Stri Shikshanache Mahatva Nibandh in Marathi: शिक्षण म्हणजे कुण्या एकाची मालमत्ता नाही. शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांना आहे मग तो कोणत्याही जातीचा असो अथवा धर्माचा असो. पूर्वी स्त्री आणि पुरुषांपैकी फक्त पुरुषांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार होता मात्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रियांना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला. स्त्री शिक्षणामुळे समाज देखील पुढे गेला. स्त्री शिकली तर केवळ तीच पुढे जात नाही तर समाजाला देखील पुढे घेऊन जाते हे यातून सिद्ध झाले. आज आपण स्त्री शिक्षणाचे महत्त्व या विषयावर आधारित निबंध पाहणार आहोत.
Stri Shikshanache Mahatva Essay in Marathi
शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही असे डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले आहे. शिक्षण मग ते कोणत्याही विषयातले का असेना माणसाने जर ते आत्मसात केले तर तो आयुष्यात यशस्वी होतोच. शिक्षण हा कोणतीही गोष्ट मिळवण्याचा राजमार्ग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शिक्षणामुळे माणसाचे आयुष्य सुसह्य होऊन जाते. शिक्षण माणसाला नुसते पुस्तकी ज्ञानच देते असे नाही तर व्यावहारिक समाजामध्ये कसे राहिले पाहिजे हे देखील शिक्षणामुळेच आपल्याला समजते किंबहुना आपण शिक्षणामुळे निर्णय घेण्यास सक्षम होतो. हे शिक्षणच आहे ज्याने आज स्त्री आणि पुरुष या दोघांमधील दरी मिटवली आहे.
अन्यथा जुन्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना शिक्षणासाठी परवानगी नव्हती अथवा शिक्षणाचा हक्क दिला गेला नव्हता त्यावेळी स्त्रियांची परिस्थिती अगदीच मागास होती. आज स्त्रिया शिकल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या त्यामुळे त्या स्वावलंबी बनल्या.
पूर्वीच्या काळी स्त्रिया स्वावलंबी नव्हत्या त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कायम पुरुषांवर अवलंबून राहावे लागत होते यातून स्त्रियांच्या हक्कांची गळचेपी करण्यात आली. शिक्षणामुळे स्त्रियांना समजले की त्यांनाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका एका पुरुषाला आहे.
पूर्वी स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे स्त्रियांना लिहिणे, वाचणे शक्य नव्हते. स्त्रियांच्या या अडाणीपणाचा फायदा कितीतरी सुशिक्षित लोकांनी घेतला. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळवतानाही स्त्रियांना अनंत यातना भोगाव्या लागल्या.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती आणली. यामध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या पत्नीपासून केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले हिला शिक्षण दिले आणि इतर स्त्रियांना शिकवण्यासाठी त्यांना प्रेरित सुद्धा केले.
सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षक होत. जेव्हा सावित्रीबाई फुले या मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात तेव्हा तेथील कर्मठ लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल फेकत असत. या अवहेलने मुळे त्या दुःखी,कष्टी होत मात्र तरीही त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे आपले पवित्र कार्य थांबवले नाही. स्त्रीची सहनशीलता काय असते हे यातून आपल्याला समजते.
एक स्त्री शिकली तर ते कुटुंबच नव्हे ती समाजाला देखील पुढे घेऊन जाते आणि घडवते हे आपल्याला यातून दिसून येते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत. आज विज्ञान असो अथवा तंत्रज्ञान असो, कलाक्षेत्र असो अथवा साहित्य क्षेत्र असो सर्वत्र स्त्रियांचा उदो उदो आहे.
स्त्रिया वैमानिक देखील आहेत आणि स्त्रिया डॉक्टर देखील आहेत. स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. स्त्रीची प्रगती यामुळेच शक्य झाली आहे.
स्त्री आज कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेले नाही. पाककला असो अथवा संगीत असो . जे महान लोक कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये पारंगत झाले आहेत त्या महान लोकांमध्ये देखील स्त्रिया आहेत. फक्त कलाक्षेत्रच नाही तर देशाच्या संरक्षण खात्यामध्ये देखील मोठमोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत.
कितीतरी अधिकारी क्षेत्रांवर आज स्त्रिया काम करत आहेत. स्त्रियांकडे काम करताना असणारी निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण हे शिक्षणामुळेच शक्य झाले आहेत. स्त्री शिकून फक्त स्त्रीची प्रगती नाही झाली तर संपूर्ण समाजाची प्रगती झाली आहे.
आज स्त्री शिक्षणामुळे देश पुढे जात आहे. जागतिक स्तरावर तर अनेक स्त्रिया भारताचे नेतृत्व करत आहेत. आपल्या भारत देशामध्ये सुषमा स्वराज यांसारख्या महान स्त्री नेत्या होऊन गेल्या ज्यांनी परराष्ट्र धोरण अगदी उत्तमरीत्या सांभाळले. झाशीची राणी लक्ष्मीबाई तर सर्वांना माहित आहेतच.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु म्हणजेच आई जिजामाता आज सर्व स्त्रियांचे प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक समाज अशा खंबीर स्त्रियांमुळेच पुढे जात असतो. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला शिक्षण हे मिळालेच पाहिजे. अन्न,वस्त्र, निवारा याचबरोबर शिक्षण हे देखील महत्त्वाचे आहे.
Stri Shikshanache Mahatva Nibandh 10 Lines: स्त्री शिक्षणाचे महत्त्व निबंध 10 ओळी
- भारत हा प्रजासत्ताक देश आहे या देशामध्ये स्त्री आणि पुरुष समानता आहे.
- समानतेच्या या धोरणामुळेच स्त्रीला देखील शिक्षणाचा संपूर्ण अधिकार मिळालेला आहे.
- एखादा समाज तेव्हाच पुढे जातो जेव्हा त्या समाजातील प्रत्येक घटक हा शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवतो.
- स्त्री शिक्षणामुळे केवळ एकटी स्त्री पुढे जात नाही तर संपूर्ण समाज पुढे जात असतो.
- स्त्री शिक्षणामुळे आजच्या काळामध्ये स्त्री ही सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे.
- आज कलाक्षेत्र, साहित्य क्षेत्र, क्रीडाक्षेत्र, मनोरंजन क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र या सर्व ठिकाणी स्त्रीने स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे.
- स्त्रिया शिक्षणामुळे एक उत्तम नागरिक तर बनतात पण त्यासोबत त्या उत्तम समाजाची बांधणी देखील करतात.
- स्त्री ही मुळातच सृजनशील आहे आणि या गुणामुळे ती उत्तम समाज घडवते.
- स्त्री ही नवीन पिढीसाठी कायम प्रेरणा स्त्रोत आहे स्त्री मधूनच नवीन समाज घडत असतो.
- स्त्री शिक्षण हे सर्व समाजाच्या हिताचे आहेत किंबहुना समाज तेव्हाच पुढे जाईल जेव्हा त्यातील प्रत्येक घटक हा सुशिक्षित असेल.
आज आपण स्त्री शिक्षणाचे महत्त्व या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केलेला आहे. आपणास या निबंध मालिकेतील हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊ नक्की कळवा. अशाच नवनवीन विषयांवरील लेखांसाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या. धन्यवाद!