Rastyache Aatmkatahn Essay In Marathi: रस्त्याचे आत्मकथन निबंध मराठी

रस्त्याचे आत्मकथन मराठी निबंध : काय मित्रांनो? कसं काय चाललंय तुमचं? अहो असे इकडे तिकडे काय पाहता? जरा खाली वाकून पहा की. मी बोलतोय. अहो मीच ज्याच्या वरून तुम्ही दिवस-रात्र चालत असता तो तुमचा रस्ता… मी. अहो असे आश्चर्य का बरे वाटते तुम्हाला? मला आज तुम्हाला सर्वांशी काहीतरी बोलायचे आहे. आज माझ्या मनात असणाऱ्या अनेक गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत.

अहो मी तोच रस्ता बोलतोय जो काळानुसार बदलत गेला. पूर्वी मी अगदी कच्चा होतो. तुम्ही माणसांनीच माझ्या सुधारणा करून माझे रूपांतर पक्क्या रस्त्यामध्ये केले. माणसाच्या प्रागैतिहासिक काळापासून मी तुमच्यासोबत आहे. पूर्वी जेव्हा माणसे जंगलात राहत होती तेव्हा मी जंगलातील पायवाट म्हणून ओळखला जायचो. पुढे जशी माणसाची उत्क्रांती झाली तसेच माझी देखील उत्क्रांती झाली असे म्हणायला हरकत नाही.

जंगलातील पायवाटेची जागा खेडेगावातील छोट्या आडवळणी रस्त्यांनी घेतली. गावांमधील या नागमोडी वाटा पुढे शहराला जोडल्या गेल्या. मी पूर्वी नागमोडी वळणे घ्यायचो. जसा माझा विकास होत गेला आणि मी शहरांमध्ये दाखल झालो तसा मी अगदी सरळ झालो अगदी शहरातल्या माणसांना साजेसा. शहरातील माझे हे रूप भल्या भल्यांना मोहात पाडण्यासारखे आहे. एखाद्या स्त्रीच्या गुळगुळीत गालांसारखे झालेले माझे रूप शहरांमध्ये आढळते.

पूर्वी असणारे मातीचे अथवा बुरूम टाकून केलेले रस्ते आज आपल्याला खेडोपाडी आढळतात मात्र शहरांमध्ये विकसित झालेले रस्ते हे सिमेंट अथवा डांबराचे बनवलेले आढळतात.

गावी, खेडोपाडी माझ्या अंगावरून कितीतरी सायकली, बैलगाड्या, ट्रॅक्टर फिरत असतात. शेतात जाणाऱ्या बायका आणि पुरुष मंडळी मोठ्या दिमाखाने पावले टाकत माझ्या वरून जातात. जेव्हा या कष्टकऱ्यांचा घाम माझ्या अंगावर पडतो तेव्हा मला शहारून येते. मला या भूमिपुत्रांचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या रोजच्या दिनचर्येमध्ये मी त्यांना साथ देतो याचे मला समाधान वाटते.

शहरातून माझ्या अंगावरून हजारो वाहने जातात. कधी दुचाकी, कधी चार चाकी तर कधी मोठी अवजड वाहने ही माझ्यावरून जातात. मी शहरामध्ये धावपळीचे जीवन पाहतो. माझा आवाका जिथपर्यंत पसरलेला आहे तिथपर्यंत मला सर्वत्र माणसांचा आणि त्यांच्या वाहनांचा राबता शहरांमध्ये दिसून येतो. मला जेवढे खेडे आवडते तेवढेच माझे शहरही आवडते. शहरातील लोक तर माझ्या आजूबाजूने छान सजावट करतात. माझ्या दुतर्फा सुंदर अशी झाडे लावतात. तसेच माझ्या बाजूने ते शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संदेशही लिहितात. मला शहरी भागात राहणाऱ्या लोकांचे या उपक्रमाबद्दल फारच कौतुक देखील वाटते.

मित्रांनो तुम्ही मला तुमचा सोबती म्हणून वागवता कारण जिथे तुम्ही जाता तिथे सर्वत्र मी असतोच. माझ्यावरून अनेक मिरवणुका काढल्या जातात. जेव्हा तुम्ही सर्वजण गणेशोत्सवामध्ये बेधुंद होऊन नाचत असता तेव्हा तुमचा तो उत्साह पाहून मी अत्यंत आनंदी होतो. जेव्हा शिवजन्मोत्सव तुम्ही साजरा करता तेव्हा तुम्ही ज्या गर्जना देता त्याने मी देखील उल्हासित होऊन जातो. मी तुमच्याबरोबर राहून मला देखील तुमच्या भावना समजतात.

मित्रांनो हे सगळे जरी अगदी छान वाटत असले तरी मला तुमच्याबद्दल एक नाराजी आहे. जेव्हा तुम्ही माझ्यावरून स्वतःची वाहने बेफाम पणे चालवता तेव्हा मला ते पटत नाही. तुम्ही जेव्हा वाहतुकीचे नियम तोडता तेव्हा माझ्या मनाला खूप वेदना होतात. जेव्हा माझ्यावरती एखादा अपघात होतो तेव्हा मला त्याच्या वेदना होतात. मला तुम्हाला दुःखात पाहावत नाही. माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जेव्हा माझ्यावरून चालत असता अथवा तुम्ही एखादे वाहन चालवत असता तेव्हा तुम्ही दूरवर कटाक्ष फिरवून स्वतःची सुरक्षितता निश्चित करावी.

जेव्हा सिग्नल लागतो तेव्हा गाडी थांबवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे तुम्हा सर्वांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. तुम्ही जेव्हा वाहन सावकाशपणे चालवता तेव्हा तुम्ही इतर लोकांच्या जीवाची देखील काळजी घेत असता हे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे.

जेव्हा तुम्ही थोर महापुरुषांची नावे देता अथवा ज्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे अशा समाजसेवकांची नावे देता तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आज आपल्या आजूबाजूला असे अनेक रस्ते आहेत ज्यांना महापुरुषांची नावे दिली आहेत आणि त्यांची ओळख ही टिकवून ठेवण्यात आलेली आहे.

रस्त्याचे आत्मकथन निबंध दहा ओळी

  1. मित्रांनो असे आश्चर्यचकित होऊ नका होय मी रस्ता बोलत आहे ज्यावरून तुम्ही दिवस-रात्र चालत असता.
  2. मानवी उत्क्रांती पूर्वी मी तसा विकसित झालो नव्हतो, तेव्हा मी पाऊलवाटेच्या स्वरूपामध्ये होतो.
  3. पुढे जसा मानवी विकास होत गेला तसाच माणसांनी माझा देखील विकास केला
  4. खेड्यापाड्यांमध्ये आजही मातीचे आणि मुरमा पासून बनवलेले कच्चे रस्ते आहेत.
  5. जेव्हा मी शहरांमध्ये आलो तेव्हा माझा अगदी काया पालट झालेला दिसून येतो.
  6. शहरांमध्ये मी एका वेगळ्याच ढंगामध्ये तुम्हाला आढळून येईल जसे की मी सिमेंटचा रस्ता म्हणूनही ओळखला जातो किंवा डांबरापासूनही मला बनवले जाते.
  7. मी जेव्हापासून निर्माण झालो आहे तेव्हापासून मी मानवाच्या विकासाचा साक्षीदार राहिलो आहे.
  8. जेव्हा तुम्ही माणसे एखादा कार्यक्रम अथवा मिरवणूक रस्त्यावरून घेऊन जात असता तेव्हा मी फार खुश होतो.
  9. मित्रांनो जेव्हा तुम्ही वाहतुकीचे नियम डावलून वाहन चालवता तेव्हा मला अत्यंत वाईट वाटते.
  10. जेव्हा रस्त्यावर एखादा अपघात होतो तेव्हा माझे मन हेलावले जाते.

रस्त्याची उत्क्रांती कशी होत गेली?

सुरुवातीला रस्ता म्हणजे एखादी पाऊलवाट होती, पुढे जाऊन माती आणि मुरमा पासून रस्ता बनवला जात होता आणि आता शहरी भागांमध्ये तसेच गावांमध्ये सिमेंट आणि वाळू तसेच डांबर यांच्या मदतीने रस्ता तयार केला जातो.

रस्ता अत्यंत आनंदी केव्हा होतो?

जेव्हा रस्त्यावरून एखादी मिरवणूक निघते आणि माणसे जल्लोष करत असतात तेव्हा रस्ता अत्यंत आनंदी होतो.

रस्ता दुःखी कधी होतो?

जेव्हा रस्त्यावर एखादा अपघात घडतो अथवा जेव्हा लोक वाहतुकीचे नियम डावलतात तेव्हा रस्ता दुःखी होतो.

Leave a Comment