Nadichi Aatmkatha Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग आपल्याला त्याच्या कवेत सामावून घेतो. या निसर्गामध्ये डोंगर, पर्वत, नदी, सागर सगळे एकत्र असतात आणि माणसाच्या प्रगतीचे हे वाटेकरी देखील आहेत. हेच नदी, डोंगर जर बोलू लागले तर कितीतरी गोष्टी उलगडतील. हाच विचार मनात धरून आज मी निबंधाचा विषय निवडला आहे. आज आपणनदीची आत्मकथा या विषयावर १०० ते ५०० शब्दांमध्ये तसेच दहा ओळींमध्ये निबंध पाहणार आहोत. चला तर मग पाहूया नदीची आत्मकथा या विषयावर दहा ओळींमध्ये निबंध
माझ्या लेकरांनो, मी तुमची लाडकी नदी बोलत आहे. असे आश्चर्यचकित होऊ नका खरंच मी बोलतीये. इतक्या वर्ष मनामध्ये ज्या ज्या गोष्टी साठवून ठेवल्या आहेत आणि माझ्या नजरेसमोर जे जे मी पाहिले आहे ते आज सगळं मला इथं बोलायचं आहे.
तुम्ही मला जीवन वाहिनी म्हणता. कोणी मला माय म्हणून हाक मारते. मीही तुमच्यावर माझ्या लेकरांप्रमाणे प्रेम करते. आज आपण माय लेकरं हितगुज करूया.
“नदी सागर मिळता, पुन्हा येईना बाहेर,
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर “
तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल ही कविता नक्कीच ऐकली असेल. कवीने यामध्ये माझ्या मनातील भावना, माझी व्याप्ती अधोरेखित केलेली आहे. या कवितेतील ओळी मला अगदी माझ्या आयुष्याशी तंतोत वाटतात.असे म्हणतात की ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ कोणीही विचारू नये. खरंच आहे की जर कोणी माझा तळ गाठायचा ठरवले तर तो शोधणे अवघड आहे.
माझा उगम एके ठिकाणी होतो मात्र मी तिथे थांबत नाही मी अविरत वाहत राहते. वाहत जाणे हा माझा स्थायी धर्म आहे. माझ्या वाहण्याने मी तर मोठी होतेच पण त्याचबरोबर माझ्यावर त्यांचे ज्यांचे आयुष्य चालते अशा सजीवांना मी जीवन देत जाते.
तुम्ही सर्वजण मला जीवन वाहिनी म्हणतात कारण पाणी जे जीवन आहे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा पवित्र काम माझ्या कडे दिलेले आहे.मी जेव्हा नदी होऊन वावरते तेव्हा आजूबाजूची जमीन सुपीक होऊन जाते.
माझ्या आजूबाजूचा परिसर अत्यंत हिरवा गार असतो. तिथे उगवलेल्या गवतावर कितीतरी शाकाहारी प्राणी स्वतःची भूक भागवतात. प्रत्येक नदीचे एक उगम स्थान असते. तिथून पुढे ती वाहत जाते आणि जीवन वाटत जाते.माझे पाणी हे चवीला अत्यंत मधुर असते त्यामुळे सर्वजण पिण्यासाठी त्याचा वापर करतात.
नदीच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी स्त्रिया घरातील कपडे आणि भांडी धुतात. काही ठिकाणी तर जनावरे देखील तासनतास माझ्या पाण्यामध्ये डुंबत बसतात.जेव्हा माझी ही सगळी लेकरे माझ्या पाण्याचा आस्वाद घेत असतात तेव्हा त्यांची मिटलेली तहान बघून मी अत्यंत आनंदित होते आणि तृप्त होते.
इतरांना प्रेम वाटत जाणे हाच माझा धर्म आहे.आपल्या संस्कृतीमध्ये तर तुम्ही सर्वांनी मला मातेचा दर्जा दिलेला आहे. भगवान शंकरांच्या जटेमध्ये त्यांनी मला स्थान दिलेले आहे. याहून मोठे अढळ स्थान ते कोणते? तुम्ही सर्वांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलेले आहे ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही.
माझ्या आजूबाजूला कायम माणसांचा आणि प्राण्यांचा राबता असतो. माझ्या पाण्यासोबत जो मातीचा गाळ आलेला असतो त्यामध्ये तर फळ शेती इतकी छान येते प्रत्येक फळभाजीला खूप छान चव येते.मला तुम्हा सर्वा मुलांवर खूप अभिमान आहे मात्र मला तुमच्याशी काही महत्वपूर्ण गोष्टींवर बोलायचे आहे.
मुलांनो जशी तुम्ही या पृथ्वीवरची माझी लेकरे आहात आणि माझ्या पाण्यावर तुमचा अधिकार आहे त्याचप्रमाणे तो अधिकार पृथ्वीवरील इतर सजीव जीवांना देखील आहे. जेव्हा माझ्या नवी तीरावर एखादा पशु पाणी पिण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही मनुष्य त्याची शिकार करता. प्रत्यक्षामध्ये तो प्राणी स्वतःची तहान भागवण्यासाठी तिथे आलेला असतो आणि स्वतःची तहान भागवणाऱ्या प्राण्यावर तुम्ही जो छुपा वार करता आणि त्याचा खून करता हे आपल्या मनुष्य धर्माला न शोभण्यासारखे आहे.
आपल्या येथे विविध प्रकारची फळे, भाज्या या खाण्यासाठी उपलब्ध आहेत मात्र तुम्ही पशुपक्ष्यांची शिकार करून स्वतःचे पोट भरता हे मला आवडत नाही.
पूर्वी जेव्हा औद्योगीकरण झाले नव्हते तेव्हा मी भरपूर स्वच्छ होते मात्र तुम्ही औद्योगीकरण केले आणि सांडपाणी सोडण्याकरता माझा वापर केला.
एका बाजूला तुम्ही मला तुमची आई म्हणवता आणि दुसरीकडे मात्र घाणेरडे पाणी माझ्या पाण्यामध्ये सोडून मोकळे होता. मी हा देखील त्रास सहन केला असता मात्र माझे हे पाणी पुढे विविध ठिकाणी जात असते आणि ते खूप जण पितात.
माझ्या दूषित पाण्यामुळे लोकांना प्राण्यांना विविध प्रकारचे आजार होतात प्रसंगी मृत्यू देखील ओढावतो. मुलांनो तुमच्या एका चुकी मुळे कितीतरी जीवांचे अतोनात हाल होत आहेत.
माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याच्या पद्धती अवलंबाव्या आणि ते पाणी नदीमध्ये म्हणजेच माझ्यामध्ये सोडू नये.
ज्याप्रमाणे तुम्ही मनुष्य माझी मुले आहात त्याप्रमाणे निसर्गातील इतर घटक देखील माझी मुले आहेत आणि तुम्हा सर्वांचे पालन पोषण करणे हे माझे कर्तव्य आहे.तुम्ही प्लास्टिक वगैरे माझ्या पाण्यामध्ये टाकत जाऊ नका त्यामुळे जे पाण्यामध्ये राहणारे जलजीव आहेत त्यांना अतोनात त्रास होतो तसेच त्यांच्या प्रजातींची संख्या देखील धोक्यात येते.
माझे तुम्हा सर्वांकडे एकच मागणे आहे की तुम्ही इतर सजीवां बरोबर गुण्या गोविंदाने एकत्र नांदावे आणि माझा येथेच उपभोग घ्यावा. माझा शेवट हा समुद्रामध्ये मिसळून होतो. काही लेखक म्हणतात की नदीचा सागर होतो. त्याप्रमाणे तुम्ही देखील व्यापक विचार करायला शिका. शेवटी तुम्ही माझीच लेकरे आहात.
नदीची आत्मकथा या विषयावर 10 ओळींमध्ये निबंध
- मी नदी आहे, तुमची जीवनवाहिनी बोलत आहे.
- डोंगरातून उगम पावून मी अखंड वाहत राहते.
- माझ्या पाण्यामुळे शेती फुलते आणि जीवन समृद्ध होते.
- माणूस, पशुपक्षी व वनस्पती सर्वांनाच मी जीवन देते.
- मला मातेचा दर्जा देऊनही माझे पाणी प्रदूषित केले जाते.
- सांडपाणी आणि प्लास्टिकमुळे माझे अस्तित्व धोक्यात आले आहे.
- मी तक्रार न करता सर्वांना प्रेम देत राहते.
- माझ्या काठावर संस्कृती, संस्कार आणि संस्कृती वाढली.
- शेवटी मी सागरात विलीन होऊन व्यापक रूप धारण करते.
- मला वाचवा, कारण मला वाचवणे म्हणजे स्वतःला वाचवणे होय.
नदीला जीवनवाहिनी का म्हणतात?
नदीला जीवनवाहिनी म्हणतात कारण नदी पाणी पुरवून मानव, प्राणी व शेतीचे जीवन टिकवते.
नदीचा उगम कुठे होतो?
नदीचा उगम प्रामुख्याने डोंगर, पर्वत किंवा हिमनद्यांमध्ये होतो.
नदी प्रदूषित होण्याची कारणे कोणती?
औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा व मानवी निष्काळजीपणा ही नदी प्रदूषित होण्याची कारणे आहेत.
नदी प्रदूषणाचे परिणाम काय होतात?
नदी प्रदूषित झाल्यामुळे पाणी दूषित होते, आजार पसरतात व जलजीव नष्ट होतात
नदीचे संरक्षण कसे करता येईल?
नदीमध्ये कचरा न टाकणे, सांडपाणी प्रक्रिया करणे व जनजागृती करणे यांमधून नदीचे संरक्षण करता येईल.