Dhapate And Mirchicha Thecha Recipe: माझ्या सर्व खवय्या मित्रांसाठी मी आज एक पाककृती सांगणार आहे कदाचित ही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली असेलच तरीही ती सांगण्याचा मोह मला आवरता येणे अशक्य आहे. अस्सल कोल्हापुरी पद्धतीने धपाटे कसे बनवायचे हे मी आज लेखात सांगणार आहे. सर्वजण पाककृतीचे नाव ऐकून चकित झाला असाल, हे धपाटे म्हणजे आई किंवा बाबांच्या हातचे धपाटे नव्हे बर का? तर आईने आपल्या प्रेमळ हाताने बनवलेले धपाटे आहेत.
मी माझ्या आजी कडून आजवर पाहत आलेली ही कोल्हापुरी पद्धतीची धपाट्याची पाककृती आहे.कोल्हापूर म्हणजे रांगडेपणा, बाणेदारपणा.कोल्हापूर म्हणजे अस्सल गावरान तडका.कोल्हापूर म्हटल्यावर झणझणीत आणि चमचमीत हे शब्द आणि प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय मज्जाच येणार नाही.
Dhapate Recipe In Marathi
धपाट्यांबरोबर मिरचीचा ठेचा म्हणजे आहाहा स्वर्गच! आणि त्यासोबत दही म्हणजे सोने पे सुहागा!!!! काय म्हणता वर्णन ऐकून तोंडाला पाणी सुटलं???? चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करतात आजीच्या हातचे धपाटे आणि कोल्हापुरी पद्धतीचा मिरचीचा ठेचा.
कोल्हापुरी लोक तिखट खाण्यासाठी कधीच माघार घेत नाहीत. या रांगड्या खाद्यपदार्थाबद्दल नुसत वाचू नका तर लागलीच तयार करायला घ्या रुचकर धपाटे आणि झणझणीत मिरचीचा ठेचा.
धपाटे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- ज्वारीचे पीठ एक वाटी
- तांदळाचे पीठ अर्धी वाटी
- उडीद डाळीचे पीठ अर्धी वाटी
- कोल्हापुरी पद्धतीचा लाल तिखट मसाला
- हळद आवडीनुसार
- मीठ स्वादानुसार
- गोडेतेल आवश्यकतेनुसार
- ठेचलेला लसूण
- ठेचलेली मिरची
- गरम पाणी
पाककृती (धपाटे कसे बनवायचे)
- सर्वप्रथम परातीमध्ये सांगितलेल्या प्रमाणात ज्वारीचे पीठ तांदळाचे पीठ आणि उडीद डाळीचे पीठ घ्यावे.
- पिठामध्ये सर्वप्रथम हळद, लाल तिखट मसाला आणि मीठ स्वादानुसार टाकावे.
- सर्व पीठ एकजीव करून घ्यावे आणि त्यामध्ये ठेचलेल्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या टाकून गरज पडल्यास आवश्यकतेनुसार मीठ टाकावे.
- आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यावे.
- आता अंदाजानुसार गरम पाणी टाकून पीठ हळू हळू पण घट्टसर मळावे.
- पीठ मळताना ते भाकरी करतो त्याप्रमाणे राहील याची खबरदारी घ्यावी.
- पीठ मळून झाल्यानंतर गॅस वर तवा मंद आचेवर ठेवावा.
- आता पिठाचे गोळे बनवून भाकरी ज्याप्रमाणे थापतो त्याप्रमाणे धपाटे थापून घ्यावेत.
- धपाटे थापून झाल्यानंतर तव्यावर टाकावे.
- धपाटा तव्यावर टाकल्यानंतर त्यावर पाणी मारावे.
- पाणी मारल्यानंतर आपली बोटे धपाट्यामध्ये रुतवावीत.12. त्यानंतर धपाट्यावर तेल शिंपडावे.
- धपाट्यावर तेल शिंपडल्यानंतर दुसऱ्या ताटाच्या सहाय्याने धपाटा झाकून ठेवावा.
- अशा रीतीने धपाटा एका बाजूनेच भाजून घ्यावा.
- धपाटयाची वरची बाजूही वाफेने शिजली जाईल.
- धपाटा खालच्या बाजूने भाजल्यानंतर तो तव्यावरून खाली उतरवावा.
- धपाटा करपणार नाही याची दक्षता घ्यावी.
