Nag Panchami Nibandh Marathi: भारताला सणांचा खूप मोठा वारसा लाभला आहे. सणांचे महत्व भारतीय संस्कृती मध्ये अनन्यसाधारण आहे, सणांमागे शास्त्रीय कारणे देखील उपलब्ध आहेत. भारतात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी सण साजरा करण्यामागे निसर्ग आणि त्यातील प्राणीमात्रांविषयी कृतज्ञता व्यक्त होत असते. प्रस्तुत लेखामध्ये आपण या नागपंचमी सण या विषयावर १०० ते ५०० शब्दांमध्ये निबंध लिहिलेला आहे. या निबंधामध्ये नागपंचमी सण आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे
Nag Panchami Essay In Marathi
नागपंचमी म्हटलं की आपसुकच डोळ्यासमोर उभी राहते ती नागदेवतेची प्रतिमा. भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणाचे असे एक अनन्य साधारण महत्व आहे. या परंपरा श्रद्धा अथवा अंधश्रद्धेच्या माध्यमाने जोपासल्या जात आहेतच. अंधश्रद्धे मागचे आणि श्रद्धे मागचे विज्ञान समजून घेतले तर सणांचा आनंद अजूनच द्विगुणित होऊन जातो.
नागपंचमी हा सण लहान मुले स्त्रिया यांच्या आवडीचा आहे. लहान बालगोपाल सुंदर सुबक नागदेवतेची प्रतिमा बनवतात आणि मग स्त्रिया त्या नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून त्याचे आभार व्यक्त करतात. आजच्या धकाधकीच्या काळात अनेक जणांना प्रत्यक्ष स्वतःच्या हातांनी नागदेवतेची प्रतिमा बनवणे शक्य होत नाही त्यामुळेच बाजारात तयार मूर्ती मिळतात त्यांचीच पूजा नागपंचमीच्या दिवशी केली जाते.
जुन्या मराठी चित्रपटांमध्ये आपल्या नागपंचमी सणाचा उल्लेख वारंवार आढळतो. नागपंचमी हा सण निसर्गाबद्दल कृतज्ञता म्हणूनही साजरा केला जातो.”चला ग सयांनो वारुळाला पुजायला”, असं म्हणत गावातील प्रत्येक महिला नागपंचमीला नागाला पुजायला शेतामध्ये जात असते.
हे पण वाचा: शिक्षण म्हणजे काय – शिक्षण कोण घेऊ शकते?
नाग म्हटलं की समोरच्या व्यक्तीची बोबडीच वळते. आपण लगेचच इकडे तिकडे धावायला सुरू करतो. मात्र आपण जर त्याला डिवचलो नाही तर तो देखील आपल्याला त्रास देणार नाही हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्यक्षात नाग हा दूध कधीच पीत नसतो ते त्याचे खाद्य नाही.
नाग दूध पितो ही चुकीची समज समाजामध्ये पसरलेली आहे.नाग हा शेतकऱ्याचा मित्र असतो तो शेतातील धान्याची नासाडी करणाऱ्या उंदीर व इतर प्रकारच्या प्राण्यांना खाऊन शेतकऱ्यांना एक प्रकारची मदतच करत असतो. तसेच सजीवांच्या जीवनसाखळीतील तो एक महत्वाचा घटक आहे. अशाप्रकारे जीवनसाखळी ही अबाधित ठेवण्यामध्ये नागांचा देखील अगदी महत्वाचा वाटा असतो.
नागपंचमी साजरी करण्यामागे भारतात एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाने आपल्या बाललीलांनी संपूर्ण वृंदावनातील लोकांना आपले वेड लावले होते. श्रीकृष्ण जेव्हा बालगोपाळांबरोबर यमुनेच्या नदीकिनारी विधी दांडूचा खेळ खेळत होते तेव्हा विटी यमुनेच्या पाण्यात गेली ती काढण्यासाठी श्रीकृष्ण पाण्यात गेले आणि तिथे त्यांचा सामना कालिया नावाच्या मोठ्या नागाशी झाला. हा कालिया नाग आपल्या ताकदीच्या जोराने खूप माजला होता.
