Gudhipadwa San Essay In Marathi: गुढीपाडवा सणावर निबंध मराठी

Gudhipadwa San Marathi Nibandh: मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण साजरे केले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सण साजरे केले जातात त्यांना आध्यात्मिक त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. नुकताच होळीचा सण साजरा झाला. होळी साजरी झाल्यानंतर चाहूल लागते ती मराठी नववर्षातील पहिल्या सणाची. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला येणारा सर्वात पहिला सण म्हणजे गुढीपाडवा.

मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच होय. गुढीपाडवा या सणाच्या नावामध्येच त्याचे गुपित दडलेले आहे. या दिवशी आपण सर्वजण आपल्या घराबाहेर अथवा अंगणामध्ये अथवा आज-काल फ्लॅटच्या गॅलरीमध्ये देखील गुढी उभारतो. ही गुढी उभारताना आपण त्यासाठी बांबूच्या काठीचा वापर करतो. त्या काठीला स्वच्छ धुऊन त्यानंतर तिला हळदीकुंकू लावून पुजले जाते. काठीच्या पूजेनंतर तिच्यावर मांगल्याचे प्रतीक समजला जाणारा कलश चढवला जातो. कलशाच्या बाजूने एखादे नवीन कापड गुंडाळले जाते. कलशासोबत आणि सुंदर अशा नवीन कापडासोबत गोड साखरेची लढ बांधली जाते. गुढीपाडवा या सणाला चाफ्याच्या फुलांचा हार गुढीला चढवला जातो. मोठ्या दिमाखाने ही गुढी पाटावरती उभी करून घराच्या उजव्या बाजूला बांधली जाते.

गुढी पूजनाची एक वेगळीच लगबग आपल्याला सर्वत्र आढळते. गुढीपाडव्याच्या दिवशी ही उभारलेली गुढी आपल्याला दुष्ट गोष्टींवर चांगल्या शक्ती विजय मिळवतात हे सांगत उभी राहते. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी सर्वांना माहीत असलेली कथा म्हणजे रामायणातील. जेव्हा भगवान श्रीरामचंद्र यांनी लंकेवर विजय मिळवून रावणाचा पराभव करून सीतेला परत मिळवले आणि ते पुन्हा अयोध्येत आले तेव्हा त्यांच्या या विजयासाठी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजयी गुढी उभारल्या असे म्हटले जाते.

गुढीपाडवा या दिवशी साक्षात ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली असे म्हटले जाते. सृष्टी निर्माण झाली त्याचा हा दिवस असे देखील गुढीपाडव्याला म्हटले जाते. शालिवाहन राजाने शकसंवत्सराची सुरुवात याच दिवशी केली असे काही ठिकाणी म्हटले जाते म्हणून देखील नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्या बरोबर चैत्राचे देखील आगमन होते. चैत्र महिन्यामध्ये झाडाला नवीन पालवी फुटू लागते. त्याप्रमाणेच माणसाने देखील नवीन सुरुवात केली पाहिजे असेच हसन आपल्याला सांगत असतो.

गुढीपाडवा साजरा करताना सगळ्यात पहिला मान जातो तो कडुलिंबाच्या पानांना आणि गुळाला. गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील स्त्रिया कडुलिंबाची पाने आणि गूळ एकत्र करतात आणि तो घरातील सर्वांना खायला देतात. आयुष्यामध्ये कडू आणि गोड गोष्टी पचवायला जर आपण शिकलो तर आयुष्य सहज सोपे होऊन जाते हा संदेशच जणू यामागे दडलेला आहे.

अनेक खेडोपाडी चैत्राच्या आगमनानंतर यात्रांना सुरुवात होते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो म्हणूनच या दिवशी चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते. आज काल बहुतांश लोक हे नवीन कार, सोने घेण्यासाठी या दिवसाची निवड करतात. काही ठिकाणी जमिनीचा पाया खणताना देखील या दिवसाची वाट बघितली जाते. गुढीपाडव्या दिवशी एखादे काम आपण जर सुरू केले तर ते काम योग्य रीतीने पूर्ण होते असा आशय यामागे दडलेला आहे.

गुढीपाडव्या दिवशी घरात सर्वजण स्वतःला आणि इतरांना नवीन कपडे घेतात. गुढीपाडव्या दिवशी काही नवीन खरेदी केले तर ते कायम लाभते असे देखील म्हटले जाते. गुढीपाडव्या दिवशी घरामध्ये मस्त पुरणपोळीचा बेत केला जातो. काही ठिकाणी श्रीखंड पुरी तर काही ठिकाणी आमरस पुरी देखील केली जाते. वर्षाच्या सुरुवातीचा दिवस गोडधोड खाऊन साजरा केला जातो.

आजकाल बहुतांश शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक गावांमध्ये देखील सार्वजनिक मिरवणुका काढल्या जातात. आपल्या हिंदू संस्कृतीचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. आजच्या काळामध्ये जिथे अनेक संस्कृती लोप पावत चालल्या आहेत तिथे असे सण साजरे केल्यामुळे आपण आपल्या संस्कृतीला योग्य न्याय देतो.

महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदाने आणि हर्ष उल्हासाने साजरा केला जातो. लहान थोर एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात. आपणही सर्वजण येणाऱ्या गुढीपाडव्याला आनंदाने साजरा करूया आणि चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया.

गुढीपाडवा सण या विषयावर दहा ओळींमध्ये निबंध

  1. दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
  2. भारतीय पौराणिक कथेनुसार श्रीरामांनी रावणाला पराजित केल्यानंतर ते अयोध्येमध्ये जेव्हा परत आले तेव्हा अयोध्ये मधील सर्व नागरिकांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते.
  3. ब्रह्मदेवांनी गुढीपाडवा या दिवशी सृष्टीची निर्मिती केली असे देखील काही पुराणांमध्ये म्हटले जाते.
  4. शालिवाहन राजाने शकसंवत्सराची सुरुवात याच दिवशी केली असे म्हटले जाते.
  5. गुढीपाडवा या दिवशी बांबूची काठी ही गुढी म्हणून वापरली जाते.
  6. गुढीला कलशाने सजवले जाते सोबतच साखरेच्या गाठी देखील त्याला बांधल्या जातात.
  7. गुढीपाडवा या दिवशी कडुलिंब आणि गूळ एकत्र करून तो खायला दिला जातो.
  8. गुढीपाडव्याच्या दिवशी घरी पुरणपोळीचा बेत केला जातो.
  9. गुढीपाडवा या दिवशी नवीन शुभकार्याची सुरुवात केली जाते.
  10. वाईट गोष्टींवर चांगली गोष्ट कायम विजय मिळवत असते असा संदेश गुढीपाडवा या सणांमधून दिला जातो.

गुढीपाडवा हा सण कधी साजरा केला जातो?

चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

गुढीपाडवा या सणामधून कोणता संदेश दिला जातो?

वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टी कायम विजय मिळवत असतात असा संदेश गुढीपाडवा या सणामधून दिला जातो.

कोणत्या राजाने गुढीपाडवा या दिवशी शकसंवत्सराची सुरुवात केली होती?

शालिवाहन राजाने गुढीपाडवा या दिवशी शकसंवत्सरा ची सुरुवात केली होती.

Leave a Comment