Veleche Mahatva Essay In Marathi: वेळेचे महत्त्व निबंध मराठी

Veleche Mahatva Nibandh In Marathi: माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. जो या क्षणांचा आदर करायला शिकतो आणि त्याचा योग्य वापर करतो तो माणूस आयुष्यात जे हवे ते कमावू शकतो मात्र जो व्यक्ती या वेळेला महत्त्व देत नाही अशा व्यक्तीचे सदैव नुकसानच होते. जी गोष्ट ज्या वेळेला केली पाहिजे तेव्हा केली नाही तर वेळ निघून गेलेली असते आणि आपण मात्र आहे तिथेच अडकलो जातो. म्हणूनच आजच्या या निबंध मालिकेमध्ये आम्ही आपणासाठी वेळेचे महत्व या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध प्रस्तुत केला आहे

Veleche Mahatva Essay In Marathi

अनेक थोर माणसे म्हणून गेली आहेत , “वेळ ही कुणासाठीच थांबत नाही”, कटू असले तरी हेच सत्य आहे. माणूस वेळेचा गुलाम आहे. जो वेळेला मान देतो तोच आयुष्यात मान मिळवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणसाच्या जन्माबरोबरच त्याची वेळ सुरू होते. आजवर इतिहास साक्षी आहे की योग्य वेळी जर निर्णय घेतले गेले नाहीत तर त्यांचे परिणाम हे भयंकर असू शकतात.

आपण जन्माला येतो त्यानंतर आपले आणि वेळेचे नातेच जुळून जाते. या वेळेबरोबरच आपण लहानाचे मोठे होत जातो. लहानपणी शाळेमध्ये जात असताना शाळेत वेळेवर पोहोचले नाही तर शिक्षकांच्या हातून छडी बसते.

आपल्याला सर्वप्रथम येथेच वेळेचे महत्व समजले तर पुढे जाऊन आपण कधीच वेळ चुकवत नाही. शाळेत वेळेवर जाणे, वेळेवर दिलेला अभ्यास पूर्ण करणे हे जर आपण नित्यनियमाने पाळले तर आपले जगणे सुसह्य होऊन जाते अन्यथा प्रत्येक गोष्ट ही घाई गडबडीत करण्यात येते आणि त्यातून बऱ्याचदा गोष्टी चुकतात आणि त्याची नुकसान भरपाई आपल्याला भोगावी लागते.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना देखील आपण वेळेवर प्रत्येक तासाला उपलब्ध राहिलो नाही तर त्यात आपलेच नुकसान होऊन जाते. वेळेचे महत्व समजावून घेण्यासाठी एक फार जुनी वाक्य उपलब्ध आहेत.

जर एक सेकंदाचे महत्त्व समजावून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीला विचारा जो व्यक्ती ऑलिंपिक स्पर्धेमध्ये फक्त एका सेकंदाच्या फरकामुळे सुवर्णपदकाला मुकलेला असतो. एका मिनिटाचे महत्व विचारायचे असेल तर रस्त्यावरून ॲम्ब्युलन्स घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला विचारा की त्याच्या एका मिनिटाच्या उशिरामुळे एखाद्या रुग्णाला किती धोका पोहोचू शकतो. म्हणूनच वेळेचं महत्व हे अनन्य साधारण आहे.

जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो तेव्हा कितीतरी विद्यार्थी हे रात्रीचा दिवस करून मेहनत घेत असतात. अशावेळी ते वेळेलाच स्वतःचे शस्त्र बनवून लढाई करत असतात असे म्हणायला हरकत नाही. जो व्यक्ती वेळेचे योग्य नियोजन करायला शिकतो तो आपल्या आयुष्यातील लढाई जिंकतोच.

आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा वेळ देतो तेव्हा आपण देखील त्याचा वेळ घेतलेला असतो अशावेळी दिलेली वेळ सांभाळणे ही आपली जबाबदारी असते. एखाद्या व्यक्तीच्या वेळेचा खोळंबा आपल्यामुळे होणार नाही याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

वेळेचे महत्व आपल्याला एखाद्या मुलाखतीच्या वेळी देखील समजू शकते जेव्हा आपल्याकडे खूप कमी वेळ असतो आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचे असते की आपण ज्या पदासाठी मुलाखत देण्यासाठी आलो आहोत त्याकरता आपण योग्य उमेदवार आहोत. कमीत कमी वेळेमध्ये आपली सिद्धता सादर करणे हे म्हणजे वेळेसमोर परीक्षा देण्यासारखेच असते.

