Mobile shap ki vardan Nibandh in Marathi: मोबाईल म्हणजे आजच्या युगातील नारद आहे असे म्हणायला हरकत नाही. जसे पुराण काळामध्ये नारदमुनी संदेश पोहोचवण्यासाठी ओळखले जात तसे आजच्या युगात मोबाईल चे काम झाले आहे. मोबाईल हा फक्त संदेशच पोहोचवतो असे नाही तर आता मोबाईल मध्ये इतकी क्रांती झाली आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही एका क्षणात तुमच्या जवळ मिळवू शकता.
मोबाईल श्राप आहे की वरदान हे प्रत्येक व्यक्तीच्या वापरावर अवलंबून आहे असे मी मानते. जो व्यक्ती मोबाईल चा वापर योग्यप्रकारे करतो त्यांच्याकरता मोबाईल हे एक वरदान आहे मात्र जे लोक मोबाईल चा चुकीचा वापर करून स्वतःचे आणि इतरांचे नुकसान करतात त्यांच्यासाठी मोबाईल हा एक श्राप आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
मोबाईल चा वापर हा सर्वप्रथम मोटोरोला कंपनी मध्ये काम करणाऱ्या मार्टिन कूपर यांनी 1973 मध्ये केला. पुढे माणसाच्या हातात मोबाईल येण्यासाठी 10 वर्षे गेली. मोबाईल चा वापर हा सर्वप्रथम संदेश पोहोचवण्यासाठी करण्यात आला होता. मोबाईल मधून आपण एकमेकांना संवाद साधू शकत होतो.
हळूहळू मोबाईल मध्ये अनेक उत्क्रांती होत गेल्या आणि आजच्या काळातील मोबाईल अस्तित्वात आले. आजच्या काळामध्ये आपण मोबाईलचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान शिकू शकतो. आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये तुम्हाला मोबाईल दिसेल.
मोबाईल मध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या प्रणाली दिसतात एक अँड्रॉइड आणि दुसरी आहे आयओएस. आयओएस प्रणाली असलेले मोबाईल हे प्रामुख्याने apple नावाची कंपनी विकसित करते. मोबाईल मध्ये अनेक कंपन्या अग्रेसर आहेत जसे की सॅमसंग, मोटोरोला, विवो, पोको आणि ओप्पो इतर.
मोबाईल सुरुवातीला फक्त इतरत्र फिरत असताना संदेश देता येणे सोपे व्हावे यासाठी निर्माण करण्यात आला होता. जुने फोन हे प्रामुख्याने एका जागी ठेवावे लागत. दुसरीकडे गेल्यानंतर जर कोणी फोन केला तर व्यक्ती तिथे उपलब्ध असेलच असे नव्हते म्हणूनच मोबाईल ची संकल्पना साकारण्यात आली.
आजच्या काळामध्ये माणूस जितका प्रगत होत जात आहे त्याच वेगाने मोबाईल चे रुपडे देखील बदलत जात आहे. पूर्वीचे मोबाईल हे बटण असलेले होते आता स्कीन टच मोबाईल अस्तित्वात आले ज्यावर एखादी अशिक्षीत व्यक्तीदेखील अगदी बिनदिक्कतपणे मोबाईल वापरू शकते.
मोबाईल मुळे माणसाजवळ ज्ञानाचे भांडार आले कारण आता या जगातील कोणत्याही विषयावरील ज्ञान एका क्लिक मध्ये उपलब्ध आहे. आपल्याला एखाद्या गोष्टींवर शिक्षण घ्यायचे असेल तर त्यातील पूर्ण माहिती आज मोबाईल वर उपलब्ध आहे. अगदी विजेचे बिल, गॅसचे बिल, टीव्हीचे बिल इतकेच नव्हे तर मोबाईल चा रिचार्ज आणि बँकेची कामे आज आपण घरबसल्या करू शकतो.
मोबाईल मध्ये तुम्ही चित्रपट पाहू शकता त्यामुळे लोकांचे टीव्ही बघणे देखील अत्यंत कमी झाले आहे. मोबाईल वरून संदेश पोहोचवता येतात त्यामुळे आजकाल शाळेतील शिक्षक देखील पालकांना आपल्या पाल्याची अभ्यासातील प्रगती सरळ मोबाईल फोन वर पाठवतात.
अनेक सरकारी कार्यालये देखील मोबाईल फोन मधील फोटो हे काम केल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरतात. मोबाईल ने माणसाचे जीवन अगदी सुसह्य केले आहे म्हणून मोबाईल ला माणसाला मिळालेले वरदान आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
मोबाईल मुळे मनुष्याने प्रगती साधली असली तरी माणसे मात्र एकमेकांपासून दूर गेलेली आढळतात.
