Majha Maharashtra Essay In Marathi: माझा महाराष्ट्र निबंध मराठी 100 ते 500 शब्द आणि 10 ओळींमध्ये

My Maharashtra Essay In Marathi: आपला भारत देश हा एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष देश आहे. आपल्या देशाने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. भारत देशामध्ये एकूण 28 राज्य आहेत तर आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. या सर्व प्रदेशांना भौगोलिक ,ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. प्रत्येक भागामधील पोशाख, संस्कृती वेगवेगळी आहे तरीही भारत देशामध्ये सर्व लोक हे एकत्रितपणे आनंदात राहतात. या अशा महान राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र या राज्यावर आज आपण शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर केलेला आहे चला तर मग पाहूयात ‘माझा महाराष्ट्र‘ या विषयावर आधारित शंभर ते 500 शब्दांमध्ये निबंध

Majha Maharashtra Essay In Marathi

महाराष्ट्र या नावातच या राष्ट्राचं अर्थात या राज्याचं महत्त्व दडलेल आहे. महान असे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याला थोर अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संत, महान राजे जन्माला आले. या थोर लोकांनी महाराष्ट्राच्या पावन भूमीला कृतकृत्य केले.

महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी विचारांचे आहे. पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्र राज्य हे कित्येक क्षेत्रांमध्ये सर्वत्र आघाडीवर देखील आहे. महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक कलागुणांना नेहमीच वाव देत राहते. महाराष्ट्र राज्याने अनेक साहित्यिक, संगीतकार, कवी, उद्योजक, कलाकार दिले आहेत.

महाराष्ट्र राज्याला थोर अशी वारकरी परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये वारकरी संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदाय केवळ भक्तीच नव्हे तर अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण ही पुरोगामी विचारांची आहे इथे मनुवादी विचारांना धारा बिलकुल नाही.

वारकरी समाजाचा पाया घालणारे अनेक महान संत या महाराष्ट्र भू ला लाभले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत निवृत्ती, संत एकनाथ असे कित्येक संत महाराष्ट्राच्या भूमी मध्ये होऊन गेले. या सर्व संतांनी येथील लोकांना समानतेचे धडे दिले.

या समाजामध्ये कोणीही अस्पृश्य नाही सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत असा संदेश या संतांनी दिला. माणसाने फक्त बसून राहण्यापेक्षा काबाडकष्ट करून स्वतःची उपजीविका करावी आणि त्यासोबतच समाजाला हातभार लागेल असे कार्य करावे ही शिकवण देखील संतांनी येथील लोकांना दिली.

संतांनी स्त्री-पुरुष समान आहेत आणि त्यांना सर्व गोष्टींमध्ये समान अधिकार आहेत हे समाजाला सांगितले. संतांच्या या पुरोगामी विचारावर च आजचा महाराष्ट्र उभा आहे असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र भूमी मध्ये होऊन गेलेले सर्वात मोठे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी या थोर संत परंपरेला आश्रय दिला शिवाय या परंपरेचे परकीय आक्रमणापासून रक्षण देखील केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र भूमी मध्ये अशा काळात जन्मले होते जेव्हा या महाराष्ट्र भूमीवर परकीय मुलुख अनन्वित अत्याचार करत होता. या अत्याचाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी निकराने लढा दिला. छत्रपतींनी प्रत्येक मावळ्याला लढण्यासाठी प्रेरित केले आणि स्वराज्याची संकल्पना बोलून दाखवली आणि पुढे ती अस्तित्वात देखील आणली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकोट किल्ले जिंकले आणि त्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. शिवाजी महाराजांनी जिंकलेले हे गडकोट किल्ले आज महाराष्ट्राच्या भूमी मध्ये अगदी दिमाखात उभे आहेत आपल्याला या गडकोट किल्ल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार तर केलाच पण त्याचबरोबर त्यांनी इतर धर्मांचे कधीही अपमान केला नाही तर त्यांनी इतर धर्मांचा देखील आदर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील आपल्या वडिलांनी केलेल्या कामगिरीला साजेसे कर्तुत्व स्वतः देखील केले. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील या महाराष्ट्र भू साठी स्वतःचे रक्त सांडले.

