Bhrashtachar Nibandh Marathi: भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे असे आपण सर्वत्र ऐकत असतो. भ्रष्टाचारामुळे देश आतून पोखरला जातो. भ्रष्टाचारामुळे देशांच्या विकासाला खीळ बसते. भ्रष्टाचार हा देशासाठी आणि येथील लोकांच्या प्रगतीसाठी मोठा अडसर ठरतो. आपण सर्वांनी जागरूक राहून भ्रष्टाचारा विरुद्ध लढा दिला पाहिजे.
आपल्या दैनंदीन जीवनात प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीशी तोंड द्यावे लागते. साधे घरातून बाहेर पडताना आपण ज्या रस्त्यावरून कामाला जातो तो जर व्यवस्थित नसेल रस्त्यांवर खड्डे असतील अथवा रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असेल तर त्याचा त्रास हा जनतेला सोसावा लागतो. हा रस्ता असा निकृष्ट का बांधला जातो याचा जर शोध घेतला गेला तर आपल्याला आढळून येईल की रस्त्याचे कामाचे करार हे फक्त कागदोपत्री असतात प्रत्यक्षात मात्र कामाचे परीक्षण केले जात नाही.
मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या जनतेच्या सेवकांनी आपले कर्तव्य बजावण्याऐवजी पैसे घेऊन निकृष्ट काम करण्यास परवानगी दिली तर तो भ्रष्टाचार ठरतो. भ्रष्टाचार म्हणजे देशाच्या जनतेचा विश्वासघात करणे होय.आपण अशा प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले पाहिजे.
भारतामध्ये सरकारी ठिकाणी अनेकदा काम करून घेण्यासाठी लोकांना कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. सरकारी कार्यालयांमध्ये फायली पुढे सरकवण्यासाठी देखील शिपाई लोकांना पैसे दिले जातात. जर नागरिकांनी स्वतःच असे काम करणाऱ्या लोकांची पाठराखण करणे बंद केले तर भ्रष्टाचार पुढे फोफावणारच नाही.
आपल्या पाल्याला चांगले शिक्षण घेता यावे यासाठी अनेक पालक अगदी जीवाचे रान करतात. एखाद्या चांगल्या शाळेमध्ये आपल्या मुलाचे नाव नोंदवावे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. कित्येकदा केवळ पैशांचा वापर करून एखाद्या अभ्यासात कमकुवत असलेल्या मुलाची शिक्षणाची सोय पालक करतात मात्र ज्या मुलाकडे पैसे नसतात असा मुलगा किंवा मुलगी शैक्षणिक पात्रता असून देखील खूप मागे पडतात. हीच गोष्ट नोकरी मिळवताना देखील होते.
भ्रष्टाचाराचा हा भस्मासुर आज आपल्या जीवनात सर्वत्र दिसून येतो. जेव्हा एखादा व्यक्ती वाहतुकीचे नियम मोडतो. नियम मोडल्याबद्दल जे कायदे आहेत आणि ज्या शिक्षा आहेत त्यांची अंमलबजावणी न करता अनेक जण पैसे घेऊन विषय मिटवतात. अशा प्रकारे होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे लोक नियम आणि कायदे धाब्यावर बसवतात मात्र जर वाहतुकीचे नियम न पाळता एखाद्याने असे पैसे देऊन प्रकरण मिटविले आणि पुढे जाऊन एखादा अपघात घडला गेला तर त्याला जबाबदार कोण? ज्याने अपघात घडवला तो की ज्याने भ्रष्टाचार करून अशा व्यक्तीला पाठीशी घातले. अशा परिस्थितीमध्ये दोघेही तेवढेच गुन्हेगार आहेत.
आज आपण सर्व भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. जर आपला भारत देश आपल्याला भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी भ्रष्टाचार बंद होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपले एखादे काम करून घेण्यासाठी जर कोणी आपल्याकडे पैशांची मागणी केली तर अशावेळी आपण त्यांची तक्रार पोलिसांमध्ये देऊन त्या गोष्टींना आळा घातला पाहिजे.
