Education In Marathi: शिक्षण म्हणजे काय – शिक्षण कोण घेऊ शकते?

शिक्षण म्हणजे काय – शिक्षण म्हणजे अशी कला आहे ज्यामुळे या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव हा संपन्न होत जातो. शिक्षण म्हणजे वाघिणीच दूध जो व्यक्ती हे प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही हे बोल अगदी खरे आहेत. शिक्षणाने माणूस समृद्ध होत जातो. (Education In Marathi) शिक्षणामुळे कोणी एक व्यक्ती किंवा कुटुंब पुढे जात नाहीत तर संपूर्ण देश पुढे जात असतो. कितीतरी विकसित देश आपण पाहिले तर त्यात आपल्याला शिक्षणाचा उच्च दर्जा हे त्यांच्या विकसित असण्याचा पुरावा म्हणून मिळेल.

शिक्षण कोण घेऊ शकते?

ज्याच्या मनात शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे अशी कोणतीही व्यक्ती शिक्षण घेऊ शकते. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. शिक्षण हे केवळ पुस्तकी नसावे तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकत राहणे हा गुणधर्म अंगिकारला पाहिजे. आज आपण बातमी पत्रातून किती तरी गोष्टी ऐकतो अमुक एका थोराड वयाच्या व्यक्तीने या वयात शाळेत प्रवेश घेतला, तमुक व्यक्तीने अगदी लहान वयातून एखादा व्यवसाय सुरू केला यातून हेच निदर्शनास येते की माणसाने जर निरंतर शिकण्याची इच्छा ठेवली आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू ठेवले तर त्याला यश हे नक्कीच मिळते.

शिक्षण तुम्हाला धर्म, जात, लिंग, वय या भेदांपासून दूर करते आणि एक नवीन व्यापक दृष्टिकोन देते. शिक्षणामुळे व्यक्ती मनुवाद सोडून आधुनिक विचारसरणी आत्मसात करू शकतो. माणसाची सद्सदविवेकबुद्धी जागृत करण्यामागे एका चांगल्या शिक्षण पद्धतीचा हात असतो.

शिक्षण कोण देतो?

ज्याप्रमाणे शिक्षण कोणीही घेऊ शकतो त्याच प्रमाणे शिक्षण कोणीही देऊ शकतो. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही उक्ती कायम स्मरणात ठेवून माणसाने आचरण केले पाहिजे. आपल्या ज्ञानरुपी नदीतून प्रत्येक तहानलेल्या मनुष्यरूपी झाडाला अभिषेक करत राहणे यासारखे सुंदर कर्म या पृथ्वी तलावर असेल का? आपल्या भारतीय संस्कृती मध्ये तर शिक्षण देणारे गुरु हे देवाप्रमाणे वंदनीय मानले गेले आहेत. फक्त हेच नाही तर गुरुपौर्णिमा हा सण आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व पूज्य वंदनीय गुरुजनांना समर्पित केला आहे.

शिक्षणाचे स्त्रोत

1. कुटुंब

प्रत्येक व्यक्ती च्या शिक्षणाची सुरुवात ही त्याच्या कुटुंबातून होत असते. घरातील व्यक्ती जसे आचरण करतात तसेच घरातील लहान मूल शिकत जात असते म्हणूनच व्यक्तीची जडणघडण होण्यामधे सर्वांत मोठा वाटा हा त्याच्या कुटुंबाचा असतो. कुटुंबात राहूनच मूल सर्वांसोबत मिळून मिसळून राहायला शिकत असतो.

घरातील व्यक्तींची भाषा पद्धती आणि वागणूक यांचे बारकाईने निरीक्षण घरातील लहान मुल करत असते म्हणूनच घरातील वातावरण हे कायम प्रसन्न आणि आल्हाददायक असायला हवे. ज्या घरात सतत भांडणे वाद होत असतात त्या घरातील मुलांवर कायमच एकप्रकारचे दडपण राहते अशी मुले पुढे जाऊन बुजरी होतात म्हणूनच घरातील वातावरण सदैव आशावादी असावे.

2. शाळा आणि महाविद्यालय

मुलांवर कुटुंबानंतर सर्वांत जास्त प्रभाव जर कोणी टाकत असेल तर ती म्हणजे शाळा. शाळा म्हणजे दुसरे घरचं. एका प्रसिध्द कवींनी किती सुंदरपणे म्हटलं आहे,”ही आवडते मज मनापासूनी शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा, हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी”.