श्रीकृष्ण वयाने लहान होते त्यामुळे कालिया नागाला असे वाटले की ते श्रीकृष्णाला इजा पोहोचवू शकतात पण प्रत्यक्षात श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार असल्याकारणाने त्यांनी कालिया नागाचे गर्वहरण केले. अशा प्रकारे कालिया नागाचे मर्दन करून श्रीकृष्ण नी त्याचा उद्धार केला, कालिया नागाला त्याच्या चुकीची उपरती झाली आणि तो यमुनेच्या नदीपात्रातून निघून गेला तसेच पुन्हा मी कोणालाही त्रास देणार नाही अशी कबुली त्याने श्रीकृष्णांना दिली.
अशा प्रकारे श्रीकृष्णाने कालिया नागाचा उद्धार केला. हा दिवस म्हणजेच श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी होय. हा पंचमीचा सण म्हणजेच आपण सर्वजण ज्याला नागपंचमी असे म्हणतो. नागपंचमीच्या सणाची अजून एक गंमत आहे ती म्हणजे श्रावणातला हा पहिला सण आला की सासरवासीन असलेल्या बायकांना माहेराची ओढ लागते. गावामध्ये जिथे नागदेवतेची पूजा केली जाते अशा मंदिरामध्ये गावातील बायका पूजेचे साहित्य सोबत दूध घेऊन जातात आणि नागोबाला फुले दूध वाहतात नैवेद्य दाखवतात.आणि फुगडी झिम्मा असे खेळ खेळतात.
त्याचप्रमाणे झाडाला झुला बांधून त्यावर झोके घेत आपले बालपणीचे माहेरचे सुंदर दिवस स्त्रिया आठवतात. अशा प्रकारे या सणामुळे कितीतरी स्त्रियांना काही काळापुरता माहेरी आराम आणि माहेरच्या प्रेमळ आठवणींमध्ये रमून जातात. अशा प्रकारे या सणाच्या निमित्ताने स्त्रिया देखील आराम अनुभवतात म्हणून नागपंचमीचा सण स्त्रियांचा सर्वात आवडता सण देखील आहे.आपली भारतीय परंपरा जगात सर्वात सुंदर का आहे माहित आहे का? कारण या परंपरेमध्ये प्राणी, पक्षी, माणूस या सर्व सजीवांना एक समान न्याय आहे .
प्रत्येकाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण भारतीय म्हणून पाहतो आणि जगतो सुद्धा. प्राण्यांसाठी सण साजरे केले जातात असा भारतासारखा देश कुठेही शोधून सापडणार नाही.
Nag Panchami Essay In Marathi 10 Lines
- नागपंचमी हा सण भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात अगदी आनंदाने साजरा केला जातो.
- श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीलाच नागपंचमी असे संबोधतात.
- नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया देवळात जाऊन नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करतात अथवा शेतकरी शेतात जाऊन वारुळाच्या भोवती नागदेवतेसाठी आस्था म्हणून दूध वगैरे ठेवतात.
- नाग हा प्राणी कधीच दूध पीत नाही.
- नाग हा प्राणी उंदीर आणि तत्सम प्राणी खाऊन आपले आयुष्य जगतो.
- नाग उंदीर खातो त्यामुळे शेताची आणि धान्याची नासाडी टळते .
- परिणामी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवून त्याचा फायदा करण्यात नागाचा मोठा वाटा आहे .
- नागाबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
- येथे शेतकरी राजा नागाला प्राणी म्हणून न वागवता देवता म्हणून वागवते.
- आपल्या आजूबाजूच्या सजीव सृष्टीतील प्राणी आणि त्यांच्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करणे ही भारतीय म्हणून आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
फक्त नागच नाही तर बैलांना आराम मिळावा म्हणून आपल्या देशात बैलपोळा साजरा केला जातो. गाय तर भारतीय संस्कृतीत आईच्या ठिकाणी मानली जाते. वसुबारस हा सण देखील त्यांपैकीच अशी कितीतरी उदाहरणे आहेत. सांगेन तेवढं थोडंच.असो,आमच्या पुढील लेखांमध्ये आपले भारतीय सण आणि त्यांचे महत्त्व सांगण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. आपल्या सणांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आमचा मानस राहील. तुम्हाला हा (नागपंचमी निबंध मराठी) लेख कसा वाटला हे अभिप्राय देऊ नक्की कळवा आणि असेच नवीन लेख वाचण्यासाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या. धन्यवाद!