जेव्हा आपण स्वयंपाक घरामध्ये दूध गॅसवर ठेवतो तेव्हा त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर ते उतू जाऊ शकते त्याप्रमाणेच जर एकदा वेळ निघून गेली तर ती देखील परत माघारी येत नाही. वेळ हे दुधारी शस्त्र आहे तिचा चांगला पद्धतीने वापर केला तर ती आपल्या बाजूने लढते मात्र जर तिचा अनादर केला तर ती आपलाच घात करते हे आपण कायम लक्षात ठेवून वागले पाहिजे.

जेव्हा एखादे मुल लहान असते तेव्हा त्याला सर्वात जास्त गरज असते ती आपल्या आई-वडिलांच्या वेळेची जर आपण त्याला ती वेळ देऊ शकलो नाही तर पुढे जाऊन पश्चाताप करण्याला काहीच अर्थ उरत नाही कारण तोवर वेळ निघून गेलेली असते.

जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा जर आपण वेळेवर डॉक्टरांकडे गेलो नाही तर पुढे होणाऱ्या गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणूनच वेळेत उपचार घेणे हे कधीही रास्तच मानले पाहिजे.

आपल्या काल्पनिक विश्वामध्ये कितीतरी लोकांनी वेळेत मागे जाऊन आपल्या चुका दुरुस्त करता येतील का यासाठी टाईम मशीन ही संज्ञा वापरात आणली.

आजवर टाईम मशीन या विषयावर अनेक चित्रपट देखील निघाले. मात्र बहुतांश चित्रपटांमध्ये सर्वात शेवटी टाईम मशीन वापरूनही आपण गेलेली वेळ कधीच बदलू शकत नाही हेच दाखवण्यात आले. म्हणूनच जी वेळ आपल्या हातात आहे ती योग्य मार्गाने वापरली तर आपल्याला पश्चात्ताप करण्याची वेळ कधीच येणार नाही.

माणसाने कायम वर्तमान काळामध्ये जगले पाहिजे. भूतकाळात जे झाले ते विसरून मात्र त्यातून धडा घेऊन माणसाने पुढे गेले पाहिजे. भविष्यकाळात काय होईल याचा विचार करत जर माणूस बसला तर त्याच्या हातात असलेली वेळही निघून जाते आणि त्याला ते समजतही नाही.

माणसाने कायम वर्तमानात जगून जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. जर आपण वेळीच ही गोष्ट शिकलो तर आपले जगणे सुसह्य होईल.

Veleche Mahattva Nibandh In Marathi 10 Lines: वेळेचे महत्त्व निबंध 10 ओळी

  1. गेलेली वेळ कधीच परत येत नाही हे बोल आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
  2. वेळ जरी गेली असली तरी प्रत्येक गेलेल्या वेळेतून माणसाने धडा घेतला पाहिजे आणि जुन्या चुका सुधारायला हव्यात.
  3. माणसाच्या आयुष्याला लाभलेले सर्वात मोठे वरदान म्हणजे वेळ.
  4. शैक्षणिक जीवनामध्ये जर आपण वेळेचे नियोजन करायला शिकलो तर आपले वैयक्तिक फायदे आहेत.
  5. आपल्या जीवनामध्ये आपण वेळेचा अपव्यय टाळला पाहिजे.
  6. परीक्षेत नापास झालेल्या मुलाला वेळेचे महत्व तेव्हा समजते जेव्हा त्याच्या हातून एक वर्षाची वेळ निघून गेलेली असते.
  7. आज कालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ ही विजेच्या वेगाने धावत आहे.
  8. माणूस म्हणून जगत असताना आपण वर्तमान काळामध्ये जगून वेळेचा आनंद घेतला पाहिजे.
  9. निघून गेलेल्या वेळेबद्दल शोक करत बसण्यात काहीच अर्थ नाही.
  10. आपण जर वेळेचे योग्य नियोजन केले तर आपण आयुष्यात यशस्वी होतोच.

आज या निबंध मालिकेमध्ये वेळेचे महत्व या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊ नक्की कळवा. अशाच नवनवीन विषयांवरील निबंधांसाठी आमच्या लेख मालिकेला नक्की भेट द्या. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद!

Leave a Comment