My Grandmother Essay In Marathi: माझी आजी निबंध मराठी

My Grandmother Essay In Marathi: जगात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा नात्यांमध्ये बांधला गेलेला असतो. आपल्या आईनंतर आपली नाळ ज्या व्यक्तीशी सर्वात जास्त घट्ट बांधली गेलेली असते ती म्हणजे आपली आजी. आजी हा असा नाजूक बंध आहे जो आई आणि बाळाच्या नात्याइतकाच मजबूत आहे. आज आम्ही. ‘ माझी आजी‘ या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये लिहिलेला निबंध तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेला आहोत.

My Grandmother Essay In Marathi

आजी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती नऊवारी लुगडं नेसून, अविरत कष्ट करण्यात असणारी स्त्री. नऊवारी लुगडं नेसलेली माझी आजी म्हणजे जणू काही मायेचा सागर भासते. तिचे सुरकुतलेले हात तिने आजवर केलेल्या कष्टाची जणू काही ग्वाहीच देत असतात. आजच्या युगात जन्मलेली मी आणि तिच्या काळातली ती हे अंतर मला विचार करायला भाग पाडते.

खरंच माझ्या आजीने किती कष्ट झेललेले असतील??? आजच्या नवीन युगामध्ये जिथे माझे प्रत्येक काम एखादी मशीन अगदी आरामात करते. त्या कामामुळे मला कुठलाच ताण पडत नाही अथवा मला थकवा जाणवत नाही. मात्र माझी आजी माझ्या वयाची असताना तिच्या कोमल हाताने तिने कितीतरी मोठाली कामे केली आहेत.

जात्यावरती धान्य दळणे, कपडे धुण्यासाठी ओढ्यावर जाणे, जुनी घरे शेणाने सारवून घेणे अशा एक ना अनेक गोष्टी तिने विनातक्रार केल्या आहेत. भले माझ्या आजीजवळ कॉलेजची पदवी नसेल मात्र तिच्याकडे संसाराचा फार मोठा अनुभव आहे जो की एखाद्या विद्यापंडितालाही नसेल.

माझी आजी म्हणजे माझी दुसरी आईच जणू. मला कधी थोडीशी दुखापत झाली तर सर्वात आधी धावून येते ती माझी आजी. आजीबाईचा बटवा म्हणतात तो काही खोटं नव्हे. आजच्या काळातील औषधांना ही जी कमाल जमणार नाही ती कमाल माझ्या आजीच्या बटव्यात सापडते. माझी आजी कोणत्याही कामासाठी सदैव तत्पर असते.

माझ्या आजीला स्वयंपाकामध्ये फार रुची आहे. माझ्या आजीच्या हातून बनलेले पारंपारिक पदार्थ खायला मला नेहमीच आवडतात. माझी आजी खापरा वरती पुरणपोळ्या बनवते आणि त्या खाण्यासाठी आम्हा भावंडांमध्ये जणू काही चुरसच लागते. माझी आजी म्हणजे आमच्यासाठी साक्षात अन्नपूर्णाच आहे.

आधी सर्वांनी जेवून घ्यावे आणि मगच ती जेवायला बसते. माझी आजी आजवर कायम स्वतः आधी इतरांचा विचार करते. मी जर कधी एखाद्या गोष्टीवर रुसून बसले आणि जेवले नाही तर ती माझ्याजवळ येते आणि म्हणते बाळा जेवणावर राग नाही काढायचा आणि तिच्या या शब्दांनी ती मला मोहित करून टाकते, मी आपसूकच जेवण जेवायला तयार होऊन जाते. माझ्या आजीकडे जणू काही शब्दांची मोहिनीच आहे असं मला वाटतं.

माझी आजी ही एक स्त्री जरी असली तरी ती आजवर माझ्या आजोबांच्या खांद्याला खांदा लावून संसार करत आली आहे आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझ्या आजीला शेतीतीलही भरपूर ज्ञान आहे. आजही माझी आजी शेतामध्ये दररोज जाते. शेतामध्ये जाऊन खुरपणी सारखी कामे ती करत असते.

शेतामध्ये काम करताना ती छान गाणी गुणगुणत अगदी तल्लीन होऊन काम करते. शेतात काम करावे लागते म्हणून तिच्या चेहऱ्यावर कधीच निराशा नसते उलट हे शेत आहे म्हणूनच आपला संसार सुरळीत चालू राहिला असे ती म्हणते आणि ही धरती मायच आपली आई आहे असे समजून ती कायमच या धरती मातेचा आदर करते.

शेतात गेली असली की माझी आजी आवर्जून तेथील रानमेवा गोळा करून आम्हा सर्व नातवंडांसाठी घेऊन येते. आजच्या काळात जिथे मुलं पिझ्झा बर्गर खाण्यामध्ये गुंग होत असतात तिथे ती आम्हाला रानमेव्याचा महत्त्व आणि फायदे सांगते. आजीमुळे आम्हाला पौष्टिक पदार्थ नेहमी खायला मिळतात.

