Autobiography Of Umbrella Essay In Marathi:छत्री ची आत्मकथा निबंध मराठी

Chatri Chi Aatmkatha Essay In Marathi: मंडळी नमस्कार, अहो इकडे तिकडे काय पाहताय मीच बोलतिये तुमच्या हातातील तुमची सोबती तुमची लाडकी छत्री. अहो असे चकित नका होऊ. आज मी तुमच्याशी खूप गोष्टी बोलणार आहे. तुम्ही सर्व जण आणि मी आपले एक अतूट असे नाते आहे.मित्रांनो तुम्ही माझा वापर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये करता. उन्हाळ्यामध्ये उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तर पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून तुम्ही माझा वापर करता.जेव्हा कडाक्याचे ऊन पडते तेव्हा जर काही कामानिमित्त तुम्हाला बाहेर जायचे असेल तर तुम्ही सर्वात प्रथम घरामध्ये मला शोधू लागतात. उन्हाळ्यामध्ये तर उन्हापासून वाचण्यासाठी तुम्ही रंगीबिरंगी छत्र्या वापरता.

पांढरी, गुलाबी, निळी, लाल, हिरवी, जांभळी, काळी तसेच आज काल तर सप्तरंग एकत्र असलेली छत्री बाजारामध्ये उपलब्ध आहे.तुम्ही जेव्हा मला घेऊन रस्त्याने फिरता तेव्हा त्यातून तुम्हाला जे सुख लागते ते पाहून मी अत्यंत आनंदी होते. जेव्हा तुम्ही मला सोबत घेऊन फिरता तेव्हा तुम्ही अगदी रुबाबदार वाटता.मित्रांनो माझा वापर जसा उन्हाळ्यात होतो तसाच पावसाळ्यात तर माझ्या खरेदीसाठी बाजारामध्ये झुंबड उडते.

लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच आवडीची छत्री घेण्यासाठी प्रत्येक जण दुकानात गर्दी करतो. आज काल तर बाजारामध्ये माझे विविध प्रकार उपलब्ध आहेत. जुन्या मोठ्या पद्धतीच्या छत्र्या, फायबरच्या कांड्या असलेल्या छत्र्या, लहान मुलांसाठी प्राण्यांचे अथवा पक्षांचे चित्र असलेल्या नक्षीदार छत्र्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मला तर काही कारागीर इतके सुंदर रंग करतात की मला पाहता क्षणी अनेक जण माझ्या प्रेमात पडतात.

पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांकडे छत्र्या नव्हत्या तेव्हा लोक डोक्यापासून पाठीपर्यंत पोत्याचे आवरण करून त्यामध्ये स्वतःचे पावसापासून संरक्षण करत. आजही भात शेतीच्या कामांमध्ये जर पाऊस आला तर अशावेळी भात लावणी करताना प्लास्टिकचे पोते डोक्यापासून पाठीपर्यंत घेऊन काम करणारे शेतकरी आपल्याला दिसून येतील.आज-काल सर्वत्र पावसाळी जॅकेट्स आढळून येतात, मात्र लोकांनी माझ्या प्रति असलेली ओढ कमी केलेली नाही. आजही पावसाळा मध्ये सर्वात जास्त मागणी ही छत्रीला असते.l

जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा तुमच्या हातात छत्री असून देखील तुम्ही भिजता मात्र कमीत कमी तुमचे डोके भिजण्यापासून वाचविण्याचे काम मी करते.मित्रांनो माझा इतिहास तसा फार जुना आहे आणि ज्याप्रमाणे माणसाची उत्क्रांती होत गेली त्याप्रमाणे माझ्या रचनेत देखील काळानुरूप बदल घडत गेला आहे. आधी लोक कमळाची पाने एकमेकांना जोडून त्याची छत्री बनवत.