माणूस हा कधीकधी स्वतःच्या स्वार्था पायी दुसऱ्याच्या हक्काचे हिरावून घेतो अशावेळी माणसाने आपली मानवी मूल्य जपली पाहिजे.भ्रष्टाचार करणारा व्यक्ती हा जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैशांची मागणी करतो तेव्हा तो फक्त पैसे घेत नाही तर इतरांच्या स्वप्नांचा चुराडा करतो असे वाटते. आज कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळवण्यासाठी देखील आजच्या काळामध्ये वणवण करावी लागत आहे.
साधा शेतकरी देखील स्वतःच्या नावाचा सातबारा मिळवण्यासाठी जर सरकारी कार्यालयात गेला तर त्याला देखील तेथील अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यावी लागते. आज कित्येक शेतकरी या अधिकाऱ्यांसमोर हतबल झालेले आपल्याला दिसून येतात. आपण भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपला पोशिंदा असलेल्या शेतकरी समाजाचे ऋण लक्षात ठेवून पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे.
पौराणिक काळामध्ये ज्याप्रमाणे विविध राक्षसांचा उल्लेख केला जातो तसाच आजच्या आधुनिक काळामध्ये राक्षस म्हणजे भ्रष्टाचाराचा भस्मासुर आहे. हा भस्मासुर नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि त्या भस्मासुराला नष्ट केले पाहिजे.
भारत जर भ्रष्टाचार मुक्त झाला तर तो जागतिक पटलावर एक स्वच्छ चारित्र्य असलेला देश म्हणून नावारूपास येईल त्याचप्रमाणे भारताची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
भ्रष्टाचार मुक्त भारत Essay In Marathi 10 Lines
- भ्रष्टाचाराचा भस्मासुर हा देश हितासाठी अत्यंत हानिकारक असतो.
- जेव्हा एखाद्या हुद्द्यावरील व्यक्ती आपले काम हे प्रामाणिकपणे स्वतःचे कर्तव्य म्हणून पार पडण्याऐवजी त्यात वैयक्तिक स्वार्थ साधून अथवा पैशांची मागणी करून ते काम करतो त्याला भ्रष्टाचार असे म्हणतात.
- भारतामध्ये आज देखील एखादे काम करून घेण्यासाठी समोरचा व्यक्तीला पैसे दिले जातात.
- शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावलेला दिसतो.
- लोक कित्येकदा स्वतःचे काम पूर्ण व्हावे म्हणून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवतात मात्र त्यांना दरवेळी पैशांची मागणी केली जाते.
- भ्रष्टाचारामध्ये जो व्यक्ती पैसे घेतो त्याच्या इतकाच गुन्हेगार जो व्यक्ती स्वतःचे काम करण्यासाठी पैसे देतो हा देखील असतो.
- रोजच्या जीवनामध्ये देखील आपण वेळोवेळी पैशांमुळे अडणारी कामे पाहतो.
- दवाखाने अथवा औषधे जी मानवी आरोग्याचा महत्वपूर्ण घटक आहेत ती देखील भ्रष्टाचारापासून लांब राहिलेली नाहीत.
- भ्रष्टाचाराचा हा भस्मासुर आपल्या देशाला कधीच प्रगतीपथावर नेऊ शकणार नाही कारण यातून काही लोकांचा वैयक्तिक स्वार्थ साधला जातो मात्र समाज आणि देश मागे पडतात.
- मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही ही शपथ प्रत्येकाने स्वतःला घालून घेतली पाहिजे .
भ्रष्टाचार म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या हुद्द्यावरील व्यक्ती आपले काम हे प्रामाणिकपणे स्वतःचे कर्तव्य म्हणून पार पडण्याऐवजी त्यात वैयक्तिक स्वार्थ साधून अथवा पैशांची मागणी करून ते काम करतो त्याला भ्रष्टाचार असे म्हणतात.
भारत जर भ्रष्टाचार मुक्त झाला तर काय होईल?
भारत जर भ्रष्टाचार मुक्त झाला तर तो जागतिक पटलावर एक स्वच्छ चारित्र्य असलेला देश म्हणून नावारूपास येईल त्याचप्रमाणे भारताची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत हानिकारक काय आहे?
देशाच्या प्रगतीसाठी भ्रष्टाचाराचा भस्मासुर हा अत्यंत हानिकारक आहे.