माझी आजी घरी जात्यावर दळण दळते. दळण दळत असताना ती सुंदर ओवी म्हणत असते. माझी आजी घरीच डाळीचं पीठ तयार करते. त्यापासून ती कुरकुरीत भजी तयार करते. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून ते खायला घालणं हे म्हणजे माझ्या आजीच नित्याच काम आहे.

माझी आजी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची भक्त आहे. माझी आजी देव भोळी आहे मात्र अंधश्रद्धाळू नाही. कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती त्या मागचे विज्ञान समजून घेऊनच आपल्या परंपरा साजरा करत असते. माझ्या आजीची बुद्धी अगदी चौकस आहे.

माझ्या आजीची निरीक्षण क्षमता अगदीच वाखाणण्यासारखी आहे. आजही माझ्या नजरेतून एखादी गोष्ट सुटली तरी आजीच्या नजरेत ती गोष्ट लगेच येते आणि ती आम्हाला त्याबद्दल सावध देखील करत असते. कोणतीही गोष्ट किती बारकाईने करावी हे मी माझ्या आजीकडून शिकत असते.

माझ्या आजीचे आपल्या सर्व नातवंडांवर खूप प्रेम आहे. माझ्या आजीचे पशुपाण्यांवर देखील खूप प्रेम आहे. माझ्या आजीने घरात एक छान मांजर पाळले आहे. माझ्या आजीला प्राणीमात्रांविषयी खूप प्रेम आहे.

माझी आजी रोज सकाळी लवकर उठते. आंघोळीनंतर देवपूजा करणे, अंगण झाडून घेणे, घराचा उंबरा पुजणे, दारासमोर रांगोळी काढणे हा तिचा नित्यक्रम आहे. देवपूजा भरल्यानंतरच ती चहा घेते. घरातील कामे आवरल्यानंतर ती एक चक्कर शेतामध्ये मारून येते. शेतातील कामे आवरली की पुन्हा घरी येऊन ती घरातील कामांच्या मागे लागते. अशी ही माझी आजी विनाविश्रांती अहोरात्र आम्हा सर्वांसाठी कायम झटत असते.

माझी आजी जरी स्वतः शिकली नसली तरी तिने तिच्या लेकीने खूप शिकावे यासाठी कायम प्रयत्न केले. मुलगी शिकली तरच घराची प्रगती होऊ शकते असे ती कायम म्हणते. मुलगी ही एक नव्हे तर दोन घरांचा उद्धार करत असते असे ती आम्हाला कायम सांगते यामुळे आम्ही मुली आहोत याचा आम्हाला कायमच अभिमान वाटतो. माझी आजी जरी जुन्या काळातील असली तरी मुलगा मुलगी असा भेद ती मानत नाही ती आम्हा भावंडांना समानतेने वागवते. अशी ही माझी प्रेमळ, उदारमतवादी आजी मला फार फार आवडते

Grandmother Nibandh In Marathi In 10 Lines

  1. माझी आजी मला फार आवडते ती माझ्यावर फार फार प्रेम करते.
  2. माझी आजी आज देखील या वयामध्ये शेतामध्ये जाऊन काम करते.
  3. माझी आजी आपल्या परंपरा तर जपतेच पण त्याच बरोबर आम्हाला देखील या परंपरांबद्दलची माहिती देत असते.
  4. आमच्या घरात कोणीही आजारी पडले तर माझी आजी तिच्या घरगुती उपायांनी आम्हाला ठणठणीत बरं करत असते.
  5. माझी आजी आम्हा भावंडांना कायम नवनवीन गोष्टी शिकवत असते.
  6. माझ्या आजीला खूप जुन्या आणि सुंदर ओव्या तोंडपाठ आहेत.
  7. कधी कोणाच्या घरी एखादे शुभकार्य असेल तर माझ्या आजीला तेथे आवर्जून आमंत्रित केले जाते.
  8. माझ्या आजीचा स्वभाव फार प्रेमळ आहे ती कायम इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असते.
  9. माझ्या आजी मुळे माझ्या आईला देखील खूप मदत होत असते.
  10. सर्व कुटुंब आनंदित एकत्रित रहावे यासाठी माझी आजी कायम आम्हा सर्वांवर चांगले संस्कार करत असते.

आज आम्ही माझी आजी या विषयावर आपणास शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध दिलेला आहे. आपणास हे निबंध कसे वाटले हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपल्यासाठी असेच नवनवीन विषयांवर निबंध द्यायला आम्हाला नक्की आवडेल. अशाच विषयांवरील निबंध वाचण्यासाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या धन्यवाद!

Leave a Comment