Pani Adva Pani Jirva Nibandh In Marathi: पाणी हा दोन अक्षरांचा शब्द मात्र यावर माणसाचं संपूर्ण जीवन फिरत राहतं. एक वेळ अन्न नसेल तर माणूस थोडे दिवस जगतो मात्र जर पाणी नसेल तर मात्र माणसाचं काही खरं नाही. पाण्याचं एवढं महत्त्व माहिती असून देखील काही लोक मात्र पाण्याचा अपव्यय करत राहतात. अशा लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. काही ठिकाणी पाऊस पडण्याचे प्रमाण देखील कमी असते अशावेळी पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर तिथे पाणीटंचाई भासू शकते म्हणूनच आज आम्ही पाणी आडवा आणि पाणी जिरवा या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर करत आहोत.
Pani Adva Pani Jirva Essay In Marathi
आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि जल. जसे आपले शरीर ह्या पंचमहाभूतांनी बनलेले आहे तसेच निसर्ग देखील या घटकांनीच साकारलेला आहे. या घटकांपैकी एकही घटक जर कमी प्रमाणात असेल तर निसर्गामध्ये असमतोल होतो.
या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जल म्हणजेच पाणी. पाणी हे मनुष्याला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत गरजेचे आहे. माणसाच्या शरीरात 70% पाणी असते असे म्हटले जाते. आपल्या पृथ्वीवर देखील 71 टक्के भागा पाण्याने व्यापलेला आहे आणि 29 टक्के जमीन आहे असे म्हटले जाते. म्हणजेच तसे पाहायला गेले तर पृथ्वीवर पाणी भरपूर प्रमाणात आहे. तरीही उन्हाळा आला की पाण्याची टंचाई भासतेच. असे का होते तर पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पाण्याची टंचाई भासते.
आज-काल सर्वत्र धो धो पाऊस पडताना आपल्याला दिसतो. काही भागांमध्ये तर अक्षरशा पूर परिस्थिती येते. मात्र एकदा पाऊस ओसरला की सर्वत्र पाण्याची वाणवा दिसते. जर एखादा भाग दुष्काळी असेल तर तिथे डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरायला दूरवर जाणाऱ्या बायका आणि पुरुष दिसतात.
पाणी या गरजेसाठी कितीतरी मैल लोकांना आपले पाय तुडवत जावे लागते. पाण्यासाठी जीव तहानलेला होतो. पाणी हे जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज काल तर पाण्याशिवाय आपले कुठलेच काम होऊ शकत नाही. असे असताना पाण्याचे जर योग्य नियोजन केले गेले नाही तर त्यामुळे होणारा त्रास खूपच जाचक वाटतो.
ज्या भागांमध्ये भरपूर पाऊस पडतो अशा भागांमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी बंधारे, कालवे बांधले गेले पाहिजेत. जिथे आपली शेती आहे तिथे जर शेततळी खोदण्यात आली तर तिथे पावसाचे पाणी साचून राहील आणि त्यामुळे शेती कामांसाठी लागणारे पाणी आपसुकच उपलब्ध होईल.
आपल्याला सर्वात जास्त पाणी हे शेती पिकांसाठी लागते. शेतांमध्ये ही छोटी शेततळी शेतीतील कामांसाठी उपयोगी येतील. शेततळी सरकारी योजनांमधून देखील बांधता येतात. आपण विहीर खणून देखील पावसाचे पाणी साठवून ठेवू शकतो. पाणी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय आणि प्रकल्प राबवता येऊ शकतात. हे पडणारे पाणी आपण जर साठवू शकलो आणि ते जमिनीत जिरवू शकलो तर आपण प्रगती साधली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
पाणी म्हणजे जीवन आहे. शासनाने आजवर अनेक उपक्रम राबवून जलसंवर्धनाचे महत्त्व सर्वत्र पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उज्वल भारताचे नागरिक म्हणून आपले देखील कर्तव्य आहे की सरकारी योजनांना पाठबळ देणे. एक सजग नागरिक म्हणून आपण देखील पाण्याचा होणारा अपव्यय टाळला पाहिजे.
