My Favourite Hobby Dance Essay In Marathi: माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी

My Hobby Dance Nibandh Marathi: नृत्य म्हटलं की सर्वात अगोदर डोळ्यासमोर उभे राहते ती शिवशंकराची नटराज भूमिकेतील मूर्ती. नट म्हणजे नर्तक आणि राज म्हणजे राजा. जो नर्तकांचा राजा आहे तो म्हणजे नटराज. भारतीय पुराणांमध्ये आपल्याला सर्वत्र नटराज ही मूर्ती दिसून येते.

नटराज ही संकल्पना भारतातील अनेक शिलालेखांमध्ये देखील कोरलेली दिसून येते. भगवान शंकर म्हणजेच नटराज आहेत असे मानले जाते. नटराजाच्या एका हातामध्ये डमरू आहे तर दुसऱ्या हातामध्ये अग्नी. डमरू हे निर्मितीचे प्रतीक आहे तर अग्नी हा विनाशाचे प्रतीक आहे.

नटराज ही मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या मनातील विचारांचे प्रतीक आहे असे म्हणायला हरकत नाही.मला लहानपणापासूनच नृत्य ही संकल्पना फार आवडते. आमच्या शाळेमध्ये नृत्याचा वेगळा असा वर्ग भरत असे. आम्ही सर्वप्रथम नट राजाला वंदन करून मगच नृत्य करायला सुरुवात करत असू.

शाळेमध्ये आमच्या नृत्य शिक्षिका आम्हाला सुरुवातीला नृत्य करून दाखवत आणि मग आम्ही त्यांचे अनुकरण करत नृत्य करत असू. शाळेमध्ये असल्यापासूनच मला नृत्याची प्रचंड आवड होती. आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादर करून अनेक प्रेक्षकांची वाहवा देखील मिळवत असू.

नृत्य हे एकट्याने केले तरीही ते सुंदर वाटते पण जेव्हा एका समूहा मध्ये आपण नृत्य करतो तेव्हा सर्वांसोबत आपली चाल तालबद्ध झाली पाहिजे आणि त्यातच खरे नृत्याचे कसब आहे.नृत्य हे मानवाच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते.

नृत्यामुळे मानवाचे शरीर हे वेगवेगळ्या हालचाली करते. हालचाली वाढल्यामुळे मानवाच्या शरीरात स्थूलता कमी होते. नृत्यातील लयबद्ध हालचाली जर आपण व्यवस्थित करत असू तर रोजच्या जीवनात देखील आपले शरीर हे चालताना फिरताना योग्य समन्वय साधला जातो. नृत्यामुळे आपल्या मनातील दडपण देखील कमी होते परिणामी आपल्याला उल्हास वाटतो.

नृत्याचे अनेक शारीरिक फायदे असल्यामुळेच आज काल तो कार्डिओ व्यायाम प्रकारातील एक प्रकार म्हणून ओळखला जातो. जिम मध्ये आजकाल सर्वत्र झुम्बा डान्स नावाचा प्रकार प्रसिद्ध झाला आहे. ज्या लोकांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो अशा लोकांसाठी झुम्बा डान्स हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

झुम्बा डान्स मध्ये व्यायामाच्या विविध हालचाली एकत्र केल्या जातात आणि गाण्याच्या तालावर लोक आपले भान विसरून नाचतात त्यामुळे किती वेळ व्यायाम केला हे कोणालाही कळत नाही मात्र त्या व्यायामाचे अगणित फायदे होतात.

नृत्य म्हटलं की त्याला साथ असते ती संगीताची. नृत्य आणि संगीत आपण एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही. संगीताच्या ठेक्यावरच नृत्य होऊ शकते. अगदी शांत संगीत असेल तरी त्यावर देखील माणूस नृत्य करू शकतो पण नृत्त्याला संगीताची जोडी ही हवीच.

भारतामध्ये तर नृत्याचे भांडारच आहे आणि भारताला या नृत्यकलेचा खूप मोठा इतिहास आहे असे म्हणायला हरकत नाही. भारतातील युनेस्को यादीमध्ये असलेल्या लेण्यांमध्ये देखील समूह नृत्यांचे चित्रण पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की भारतात फार पूर्वीपासूनच नृत्य हा प्रकार रुजलेला आहे.

