Makarsankranti Essay In Marathi: मित्रांनो भारत या देशांमध्ये प्रत्येक सण आणि समारंभ साजरा करण्यामागे अध्यात्म तर आहेच मात्र त्या अध्यात्मामध्ये जे शास्त्र लपलेले आहे ते आज फार क्वचितच लोकांना ठाऊक आहे. आमचा प्रयत्न त्या अध्यात्मामध्ये जे शास्त्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे.
मकर संक्रांत हा सण भारतामध्ये विविध नावांनी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये याला मकर संक्रांती असे म्हटले जाते तर आसाम मध्ये याला बिहू असे म्हटले जाते. पंजाब मध्ये मकर संक्रांति हा सण लोहडी या नावाने साजरा केला जातो.जेव्हा सूर्य हा धनु राशि मधून मकर राशि मध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात.
मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते याचाच अर्थ लोकांसाठी कामाची वेळ वाढते म्हणजेच नवीन संधींची वेळ वाढते असे समजले जाते. हा वाढलेला वेळ योग्य ठिकाणी खर्ची घातला गेला तर त्यातून आपली प्रगतीच होते म्हणूनच हा सण मोठ्या उल्हास आणि आनंदाने साजरा केला जातो.
पौराणिक काळामध्ये जिथे महाभारताचा उल्लेख सापडतो. महाभारतामध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावर पितामह भीष्म हे बाणांच्या मृत्यू शय्येवर पडले होते तेव्हा इच्छा मरणाचे वरदान असूनही त्यांनी आपल्या मृत्यूसाठी उत्तरायणाची वेळ निवडली होती. उत्तरायण सुरू होणे म्हणजे चांगला काळी येणे असे भारतीय परंपरेमध्ये मांडले जाते म्हणूनच पितामह भीष्म यांनी देखील आपल्या जाण्यासाठी उत्तरायणाची वेळ निवडली होती.
मकर संक्रांत हा सण भारतामध्ये 14 जानेवारी आणि जर लीप वर्ष आले तर 15 जानेवारी या दिवसांमध्ये साजरा होतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांति ही पौष महिन्यामध्ये दहाव्या दिवशी येते. मकर संक्रांतीचा संबंध हा आपल्या भारत देशाशी अत्यंत जवळचा आहे कारण हा सण शेतीशी निगडित देखील मानला जातो.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याकारणाने येथे शेतीशी निगडित असलेली कामे ही सूर्यदेवतेच्या कृपेने चालू असतात. जेव्हा उत्तरायण सुरू होते तेव्हा शेतात कापणी आणि इतर कामे चालू असतात. शेतात आलेली पिके जसे की ऊस, पावटा, हरभरा, वाल, बोरे आणि इतर शेंगांच्या भाज्या या एकत्र तयार केल्या जातात.
मकर संक्रांतीच्या आधी थंडीचे वातावरण असते. वातावरणातील थंडीमध्ये तग धरण्यासाठी उष्णतेची आवश्यकता असते. भोगीमध्ये ज्या भाज्या वापरल्या जातात त्यामध्ये तिळाचा कूट घातला जातो. येथे तीळ म्हणजे स्निग्धता होय. स्निग्धता म्हणजेच स्नेह असेही म्हणता येईल.
शरीरामध्ये उष्णता टिकून राहण्यासाठी आणि थंडीचा सामना करण्यासाठी तिळापासून बनवलेले पदार्थ खाण्याची प्रथा मकर संक्रांतीमध्ये दिसून येते.मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी करून सर्वजण ती आवडीने खातात. भोगीच्या भाजीबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी आवडीने खाल्ली जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील स्त्रिया नवीन कपडे आणि दाग दागिने घालून देवाची पूजा करतात. संक्रांत ही देवी जी कपडे घालून आपल्या वाहनावर आलेली असते तो रंग टाळून इतर रंगांची वस्त्रे परिधान केली जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रामुख्याने काळा रंग परिधान केला जातो.
मकर संक्रांतीच्या दिवशी लोक पतंग उडवतात. घरातील स्त्रिया गुळ आणि तिळापासून लाडू अथवा वड्या तयार करतात. तिळगुळ पोळ्या तर सर्वांच्या आवडीचा विषय असतो. तिळाने उष्णता टिकून ठेवली जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व आबाला वृद्ध एकमेकांना भेटतात आणि एकमेकांमधील हेवेदावे संपवण्यासाठी एकमेकांना तिळगुळ भेट म्हणून देतात.”तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा वाक्प्रचार देखील या सणावरूनच सर्वत्र प्रसिद्ध झालेला आढळतो”.
मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया एकमेकींना वाण देतात. सुगडी मध्ये आपल्या घरामध्ये पिकलेल्या धान्यातील वेगवेगळे प्रकार हे घातले जातात आणि स्त्रिया एकमेकांना हळदीकुंकू लावून वाणाची देवाणघेवाण करतात. आजच्या काळामध्ये एकमेकांना घरातील धान्य देण्याऐवजी काही भेटवस्तू देखील स्त्रिया देतात.
वाण देवाणघेवाण कार्यक्रमामुळे एकमेकांशी असलेला ऋणानुबंध वाढतो तसेच एकमेकांमधील स्नेह वाढवून सर्व समाज एकत्र राहण्यास मदत होते. हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत चालतो.पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना देखील मकर संक्रांती दरम्यान बोरन्हान घातले जाते.
पूर्वी लहान मुलांच्या अंगावरून छोटी छोटी बोरे टाकली जात. आता मात्र मुलांना आवडणारे चॉकलेट्स, गोळ्या आणि बिस्किटे यांचे बोरन्हान घातले जाते.भारतीय सणांमध्ये देखील आता आधुनिकतेचा टच आलेला आढळून येतो.परस्परातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन आपले सण साजरे केले पाहिजेत अशी शिकवण आपला भारत देश आपल्या सणांमधून कायम देत असतो.
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण असतो. किंकासुर या राक्षसाचा वध संक्रांत देवीने या दिवशी केला म्हटले जाते. काही भागांमध्ये किंक्रांतीच्या दिवशी कुठलेही शुभकार्य केले जात नाही तर काही भागांमध्ये हा दिवस शुभ मानला जातो.
एकूण काय तर भारतातील विविधता, भारतातील शेती, येथे राहणारे लोक यांना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम आपले भारतीय सण करतात.
मकरसंक्राती मराठी निबंध 10 ओळी
- भारतात दरवर्षी 14 जानेवारी आणि लीप वर्षांमध्ये 15 जानेवारी रोजी मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.
- महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांति, आसाम मध्ये बिहू तर पंजाब मध्ये लोहोडी या नावाने हा सण ओळखला जातो.
- शेतीमध्ये पिकलेले धान्य आणि सूर्यदेवतेचे आभार मानून हा सण साजरा केला जातो.
- महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा होतो.
- आपल्या शेतामध्ये जे धान्य तयार झाले असेल त्या सर्व भाज्यांची एकत्रितपणे तिळाचा कूट घालून भाजी तयार केली जाते जिला भोगी असे म्हटले जाते.
- महाराष्ट्रात भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांति हा सण साजरा होतो ज्यामध्ये सर्वजण तिळगुळ वाटून एकमेकांना प्रेमाने राहण्यास सांगतात.
- मकर संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते म्हणजेच दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते.
- दिवसाचा वेळ वाढल्यामुळे लोकांना काम करण्यास भरपूर वेळ मिळतो आणि त्यातून प्रगती साधता येते असे एक मत आढळून येते.
- मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण येतो अशी मान्यता आहे की संक्रांत या देवीने किंकासुराचा या दिवशी वध केला आहे.
- मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये स्त्रिया हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात तसेच लहान मुलांचे बोरन्हान देखील घातले जाते.
मकर संक्रांति हा सण कधी साजरा केला जातो?
मकर संक्रांति हा सण भारतामध्ये 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी या दिवशी साजरा होतो.
मकर संक्रांति दिवशी स्त्रिया कोणता कार्यक्रम करतात?
मकर संक्रांति दिवशी स्त्री हळदी कुंकू तसेच लहान मुलांसाठी बोरन्हाणं हा कार्यक्रम करतात.
मकर संक्रांतिनंतर सुरू होणारे उत्तरायण म्हणजे नेमके काय ?
मकर संक्रांतिनंतर सुरू होणारे उत्तरायण म्हणजे दिवस मोठा होत जातो आणि रात्री लहान होत जाते.