My Family Essay In Marathi: माझे कुटुंब निबंध मराठी

My Family Marathi Nibandh : कुटुंब म्हणजे माणसाच्या हक्काचे ठिकाण. कुटुंब हे व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते .आपले कुटुंब हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते.

नमस्कार मंडळी, माझे नाव सीता आहे. माझ्या घरात माझे आई, वडील, माझा भाऊ आणि माझे आजी आजोबा राहतात. आमच्या कुटुंबात आम्ही एकूण सहा जण राहतो. माझे कुटुंब हे एकत्र गुण्यागोविंदाने राहते. माझे कुटुंब हे एकमेकांविषयी प्रेम आणि आदरभाव ठेवते.

माझ्या कुटुंबामध्ये माझे आजोबा हे कुटुंबप्रमुख आहेत. माझे आजोबा हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत. माझी आजी ही देखील माझ्या आजोबांना शेतीमध्ये कायम मदत करते.माझे वडील हे स्वतःचा दुग्ध व्यवसाय चालवतात. माझी आई ही एक उत्तम गृहिणी आहे त्यासोबतच ती माझ्या वडीलांना व्यवसायामध्ये देखील मदत करते.

माझा भाऊ राहुल हा माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.माझ्या घरामध्ये आम्ही सर्वजण मिळून रोज रात्रीचे जेवण सोबत करतो. आम्ही सकाळचा नाश्ता देखील सोबत करतो. माझी आजी आणि आई या दोघी रोज सकाळी लवकर उठतात. माझी आई रोज सकाळी उठून घराचे अंगण झाडून काढते तसेच सुंदरशी रांगोळी अंगणामध्ये काढते.

माझी आई आम्हा सर्वांसाठी रोज राबत असते. आमच्या सर्वांना वेळेवर जेवण मिळते की नाही याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते. माझे बाबा सकाळी लवकर उठून आमच्या गोठ्यातील गाई न म्हशीचे दूध काढतात. आमची स्वतःची दूध डेअरी आहे. डेअरी मध्ये दूध घालायला येणाऱ्या लोकांकडून दूध घेऊन पुढे ते मोठ्या डेअरी मध्ये दिले जाते. माझे बाबा सर्व गोष्टींचा हिशोब ठेवतात आणि प्रामाणिकपणे आपले काम पार पाडतात.

माझे आजोबा शेतामध्ये काम करतात तसेच शेतातील पिकांबद्दल त्यांना भरपूर माहिती आहे तसेच नवीन पिढी ला ते याबद्दल योग्य मार्गदर्शन करत असतात.माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना सांभाळून घेतात. जेव्हा मी शाळेतून वैतागुन घरी येते आणि उद्या शाळेत जाणार नाही असे म्हणते तेव्हा मला घरातील माझे आजोबा शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतात.माझे आजोबा मला कायम शिक्षणाप्रती जागरूक राहिले पाहिजे असे सांगतात.

माझा भाऊ आणि माझा घरचा अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी माझे आजोबा कायम तत्पर असतात.माझ्या आजोबांनी माझ्या आत्याला देखील चांगले शिक्षण दिले आहे त्यामुळेच आज ती प्राध्यापिका म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकली आहे.जेव्हा मी आजारी पडते तेव्हा माझ्या कुटुंबातील सगळे सदस्य माझी काळजी घेतात. माझी आई माझ्या उशाशी राहते आणि मला काय हवे नको ते पाहते.

माझी आजी तिच्या बटव्यातील औषधांचा वापर करून मला बरे करण्यासाठी प्रयत्न करत असते. माझा भाऊ माझ्या आजारपणात एकदम शहाण्यासारखा वागतो तो मला कुठलाच त्रास देत नाही उलट माझा घरचा अभ्यास तो पूर्ण करून देतो.आम्ही सुट्ट्यांमध्ये शेतात एकत्र काम करायला जातो. जेव्हा शेतात

आम्ही एकत्र काम करतो तेव्हा कुटुंबाची एकता असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय वारंवार येत राहतो.जेव्हा आम्ही शेतात राबतो तेव्हा आमची बहुतांश कामे ही कमी वेळामध्ये होतात.आम्ही जेव्हा एकत्र फिरायला जातो तेव्हा संपूर्ण कुटुंबासोबत फिरण्याची मजा काही औरच असते.

माझे कुटुंब हे माझ्या जीवनाचा मूळ पाया आहे आणि यावरच माझे संपूर्ण जीवन घडत आहे. आपले कुटुंब आणि आपल्या घरातील व्यक्ती यातूनच आपण घडत जातो. कुटुंब जर बळकट असेल आणि घरातील व्यक्तींची एकमेकांना योग्य साथ लाभली असेल तर माणूस प्रगतीपथावर जाण्यास कोणीही रोखू शकत नाही.

माझे कुटुंब आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या देखील जागरूक पणे निभावते. माझ्या कुटुंबाने आम्हाला कायम देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती याबद्दल सजग राहण्यास शिकवले आहे. आपल्या कुटुंबात राहताना आपण देश हे एक मोठे कुटुंब आहे हे विसरून चालणार नाही.सामाजिक जीवनात आपण नागरिक म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करायला मला माझ्या कुटुंबाने शिकवले आहे.

कचरा हा रस्त्यात, उघड्यावर अथवा इतरत्र कुठेही न टाकता तो कचरापेटी मधेच टाकला पाहिजे ही माझ्या कुटुंबाची मला शिकवण आहे.एखादा गरजू व्यक्ती दिसला तर त्याला मदत केली पाहिजे हे मला माझ्या कुटुंबाने शिकवले आहे.प्राणिमात्रांबद्दल मनामध्ये दयाभाव बाळगला पाहिजे.

एखादा प्राणी अथवा पक्षी भुकेला अथवा तहानलेला असल्यास त्याची भूक, तहान आपण भागवली पाहिजे ही शिकवण मला कुटुंबाने दिली आहे.आपल्या आजुबाजूचा परिसर हा कायम स्वच्छ ठेवला पाहिजे तसेच निसर्ग हा आपल्या सर्वांचा दाता आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अशी शिकवण माझे कुटुंब मला देते.

कुटुंबाच्या संस्कारामधूनच माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते.

10 ओळींमध्ये माझे कुटुंब निबंध

  1. कुटुंब हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
  2. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि तो एकोप्याने राहतो.
  3. कुटुंब म्हणजे अशी जागा जिथे माणूस आपलेपणा अनुभवतो.
  4. काही नाती ही रक्ताच्या पलीकडची असतात आणि त्यामधून माणसे एकमेकांजवळ येतात आणि कुटुंब तयार होते.
  5. माझ्या कुटुंबामध्ये आम्ही एकूण सहा जण राहतो.
  6. माझे आजोबा हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत.
  7. माझे आजोबा शेती करतात तर माझे वडील दुग्धव्यवसाय करतात.
  8. माझी आजी आजोबांना शेतात मदत करते आम्ही तिला थोरलीआई म्हणून हाक मारतो.
  9. माझी आई बाबांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करते तसेच आम्हा सर्वांची काळजी घेते.
  10. माझ्या कुटुंबात माझा लहान भाऊ आहे जो फार मस्ती करतो आणि मला कायम हवाहवासा वाटतो

प्रश्न 1:माझे कुटुंब” या निबंधाचा मुख्य विषय काय आहे?

उत्तर: या निबंधाचा मुख्य विषय कुटुंबाचे महत्त्व, कुटुंबातील सदस्यांचे परस्पर संबंध, प्रेम, संस्कार आणि कुटुंबामुळे व्यक्तिमत्व कसे घडते हे स्पष्ट करणे हा आहे.

प्रश्न 2: या निबंधामध्ये कुटुंबातील किती सदस्यांचा उल्लेख आहे?

उत्तर: या निबंधामध्ये एकूण सहा कुटुंबीयांचा उल्लेख आहे – आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ आणि स्वतः लेखिका (सीता).

प्रश्न 3: निबंधामध्ये कुटुंबाकडून मिळणाऱ्या कोणत्या शिकवणी सांगितल्या आहेत?

उत्तर: शिक्षणाचे महत्त्व, परिश्रम, प्रामाणिकपणा, समाजभान, देशप्रेम, स्वच्छता, गरजूंना मदत करणे, तसेच प्राणी व निसर्गाबद्दल दयाभाव ठेवणे या शिकवणी सांगितल्या आहेत.

प्रश्न 4: हा निबंध विद्यार्थ्यांसाठी कसा उपयुक्त आहे?

उत्तर: हा निबंध विद्यार्थ्यांना कुटुंबाचे महत्त्व समजावतो, मूल्यसंस्कार रुजवतो आणि शालेय निबंध लेखनासाठी उत्तम नमुना म्हणून उपयोगी पडतो.

प्रश्न 5: “माझे कुटुंब” या विषयावर निबंध का लिहिला जातो?

उत्तर: कारण कुटुंब हे व्यक्तीच्या जीवनाचा पाया असते. कुटुंबातील अनुभव, प्रेम आणि संस्कार यामुळे व्यक्तीचे सामाजिक व नैतिक जीवन घडते, हे अधोरेखित करण्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे.

Leave a Comment