भारतात अनेक आदिवासी भागांमध्ये आजही विविध प्रकारचे नृत्य प्रकार पाहायला मिळतात. आदिवासी भागांमध्ये त्यांच्या सणांमध्ये प्रामुख्याने नृत्य केले जाते. प्रत्येक भागामध्ये स्वतःची अशी नृत्य परंपरा भारतामध्ये आढळते. महाराष्ट्रामध्ये वाघ्या मुरळीचा नृत्य प्रकार हा पारंपारिक नृत्य प्रकार म्हणून ओळखला जातो.

पंजाब मध्ये भांगडा अतिशय प्रसिद्ध आहे तसेच हा नृत्यप्रकार आज काल कित्येक चित्रपटांमध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतो. महाराष्ट्रातील कोळी नृत्य देखील खूप सुंदर आहेत तसेच शाळेच्या कार्यक्रमांमध्ये या गाण्यांवर सादरीकरण देखील केले जाते.

लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य यांमध्ये फरक आहे. भारतात शास्त्रीय नृत्याचे एकूण आठ प्रकार आहेत. भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, मणिपुरी, ओडिसी, मोहिनीअट्टम, सत्रिया आणि कथक हे नृत्याचे आठ शास्त्रीय प्रकार आहेत. भारतातील तमिळनाडू, केरळ, ओडिसा, आसाम आणि मणिपुरी या भागांमध्ये हे नृत्यप्रकार विकसित झाले आहेत.

भारताच्या पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण, रासलीला यांमधूनच हे विविध नृत्य प्रकार तयार झालेले आहेत अशी मान्यता आहे. बहुतांश नृत्य प्रकारांमध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघे मिळून नृत्य करतात.

भारतात नृत्य शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे देश-विदेशात देखील नृत्याला महत्त्व प्राप्त होण्यासाठी मोठ मोठ्या प्रमाणावर दूरचित्रवाणीवर कार्यक्रम सादर केले जातात आणि ज्या व्यक्तींमध्ये हे नृत्याचे कौशल्य भरलेले आहे अशा लोकांना जागतिक स्तरावर संधी प्राप्त करून देण्यासाठी देखील अनेक मंडळी कार्यरत आहेत.

नृत्य आणि मनुष्य यांचे जन्मोजन्मीचे नाते आहे आणि ते एकमेकांपासून कधीच विलग होऊ शकत नाहीत.

10 Line Essay On My Favourite Hobby Dance

  1. मला शालेय जीवनापासून नृत्य करायला अतिशय आवडते आणि भरतनाट्यम हा माझा आवडीचा नृत्य प्रकार आहे.
  2. भारतामध्ये प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळी प्रादेशिक नृत्य आपल्याला आढळून येतात.
  3. महाराष्ट्रामध्ये कोळी नृत्य प्रसिद्ध आहेत तर पंजाब मध्ये भांगडा अतिशय प्रसिद्ध आहे.
  4. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थांनी नृत्य या कलेसाठी विभाग सुरू केले.
  5. भारतात शास्त्रीय नृत्याचे एकूण आठ प्रकार आहेत – भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी, मणिपुरी, ओडिसी, मोहिनीअट्टम सत्रिया, कथकली
  6. भारतात कोणतेही नृत्य सादर करण्यापूर्वी आधी नटराजाला अभिवादन केले जाते.
  7. नटराज म्हणजे शिवाचे एक रूप आहे ज्याच्या एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात अग्नी आहे.
  8. भारतात आढळणाऱ्या अनेक लेण्यांमध्ये देखील आपल्याला नटराज चे दर्शन होते.
  9. भारतात नृत्यकला ही पूर्वापार चालत आलेली आहे हे आपल्याला दगडांवर कोरलेल्या शिल्पांमधून समजते.
  10. नृत्याला संगीताची जोड लागते , कोणतेही नृत्य करताना संगीता शिवाय नृत्य होऊ शकत नाही.

नृत्य हा तुमचा आवडता छंद का आहे?

नृत्य केल्याने मला आनंद मिळतो, मन ताजेतवाने होते आणि माझ्या भावना व्यक्त करता येता

नृत्यामुळे कोणते शारीरिक व मानसिक फायदे होतात?

नृत्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, लवचिकता वाढते, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.

नृत्य छंद म्हणून जपणे का महत्त्वाचे आहे?

नृत्य हा छंद मनाला समाधान देतो, शिस्त लावतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

Leave a Comment