हळू हळू त्याची जागा ही कापडाने घेतली ज्याला धातू च्या सहाय्याने एकत्र बांधले गेले आणि पुढे जाऊन उघडझाप करता येणारी छत्री जी मी आता दिसते तशी तयार झाले.पुर्वी राजेमहाराजे बाहेर जाताना त्यांच्यावर छत्र धरले जात असे. हे राजे आपल्या जनतेचे पालक होते तसेच एखाद्या पित्याप्रमाणे त्यांच्या जनतेचे रक्षण करीत आणि त्यांच्या अमलाखाली फार मोठा प्रदेश असे त्यांना छत्रपती म्हटले जात असे.

हिंदी साहित्यामध्ये परमेश्वराला देखील “नीली छत्रीवाला” असे म्हटले जाते. आपल्या डोक्यावर जे आभाळ आहे ती निळी छत्री घेऊन परमेश्वर उभा आहे असा त्यातून अर्थबोध होतो.मित्रांनो मात्र मला तुमच्याबद्दल एक तक्रार देखील आहे. जेव्हा माझा वापर संपतो तेव्हा तुम्ही मला अडगळीत टाकून देता.

मी तिथे अडगळीत खूप एकटी पडते. तुम्ही माझा वापर करून झाल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञ पणे राहत नाही याचे मला वाईट वाटते.जेव्हा तुम्हाला माझी गरज असते तेव्हा मग तुम्ही माझी शोधाशोध करता मात्र मी तुम्हाला सापडत नाही कारण तुम्ही वापर करून झाल्यावर मला कुठेही फेकून दिलेले असते तसेच या सगळ्यामध्ये माझ्या काड्या मोडतात तसेच दांडा मोडतो मग मी निरुपयोगी झाले असे म्हणून तुम्ही मलाच दोष देता मात्र स्वतःची चूक मान्य करत नाही.मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही माझा वापर करून झाला की मला माझ्यासाठी एखादी जागा निर्धारित करून तेथे ठेवत जा जेणेकरून पुढच्या वेळी मी तुम्हाला सुस्थितीमध्ये आढळेल. बाकी माझा तुमच्यावर कोणताही रोष नाही तुम्ही मला थोडे प्रेमाने वागवा एव्हढीच मागणी आहे.चला मी फार बोलले, आता भेटू लवकरच..

Chatri Chi Aatmkatha 10 Lines Essay In Marathi

  1. मी छत्री आहे, तुमची रोजची सोबती.
  2. उन्हाळ्यात मी तुम्हाला कडक उन्हापासून वाचवते.
  3. पावसाळ्यात पावसापासून संरक्षण करणे हे माझे मुख्य काम आहे.
  4. रंगीबिरंगी रूपात मी बाजारात उपलब्ध असते.
  5. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच मी आवडते.
  6. पूर्वी कमळाच्या पानांपासून माझी निर्मिती होत असे.
  7. काळानुसार माझ्या रचनेत अनेक बदल झाले.
  8. आजही पावसाळ्यात माझी मोठी मागणी असते.
  9. वापरानंतर मला नीट जपले जात नाही याचे मला वाईट वाटते.
  10. मला जपून ठेवा, मी नेहमी तुमच्या मदतीला येईन.

छत्रीचा वापर कोणत्या ऋतूंमध्ये होतो?

छत्रीचा वापर मुख्यतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात होतो.

छत्रीचे मुख्य काम काय आहे?

पाऊस आणि ऊन यांपासून संरक्षण करणे हे छत्रीचे मुख्य काम आहे.

पूर्वी छत्री कशापासून बनवली जात असे?

पूर्वी कमळाची पाने किंवा कापड वापरून छत्री तयार केली जात असे

आजकाल छत्रीचे कोणते प्रकार आढळतात?

फायबरच्या, नक्षीदार, लहान, मोठ्या आणि रंगीबिरंगी छत्र्या आढळतात

छत्रीची तक्रार काय आहे?

वापरानंतर लोक छत्री नीट जपत नाहीत ही तिची तक्रार आहे.

Leave a Comment