सार्वजनिक ठिकाणी जर चुकून पाण्याचा नळ चालू राहिला असेल तर तो बंद केला पाहिजे. आपण ही सुरुवात आपल्या घरापासून केली तर एक प्रकारे आपण अशा लोकांपर्यंत हे पाणी पोहोचू शकतो ज्यांना त्याची खरी गरज आहे.
आज जेव्हा खेडोपाडी टँकरनी पाणी पुरवले जाते तेव्हा ते दृश्य फारच वेदनादायक असते. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची होणारी आटापिट, मारामारी हे मनुष्याच्या उन्नतीला मारक ठरणारे घटक आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे. मानवाने एकमेकांच्या प्रगतीसाठी कायम पुढे आले पाहिजे.
पाण्याचे योग्य नियोजन करून दुर्बल घटकांपर्यंत ते पुरवण्याचे काम माणसाने एकजुटीने केले पाहिजे. पाणी आडवा पाणी जीरवा यांसारख्या योजनांचा वापर करून आपण समाजाच्या हिताचेच काम करू शकतो. वृक्षारोपणामुळे देखील पर्जन्यवृष्टी होते.
आपण जर झाडे जगवली तर पर्यायाने आपण पावसाला आमंत्रितच करतो. वृक्ष आपल्या मुलांमध्ये पाणी धरून ठेवतात त्यामुळे भूजलाची पातळी देखील स्थिरावते. झाडे लावणे म्हणजे एक प्रकारे निसर्गाचे चक्र योग्य रीतीने सुरू ठेवणे होय.
ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडत नाही तसेच ज्या भागांमध्ये नद्या मृत झाल्या आहेत अशा ठिकाणी सरकार नदीजोड प्रकल्प सुरू करत आहे. नदी जोड प्रकल्पामुळे जिथे बारा महिने दुष्काळ असतो अशा प्रदेशांमध्ये देखील पाणी पोहोचेल आणि पर्यायाने तिथे शेती आणि इतर उद्योगधंदे देखील चालू होतील कारण उद्योगधंदांसाठी देखील भरपूर प्रमाणात पाणी लागते.
एकूण काय तर योग्य नियोजन केले तर आपण पाणी बचत करू शकतो आणि त्याचबरोबर प्रगती देखील साधू शकतो.
Pani Adva Pani Jirva Nibandh 10 Lines: पाणी अडवा पाणी जिरवा 10 ओळी निबंध
- पृथ्वीतलावर एकूण 71% प्रदेश हा पाण्याने व्यापलेला आहे तर केवळ 29 टक्के जमीन आहे.
- एवढा मोठा प्रदेश पाण्याने व्याप्त असला तरी यातील केवळ दोन टक्के पाणी हे पिण्यासाठी योग्य मानले जाते.
- इतर वेळी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
- पावसाचे पाणी आपण जर योग्य रीतीने साठवले तर आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही.
- इमारतीवर पडणारे पाणी आपण पाईप द्वारे टाकीमध्ये साठवून ठेवू शकतो आणि हे पाणी आपण घरगुती वापरासाठी वापरू शकतो.
- शेतामधील कामांसाठी लागणारे पाणी आपण शेततळी बांधून त्यात जमा होणारे पाणी वापरू शकतो.
- मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून देखील आपण भूजलातील पाण्याची पातळी स्थिर करू शकतो.
- ज्या भागांमध्ये दुष्काळ येतो किंवा जिथे कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते तिथे आपण पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळाला हरवू शकतो.
- पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे आणि ते मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणूनच ते जपून वापरले पाहिजे.
- सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा अपव्यय आपण टाळला तरी आपण जलसंवर्धनासाठी खूप मोठा हातभार लावू शकतो.
आज आपण पाणी आडवा आणि पाणी जिरवा या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर केला आहे तसेच दहा ओळींमध्ये देखील निबंध सादर केला आहे. आपणास आमच्या या लेख मालिकेतील निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊ नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद!