My Pune Essay In Marathi: पुणे. पुणे म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो शिवकालीन इतिहास. शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्यासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या मावळ्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला होता.
शिवाजी महाराजांचा जन्म झालेले पुणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे . पुणे शहरांमध्ये शिवरायांनी जिंकलेले अनेक गड किल्ले अस्तित्वात आहेत. शिवाजी महाराजांनी येथेच गडकोटांवर बसून संपूर्ण मराठा साम्राज्याची बांधणी केली होती. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आज सिंहगड, पुरंदर, तिकोना, राजगड , तुंग हे किल्ले मोठ्या दिमाखात उभे आहेत.
जेव्हा मोगलांनी पुण्यावर अतिक्रमण करून पुण्यामध्ये गाढवाचे नांगर चालवले होते तेव्हाचे उद्ध्वस्त पुणे आणि त्यानंतर जिजाऊ मातेच्या आशीर्वादाने शिवरायांनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवला आणि खरेच पुण्याचे सोने केले. पुण्याला खरी समृद्धता शिवकालीन इतिहासापासून लाभली आहे.
शिवरायांनी पुण्यातील लाल महालामध्ये शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. तेव्हापासून मराठा साम्राज्या विषयी भीतीदायक वातावरण संपूर्ण मुघल सल्तनत मध्ये झाले होते. पुणे पुढे पेशवे अंमलाखाली आले. पेशव्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये शनिवार वाडा बांधला. शनिवार वाडा आता जीर्ण अवस्थेमध्ये आहे मात्र आजही हा शनिवार वाडा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. लाल महाल, शनिवार वाडा हे पुण्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. आजही या ठिकाणी भेट दिल्यानंतर अंगावर एक प्रकारचा रोमांच उभा राहतो.
पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. आज पुण्यामध्ये शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये अगदी विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. पुण्याची शिक्षण पद्धती आणि येथे असलेले पुरोगामी विचार यामुळे पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांचा लोंढा वाढत जात आहे. पुणे आज जागतिक पटलावर असलेले सर्वात प्रसिद्ध शहर आहे. पुण्याचे वातावरण ही अगदी सर्वांना आवडेल असे आहे. पुण्यामध्ये हिवाळा, पावसाळा आणि सौम्य उन्हाळा असतो. पुण्यामध्ये शिक्षणाविषयी जागरूकता आहे.
पुण्यामध्ये अनेक जागतिक शिक्षण संस्थांनी देखील आपले पाय राहण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक स्तरावर नावाजलेले आहे. विद्यापीठामध्ये विविध भाषांपासून ते माहिती तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर शिक्षण उपलब्ध आहे. शिक्षण घ्यायचे तर पुण्यातच या उद्देशाने अनेक लोक पुण्याला आपली पहिली पसंती देतात.
पुण्यात मध्ये अनेक आयटी हब देखील आहेत. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे अनेक नामवंत कंपन्या जसे की, इन्फोसिस, टीसीएस, कॉग्निजंट, कॅपजेमिनी आहेत ज्यांनी अनेक पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
पुण्यामध्ये पेशवे कालीन सिद्धिविनायकाचे गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या सारस बागेमध्ये आहे. सारसबाग ही तर सर्व नागरिकांचे फिरण्याचे ठिकाण. राजीव गांधी सर्पोद्यान कात्रज मध्ये आहे. पुण्यात आल्यानंतर या भागांमध्ये प्रत्येकाने आवर्जून भेट दिली पाहिजे. पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण देखील आहे.
पुण्याचे सर्वात प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मंडई मध्ये आहे. पुण्यामध्ये तुळशीबाग आहे जिथे स्त्रियांना मनपसंत खरेदी करता येते. स्त्रियांमध्ये तुळशीबाग येथे खरेदी करण्याचा भलताच उत्साह असतो. पुण्यातील चितळ्यांची बाकरवडी देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. पुण्यामध्ये आठवड्याच्या नावाने सुरू होणाऱ्या सर्व पेठा आहेत. पुण्यामध्ये इस्कॉन टेम्पल देखील प्रसिद्ध आहे.
‘पुणे तिथे काय उणे ‘ हे प्रसिद्ध वाक्य सर्वांच्याच अगदी तोंड वळणी पडले आहे असे दिसून येईल. पुण्यामध्ये गणेशोत्सव अगदी आनंदात साजरा होतो. पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी पुण्याला नक्की भेट दिली पाहिजे. पुणे दर्शन नावाची बस सेवा पुण्यामध्ये उपलब्ध आहे ज्याद्वारे तुम्ही पुण्याच्या सुंदर भागांचा आस्वाद घेऊ शकता.
Majhe Pune Nibandh In Marathi 10 Lines
- माझे आवडते शहर पुणे हे आहे.
- पुणे शहर हे मुळा आणि मुठा या दोन नदी तीरांवर वसलेले आहे.
- पुण्यातील शिक्षण संस्था सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहेत तसेच पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी विदेशातून नागरिक येत असतात.
- पुण्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ज्यामध्ये शिवरायांचा आणि पेशव्यांचा इतिहास आहे.
- पुण्यामध्ये सिंहगड, राजगड, तिकोना, तुंग हे किल्ले मोठ्या दिमाखात शिवरायांच्या पराक्रमाची गाथा गात उभे आहेत.
- पुण्यामध्ये गणेशोत्सव अगदी आनंदात साजरा होतो. गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली होती, ते देखील पुण्याचेच.
- पुण्यामध्ये लाल महाल ,शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तू आहेत.
- पुण्याचे वातावरण हे आल्हाददायक आहे.
- जागतिक स्तरावर पुण्याची ओळख आयटी हब म्हणून झालेली आहे.
- पुण्यामध्ये विविध प्रकारच्या पेठा आणि बागा आहेत. पुणे तिथे काय उणे ही उक्ती पुण्याला शोभून दिसते.
पुणे हे शहर कोणत्या नदी वर वसले आहे?
पुणे हे शहर मुळा आणि मुठा या दोन नद्यांवर वसले आहे.
पुणे शहरामध्ये कोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?
पुणे शहरामध्ये लाल महाल तसेच शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तू आहेत.
जागतिक स्तरावर पुणे शहराची ओळख कशी आहे?
जागतिक स्तरावर पुणे शहराची ओळख आयटी हब म्हणून आहे.