महाराष्ट्राच्या या पावन भूमीमध्ये असे थोर राजे होऊन गेले या राजांना एकदा नाही शतशा नमन केले तरी ते कमीच आहे. महाराष्ट्र भूमीच्या वाढीसाठी जे जे शक्य होते तेथे या महान राजांनी आणि महान संतांनी केले त्यामुळेच आजचा महाराष्ट्र उभा आहे.
महाराष्ट्र भूमीला सह्याद्रीची पर्वतरांग लाभली आहे. ही सह्याद्रीची पर्वत रांग महाराष्ट्र राज्याचे एक प्रकारे सुरक्षा कवचच म्हणावे लागेल.

महाराष्ट्र भूमीला सुंदर असा निसर्ग लाभला आहे सर्वात मोठी किनारपट्टी महाराष्ट्र भूमीतील कोकणाला लाभलेली आहे. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे 1960 रोजी झाली आहे. महाराष्ट्र राज्याचा निर्मितीसाठी 105 क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे जी आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखली जाते.

मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे. मुंबईमध्ये अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत. मुंबई मधून अनेक सिने कलाकार, खेळाडू महाराष्ट्राला मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई हे असे शहर आहे की जे स्वप्न बघणाऱ्याला आणि त्यासाठी कष्ट करणाऱ्याला कायमच खूप मोठे करते.

महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारची पिके घेतली जातात. हापुस आंबा हा तर जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस, कापूस, ज्वारी ही पिके मोठ्या प्रमाणावर होतात. महाराष्ट्रामधील लोकांचा स्वभावही अगदी मनमिळावू आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगळी भाषा बोलली जाते जसे की अहिराणी भाषा, कोकणी भाषा.

महाराष्ट्रामधील स्त्रियांचा पेहराव हा नऊवारी साडी आहे तर शहरी भागामध्ये आधुनिक पेहराव केले जातात. पुरुष हे प्रामुख्याने धोतर,पायजमा घालतात. महाराष्ट्रामध्ये पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते इथे सर्वच स्तरातून लोक शिक्षणासाठी आवर्जून येत राहतात. महाराष्ट्राच्या भूमी मधून कृष्णा, गोदावरी या नद्या वाहतात. या जीवनदायी नद्यांचा इतिहासही फार सुंदर आहे.असा हा विविधतेने नटलेला माझा महाराष्ट्र मला कायमच आवडतो.

Majha Maharashtra Nibandh In Marathi 10 Lines: माझा महाराष्ट्र निबंध 10 ओळी

  1. महाराष्ट्र या राज्याला थोर ऐतिहासिक आणि भौगोलिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.
  2. महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये अनेक थोर महान संत होऊन गेले म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी असेही म्हटले जाते.
  3. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोर असे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
  4. महाराष्ट्र हे भारतातील विकसनशील राष्ट्रांपैकी एक आहे हे एक आधुनिक राज्य आहे.
  5. महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त आहे जसे की मुंबई आणि पुणे.
  6. महाराष्ट्रातील पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते देश-विदेशातून शिक्षण घेण्यासाठी इथे येणारा लोंढा फारच मोठा आहे.
  7. महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीमध्ये नवनवीन उपक्रम राबवले जातात तसेच येथे ऊस, ज्वारी, कापूस, डाळ ही पिके प्रामुख्याने घेतली जातात.
    8.मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे तर नागपूर ही उपराजधानी आहे.
  8. महाराष्ट्रातील कोकणाला फार मोठी समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
  9. महाराष्ट्रामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव हे सण साजरे केले जातात.

आज आपण माझा महाराष्ट्र या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. आपणास माझा महाराष्ट्र या विषयावरील निबंध कसा वाटला ते आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपणास अशाच नवनवीन विषयांवर वेगवेगळे निबंध वाचायला आवडत असतील तर आमच्या साईटला नक्की भेट द्या. धन्यवाद!

Leave a Comment