मुलांकरता शाळा म्हणजे जणू दुसरी आईच आणि तिथे ते अगदी स्वच्छंदीपणे बागडतात हे किती मार्मिकपणे कवींनी कविताबद्ध केले आहे. शाळा माणसाला घडवते म्हणजेच व्यक्तीच्या जडणघडणीत त्याची शाळा हा खूप महत्वाचा भाग असतो. शाळेतील गुरुजन वृंद हा कायम आपल्या विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणारा हवा. शिक्षणाचे बाजारीकरण हे शाळेकडून अपेक्षित नाही. तसेच शाळांमध्येच मुलांना समानतेचे आणि धर्मनिरपेक्षतेचे बाळकडू पाजले गेले पाहिजे त्यातूनच उत्तम नागरिक जन्माला येतो जो देशाच्या उज्ज्वल भविष्याचा एक अविभाज्य भाग बनतो.

3. समाज

समाज हा शिक्षणाचा एक मोठा भाग आहे.जे शिक्षण तुम्हाला पुस्तकातून समजणार नाही ते तुम्हाला समाज देत असतो. समाजातील रीती,परंपरा या माणूस अनुभवतो आणि त्यानुसार आचरण करतो. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील व्यक्ती त्यांचे वागणे या सर्वांचा व्यक्तीवर एक मोठा पगडा असतो.

उच्च स्तरावरील व्यक्ती जसे आचरण करते तेच प्रमाणबद्ध मानून समाजातील लोक त्यांचे अनुकरण करत असतात. हा देखील सामाजिक शिक्षणाचा एक भाग असतो. अशावेळी या प्रसिद्ध व्यक्तिमत्वानी भान राखून समाजात वर्तन केले पाहिजे त्यांची एक चुकीची कृती ही संपूर्ण समाजाला विनाशाकडे घेऊन जात असते. समाजातील प्रसिध्द व्यक्तींचे जागतिक स्तरावर असलेले योगदान आणि त्यांचे काम हे उल्लेखनीय असल्याकारणाने त्यांना ती उपाधी अथवा ते महत्व प्राप्त झालेले असते.

4. निसर्ग

निसर्गासारखा शिक्षक या जगी शोधून ही सापडणार नाही. निसर्गातील एकूण एक घटक हा अत्यंत प्रभावीपणे त्याची भूमिका बजावत असतो आणि त्या प्रत्येक घटकांकडे काहीतरी अशी ताकद आहे जी आपल्या सर्वासाठी कायम प्रेरणादायी आहे. झाडांकडून आपण इतरांना सावली देण्याचा गुणधर्म अंगिकारू शकतो. एखादी व्यक्ती संकटात असेल तर तिला आधार देणं हे कर्तव्य आपण निभावू शकतो.

नदीकडून आपण कायम वाहत राहण शिकलं पाहिजे म्हणजेच आपल्या मनात कधीचं कोणत्या पद्धतीचा राग धरून ठेवण्याऐवजी तो मोकळा करून लोकांना क्षमा करता आली पाहिजे. पर्वत, डोंगर यांच्याकडून आपण अचलपणा आणि स्तब्धता शिकली पाहिजे. आयुष्यात किती ही संकट आली तरी त्यांना न घाबरता त्यांचा सामना करण्याची शिकवण आपल्याला डोंगर, पर्वत देतात. कितीही वादळे आली तरी न डगमगता ते स्थैर्याने उभे राहतात तसेच आपण शिकले पाहिजे.

5. पक्षी

जसे पक्षी गगनात उंच झेपावतात आणि वेळप्रसंगी घरटे सोडून जायची तयारी ठेवतात म्हणजेच कधी मोहात अडकत नाहीत त्याप्रमाणे मनुष्याने ही मोह टाळून जगायला हवे ती शिकवण निसर्गात पक्षी आपल्याला देतात.

6 .प्राणी

जसे प्राणी निर्भीडपणे जंगलात वास्तव्य करतात आणि स्वतःच्या उपजीविकेचे साधन स्वतः शोधतात तसेच मनुष्याने देखील वागले पाहिजे. आपल्या उपजीविकेचे साधन त्याने स्वतः निर्माण करणे शिकले पाहिजे.

 

शिक्षण देणारा आणि घेणारा या दोघांनी ही या पवित्र संस्थेचे भान ठेवून वागले पाहिजे . आजच्या काळात शिक्षणाचे झालेले बाजारीकरण थांबवण्यासाठी आपण सर्वांनीच एकत्र येऊन परिश्रम केले पाहिजेत कारण जस मी वर सांगितलं त्याप्रमाणे एक चांगली शिक्षण पद्धती एक चांगला नागरिक घडवत असते जो पर्यायाने देशाची उन्नती करत असतो

Leave a Comment