- अशा पद्धतीने गरमागरम धपाटा तयार.
हे पण वाचा: मुळ्याची भाजी मराठी रेसिपी
मिरचीच्या ठेच्यासाठी लागणारे साहित्य
- आठ ते दहा तिखट हिरव्या मिरच्या
- सात ते आठ लसूण पाकळ्या
- स्वादानुसार मीठ
- जिरे
पाककृती (Mirchicha Thecha Marathi Recipe)
- सर्वप्रथम गॅस वर तवा ठेवावा
- तव्यामधे तेल टाकावे
- तेल गरम झाले की त्यामध्ये अनुक्रमे जिरे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि स्वादानुसार मीठ घालावे.
- जिरे, लसूण पाकळ्या आणि मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर गॅस बंद करून तवा खाली उतरवून ठेवावा.
- तवा थंड झाल्यानंतर एका वाटीच्या सहाय्याने मिरची, लसूण आणि भाजलेले जिरे हे एकत्रितपणे वाटून घ्यावे.
- आवश्यकतेनुसार मीठ टाकावे.
अशा पद्धतीने झणझणीत मिरचीचा ठेचा तयार झाला. आम्हा कोल्हापूरकरांसाठी मिरची म्हणजे जीव की प्राण आमच्या ताटात मिरचीपासून तयार झालेला एक तरी पदार्थ ताटात आढळणारच. ताटामध्ये मस्त तयार केलेला धपाटा, मिरचीचा ठेचा आणि दही घेऊन या गावरान चवीचा तुम्ही सर्वांनी नक्की आस्वाद घ्यावा. धपाटा आणि ठेचा कसा झाला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा.
आपल्या परंपरागत पाककला जर आपण इतरांना सांगत गेलो तरच त्या जपल्या जातील आणि पुढच्या पिढीला देखील त्याचा आस्वाद घेता येईल, हा विचार करून आजचा हा लेख लिहिला आहे. आपल्या पारंपरिक पाककला तुमच्या समोर ठेवण्याचा हा एक छोटासा आणि झणझणीत प्रयत्न.. पूर्वीच्या काळात लोकांकडे जर भाजी उपलब्ध नसेल तर जेवढे साहित्य घरात उपलब्ध आहे त्याचा वापर करून असे रुचकर पदार्थ तयार केले जात असत.
यामध्ये पुढे जाऊन थालीपीठ, पराठे हे पदार्थ उदयास आले. एक कविता आठवली जी मी लहानपणी वाचली होती ती इथे चपखलपणे बसते,”जुन ते सोन, परंपरेचा तुम्हासाठी हा ठेवा. ज्यांना समजला त्यांना मेवा नाहीतर त्यांना ठेंगा.” एकूण काय तर तुम्हा सर्वांनी ही पाककला नक्की करून पाहावी असे माझे म्हणणे आहे. धपाटे खाल्ल्यावर पोट मस्त भरते आणि अगदी ते चवीला देखील एकदम चविष्ट असतात.
वेगवेगळ्या धान्यांपासून धपाटे बनवले जातात. तुम्ही तुमच्या आवडीची पिठे घेऊन देखील ही धपाटे बनवू शकता. तर मग वाट कशाची बघता? घरात जी उपलब्ध सामग्री आहे ती घेऊन लगेचच कामाला लागा. आजीबाईच्या बटव्यात जसे सर्व आजारांवर काहीतरी उपचार असतात तसेच तिच्या हातामध्ये साक्षात अन्नपूर्णाच वास करत असते. कमीत कमी साहित्यामध्ये देखील अगदी रूचकर असे जेवण बनवण्याची हातोटी आपण जुन्या पिढीकडून आत्मसात करू शकतो किंबहुना आपण ती आत्मसात केली पाहिजे.
शब्दशः नाव जरी धपाटे असले तरी आई बाबाचा मार नव्हे तर प्रेम यातून मिळते.प्रत्यक्षात मात्र हे धपाटे वारंवार खावे वाटतात. अशी ही जुन्या पिढीची पण झणका असलेला धपाटा आणि मिरचीच्या ठेचा नक्कीच चाखा. अशाच वेगवेगळ्या पाककला जाणून घेण्यासाठी आमच्या लेखाला भेट देत जा. तुमच्यासाठी काहीतरी वेगळे आणि लोप पावत चाललेले खाद्यपदार्थ समोर आणायला आम्ही सदैव तत्पर आहोत.