पूर्वी गाडी मधून प्रवास करत असताना आपल्या शेजारी बसलेल्या सहप्रवासी व्यक्तीसोबत संवाद साधला जात असे त्यातून ओळखी वाढत आणि मैत्री दृढ होत असे मात्र आताच्या काळात आपल्या शेजारी कोण बसले आहे याकडे देखील आपले लक्ष नसते.
अनेक ठिकाणी लोक स्वतःच्या मोबाईलवर काही तरी करण्यात मग्न असलेले आपल्याला आढळून येतील.
मोबाईल च्या अतिवापरामुळे डोळे दुखावले जात आहे. मोबाईल पँट च्या खिशात ठेवल्यामुळे त्याचा परिणाम हा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो.
गरोदर स्त्रियांसाठी मोबाईल अंत्यंत धोकादायक मानला जातो कारण त्याचा थेट परिणाम हा पोटातील बाळावर होऊ शकतो.
मोबाईल हा वेळच्या वेळी बदलला गेला नाही तर त्यातील बॅटरी खराब होते कधी कधी तिचा विस्फोट होऊन जीवाची हानी देखील होऊ शकते. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी तर होतेच पण त्याच प्रमाणे मेंदूला देखील हानी पोहोचू शकते.
मोबाईलचा अतिवापर मुलांमध्ये टाळला पाहिजे अन्यथा मुलांना मोबाईलचे वेड लागते. मोबाईल जर चुकीच्या पद्धतीने वापरला तर आपल्याला आठवण येते की तो एक श्राप ठरेल. मोबाईल चा वापर करताना प्रत्येक माणसाने योग्य ते भान बाळगले पाहिजे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच मोबाईल वापरायला देखील दोन्ही बाजू आहेत त्या माणसांनी समजून घेऊन त्याचा योग्य वापर केला तर त्या माणसाला शहाणे म्हणता येईल.
मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध
- माणसाला इतरत्र कुठेही जाताना संदेश वहन चालू राहिले पाहिजे या संकल्पनेतून मोबाईल चा शोध लावण्यात आला.
- मोटोरोला कंपनी मधील अभियंता मार्टिन कूपर यांनी सर्वप्रथम मोबाईल चा वापर जगाला करून दाखवला.
- मोबाईलचा वापर कशा पद्धतीने केला जातो यावर मोबाईल हा श्राप आहे की वरदान ते ठरते.
- मोबाईल हा आजच्या काळामध्ये ज्ञानाचे चालते फिरते विद्यालय आहे असे म्हणायला हरकत नाही.
- मोबाईल मुळे जग जवळ आले आहे असे म्हणतात मात्र माणसे एकमेकांना दुरावली आहेत हे देखील तितकेच खरे आहे.
- मोबाईल हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र झाला आहे कारण माणसाच्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी आता मोबाईललाच माहिती आहेत.
- मोबाईल मध्ये सर्व माहिती साठवता येते मात्र ही माहिती कोणी दुसरा चोरत तर नाही ना याची शाश्वती सध्याच्या घडीला कोणीच देऊ शकत नाही.
- आज आपल्याला एखादी गोष्ट मागवायची असेल तर एका चुटकीसरशी आपण ती मागवू शकतो मात्र त्या गोष्टीची शाश्वती मोबाईल देऊ शकत नाही.
- मोबाईल वापरताना तो जागरूकपणे वापरला गेला पाहिजे, आजकाल जे रस्ते अपघात होतात त्यामध्ये प्रामुख्याने मोबाईल मध्ये लक्ष असल्या कारणाने अपघात झालेले आढळून येतात.
- मोबाईल हा व्यवस्थित वापरला तर तो आपल्या हिताचा आहे आणि त्याचा अयोग्य वापर केला तर त्यामुळे प्रचंड नुकसान देखील होऊ शकते म्हणूनच माणसाने सदसद्विवेकबुद्धी वापरून मोबाईल चा वापर केला पाहिजे.
मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर का टाळला पाहिजे?
मोबाईलचा अतिवापर केल्यास मुलांना मोबाईलचे व्यसन लागू शकते, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर, आरोग्यावर व सामाजिक वागणुकीवर वाईट परिणाम होतो.
मोबाईल चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तो श्राप कसा ठरू शकतो?
चुकीचा वापर केल्यास वेळेचा अपव्यय, डोळ्यांचे विकार, मानसिक ताण तसेच चुकीच्या माहितीचा प्रभाव होऊ शकतो, त्यामुळे मोबाईल श्रापासारखा ठरतो.
मोबाईलचा योग्य वापर म्हणजे काय?
आवश्यक तेवढाच मोबाईल वापरणे, योग्य वेळेचे भान ठेवणे आणि उपयुक्त कामांसाठीच मोबाईलचा वापर करणे म्हणजे मोबाईलचा योग्य वापर होय.