माझा दोस्त मराठी निबंध: मराठी कवी प्रा. अनंत राऊत यांनी मित्राचे वर्णन अत्यंत खुबीने एका कवितेमध्ये केले आहे जे मित्रासाठी अगदी चपखल शोभणारे आहे.
“दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा”.
ही कविता वाचताना मित्राच्या आठवणीने अगदी गहिवरायाला होते. माझा मित्र देखील या कवितेला साजेसा आहे आणि मला त्याच्याबद्दल आणि आमच्या मैत्रीचा कायमच अभिमान वाटतो.
माझे नाव शाम आहे आणि माझा प्रिय मित्र राम आहे. आम्हाला सर्व जण राम आणि शाम ची जोडी असे म्हणतात. जुन्या चित्रपटामध्ये राम आणि शाम ही जुळ्या भावांची गोष्ट होती आम्हाला देखील सर्वजण एकमेकांचे मित्र असण्यापेक्षा एकमेकांचे भाऊ म्हणून ओळखतात.
माझा मित्र राम आणि मी आम्ही दोघे बालवाडीपासून एकत्र आहोत. आम्ही शाळेमध्ये सोबत जात असू तसेच आम्ही दोघे एकमेकांच्या डब्यातील जेवण सोबत बसून खात असू. जेव्हा परीक्षेचा वेळ जवळ येत असे तेव्हा आम्ही तासनतास अभ्यासात मग्न राहत असू. मला जे विषय अवघड वाटत ते राम मला सहज सोप्या पद्धतीने शिकवीत असे.आम्ही एकत्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. दोघांनी अभियांत्रिकी ला प्रवेश घेतला तेव्हा मला हे थोडे जड गेले होते पण माझ्या मित्राच्या साथीमुळे मला फार मदत झाली.
आज मी इंजिनिअर होऊ शकलो त्यामध्ये माझ्या कुटुंबाबरोबरच माझ्या मित्राचा सिंहाचा वाटा आहे.माझा मित्र राम हा माझ्या प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये सोबत आहे.कोरोना काळामध्ये जेव्हा मी कामानिमित्त शहरात अडकलो होतो आणि माझ्या भाषणाला घरी माझ्या बाबांना कोरोना झाला होता तेव्हा माझा मित्र राम याने माझ्या बाबांची मुलाप्रमाणे काळजी घेतली होती. त्याने माझ्या बाबांना वेळेवर दवाखान्यांमध्ये घेऊन गेल्यामुळे माझे बाबा कोरोना सारख्या महाभयानक संकटातून वाचले. माझ्या मित्राचे हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही.
माझा मित्र राम हा समाजाप्रती अंत्यंत जागरूक आहे. तो एक जबाबदार नागरिक आहे. तो रोज कामावरून घरी आल्यानंतर गरजू मुलांना मोफत शिक्षण देतो. गणित आणि विज्ञान या विषयाबद्दल मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी तो प्रयत्न करतो. लहान मुले कोणताही विषय मन लावून शिकली तर तो ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतात असे त्याचे म्हणणे आहे. एक जबाबदार पिढी घडवणे हे आपले कर्तव्य आहे असे तो मानतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो.
माझा मित्र राम याला प्राणीमात्रांविषयी अत्यंत प्रेम आणि दयाभाव आहे.दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाके उडवणे याची तो प्रचंड विरोध करतो. मूक जनावर बोलू शकत नाही मात्र त्याला फटाक्यांचा त्रास होतो माणसाने जबाबदारीने वागले पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे.राम ला इतिहासाची प्रचंड ओढ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना तर तो आपले दैवत मानतो. महाराजांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी जो लढा दिला त्याचे तो कायम मनन करत असतो.
माझा मित्र राम हा आमच्या गप्पांमध्ये कित्येक वेळा मावळ्यांच्या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या कथा सांगत असतो. आपला देश आणि समाज यांबद्दल त्याच्या मनामध्ये एक निस्सिम भक्ती आहे. माझा मित्र राम याच्या अंगी देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती भरभरून आहे.
माझ्या मित्राला मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांबरोबरच जर्मन आणि फ्रेंच या भाषा देखील अत्यंत सुंदर प्रकारे बोलता येतात.माझा मित्र राम हा त्याच्या गुणी स्वभावामुळे सर्वांना अत्यंत प्रिय आणि हवाहवासा वाटतो.
आजदेखील एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याआधी माझा मित्र राम याच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतले जातात कारण बहुतांश गोष्टीमध्ये त्याचा अत्यंत गाढा अभ्यास आहे.
माझा मित्र राम हा सर्व कलांमध्ये अत्यंत प्रवीण आहे मात्र आज देखील त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करतो आणि सर्वांना प्रेम वाटतो. असा हा माझा मित्र मला अत्यंत प्रिय आहे.
My Best Friend 10 Line Essay
- मित्र म्हणजे आयुष्यातील खरा सोबती असतो.
- माझा मित्र राम मला सख्ख्या भावासारखा प्रिय आहे.
- आम्ही लहानपणापासून एकत्र शिकलो आणि खेळलो आहोत.
- अभ्यासात अडचण आली की तो मला नेहमी मदत करतो.
- सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी तो माझ्या सोबत उभा राहतो.
- राम हा जबाबदार आणि समाजभिमुख व्यक्ती आहे.
- तो गरजू मुलांना मोफत शिक्षण देतो.
- त्याला देश, इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विशेष आदर आहे.
- प्राणीमात्रांविषयी त्याच्या मनात दया आणि करुणा आहे.
- असा गुणी आणि प्रेमळ मित्र लाभल्याचा मला अभिमान आहे.
मित्राचे आयुष्यात काय महत्त्व आहे?
मित्र आयुष्य आनंदी करतो, कठीण काळात मदत करतो आणि आपला विश्वास वाढवतो.
मित्र म्हणजे कोण?
आपल्या प्रत्येक सुखदुःखात आपल्याला सोबत देणारा व्यक्ती म्हणजे आपला मित्र होय.
शालेय अभ्यासक्रमासाठी माझा मित्र हा विषय का महत्त्वाचा आहे?
माझा मित्र या विषयावरील निबंध मुलांना नातेसंबंध आणि मैत्रीचे मूल्य समजावतो त्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे.