या तसेच जो सर्वप्रथम या प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला उच्च स्थान देण्यात येईल असेही सांगितले. हे ऐकल्यावर भगवान कार्तिकेय हे आपले वाहन मोर यावर विराजमान होऊन ब्रम्हांडाच्या प्रदक्षिणेसाठी निघाले तर श्री गणेश यांनी आपले आई-वडील म्हणजेच भगवान शिव आणि देवी पार्वती यांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि हेच माझे ब्रम्हांड आहे असे सांगितले. ही परीक्षा जरी श्री गणेश यांनी आपल्या बुद्धीने जिंकली असती तरी भगवान कार्तिकेय यांनी या वेळेमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाची तीन वेळा प्रदक्षिणा केली होती आणि ते देखील आपले वाहन मोरा वरून हेही विसरून चालणार नाही. यातून देखील मोर या पक्षाचे महत्त्व अधोरेखित होतच आहे.
भारतीय पौराणिक कथांमध्ये मोराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.मोर या पक्षाचे पौराणिक महत्त्व त्याचप्रमाणे त्याचे मोहक सौंदर्य यामुळे मला मोर हा पक्षी फार आवडतो.
Peacock Bird Essay In Marathi 10 Lines
- मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
- मोर हा पक्षी अत्यंत देखणा म्हणून गणला जातो तसेच त्याच तो नरपक्षी आहे आणि त्याच्या मादीस लांडोर असे म्हटले जाते.
- मोर या पक्षाला निसर्गतःच खूप सुंदर असा पिसारा लाभलेला आहे.
- मोर जेव्हा खुश होतो तेव्हा तो आपला पिसारा फुलवून थुई थुई नाचतो.
- मोराच्या ओरडण्याला केकारव असे म्हटले जाते.
- मोर हा नैसर्गिक अन्नसाखळी मधील एक प्रमुख घटक आहे.
- मोर हा कीटक, उंदीर,छोटे साप तसेच बेडूक खातो त्यामुळे शेतीचे नुकसान टळते.
- भारतामध्ये बहुतांश ठिकाणी मोर हा पक्षी आढळतो तसेच अनेक प्राणी संग्रहालयांमध्ये देखील मोर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
- भारतीय पुराणांमध्ये मोराला भगवान कार्तिकेयांचे वाहन म्हणून महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे.
- भारतीय मोर हे प्रामुख्याने हिरव्या आणि निळ्या रंगाचे असतात मात्र काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे मोर देखील आढळतात.
नाच रे मोरा या बालगीत मध्ये कोणत्या पक्षाचा उल्लेख आहे?
बालगीतामध्ये मोर या पक्षाचा उल्लेख आहे. पावसाळा सुरू झाला की मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचतो, आणि त्याच दृश्याचे वर्णन या गाण्यातून केले आहे
मोराला भारताच्या संस्कृतीत विशेष महत्त्व का आहे?
मोर हा भारतातील राष्ट्रीय पक्षी आहे. भारतीय पुराणांमध्ये मोराची अनेक ठिकाणी उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपीस असते, तर भगवान कार्तिकेय यांचे वाहनही मोर आहे. त्यामुळे मोराला प्राचीन काळापासून पवित्र आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी मोर कसा उपयुक्त ठरतो?
मोर दाणे, धान्य, कीटक, छोटे साप, उंदीर आणि बेडूक खातो. त्यामुळे शेतात पिकांचे नुकसान करणारे कीटक आणि प्राणी कमी करण्यास तो मदत करतो. म्हणून मोराला शेतकऱ्याचा मित्र असेही म्हणता येते.