Marathi Essay On My Hobby: पुस्तक म्हटलं की मी एखाद्या अधाशी व्यक्ती सारखीच होऊन जाते. जसा एखादा भुकेलेला व्यक्ती असेल आणि त्याच्यासमोर पंचपक्वानाचे ताट वाढवून ठेवले तर तो त्या ताटावर तुटून पडतो त्याप्रमाणेच माझ्यासमोर जर एखादे पुस्तक आले तर ते पुस्तक वाचून त्याचा फडशा पाडल्या शिवाय मला स्वस्थता लाभत नाही. माझ्यासाठी पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे.
अगदी शालेय जीवनामध्ये देखील सुविचार सांगितला जात असे की पुस्तक म्हणजे आपले मित्र. मी माझ्या आयुष्यामध्ये हा सुविचार कायम माझ्या मनात घट्ट करून ठेवला आणि पुस्तकांना स्वतःचे मित्र मानले. मित्र कसा असावा? मित्र पुस्तकांसारखा असावा ज्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला एक नवीन धडा वाचता यावा, समजून घेता यावा आणि आपण त्यातून समृद्ध व्हावे.
मी अगदी शालेय जीवनापासून अवांतर पुस्तक वाचन केलं आहे. शाळेची अभ्यासाची पुस्तके तर मी आवडीने वाचतेच पण त्याचबरोबर विविध लेखकांची विविध विषयांवरील पुस्तके वाचायला देखील मला फार आवडते.
पुस्तकांमध्ये एक वेगळेच विश्व सापडते आणि ते पुस्तक वाचताना मी देखील त्या विश्वामध्ये एकरूप होऊन जाते. मी जेवढ्या आवडीने कथा, कादंबऱ्या आणि कविता वाचते तेवढ्याच आवडीने भयकथा, प्रवास वर्णने, आत्मचरित्रे, चरित्र लेखन आणि भौगोलिक व ऐतिहासिक विषयांवरील पुस्तके देखील वाचते.
प्रवासवर्णने वाचताना मी जणू काही लेखकाने वर्णन केलेल्या सुंदर अशा ठिकाणी पोहोचून जाते. प्रवासवर्णने असलेली पुस्तके मला फार आवडतात कारण त्यामध्ये लेखकाची तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाण्याची हातोटी किंवा कला ही कौतुक करण्याजोगी असते.
प्रवासवर्णने वाचताना तुम्ही अगदी घरबसल्याही साताऱ्यातील कास पठारावर जाऊन येता आणि तेथील सुंदर अशा फुलांचा नजारा डोळ्यात साठवून ठेवू शकता. ही प्रवास वर्णने पुस्तकांमध्ये शब्द रूपांनी बद्ध केल्यामुळे वाचकाला एखाद्या ठिकाणी न जाता ही त्या ठिकाणाची मजा अनुभवता येते.
श्रेष्ठ लेखक वि. स. खांडेकर यांनी शब्दबद्ध केलेली ययाती कादंबरी मी इयत्ता आठवी मध्ये असतानाच वाचलेली आहे. ही कादंबरी वाचत असताना कादंबरीचा नायक ययाती यांचे जे वर्णन लेखकाने केले आहे ते वाचून आपल्यासमोर प्रत्यक्ष ययाती उभा राहतो.
अल्लड वयातील ययाती, तारुण्यातील ययाती आणि प्रौढ ययाती हा विविध रूपांमध्ये कादंबरीमध्ये आपल्याला भेटतो आणि त्याची ही भेट आपल्याला कितीतरी गोष्टींवर विचार करण्यासाठी प्रवृत्त करते. कादंबरीतील प्रत्येक पात्र आपल्याला परिचयाचे वाटते. वाचकांना कादंबरीमध्ये गुंतवून ठेवण्याचे हे लेखकाचे कौशल्य खरेच वाखाणण्याजोगे आहे.
भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री शिवाजी सावंत हे एक महान लेखक होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय कादंबरी आपल्याला कर्णाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते. महाभारत जर खरेच घडले असेल तर त्यात एक व्यक्ती म्हणून असलेली कर्णाची छबी आपल्याला मृत्युंजय कादंबरी मध्ये अनुभवायास मिळते.
कर्ण आपल्याला त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडणाऱ्या अनेक गोष्टींचे दर्शन घडवतो आणि कुठेतरी एक सामान्य जन म्हणून आपल्याला कर्णावर अन्याय झाला का? असा प्रश्न पडतो. छत्रपती संभाजी महाराजांची गौरवशाली कार्यकीर्द लिहिलेली छावा कादंबरी देखील आपल्याला इतिहासामध्ये घेऊन जाते.
धर्मरक्षणासाठी संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान वाचून आपल्या डोळ्यातील पाणी आपल्याला थांबवता येत नाही. लेखकाने आपल्यासमोर इतिहासातील प्रसंग जसाच्या तसा उभे करणे हे अविस्मरणीय आहे आणि हा अनुभव केवळ पुस्तक वाचनातून येतो.
छंद म्हणून पुस्तक वाचताना पुस्तक वाचनाने होणारे फायदे देखील आपण ध्यानात घेतले पाहिजेत. पुस्तक वाचण्याने माणसाचे विचार हे समृद्ध होतात. माणूस चौकस बुद्धीने विचार करायला सुरुवात करतो.
पुस्तक वाचनाने आपल्याला बाह्य जगातील कितीतरी गोष्टींबद्दल ज्ञान मिळते. पुस्तके वाचण्याने आपल्याला ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक गोष्टींचे ज्ञान मिळते. पुस्तके वाचल्याने कुठला तोटा होतो असे सध्या तरी ऐकिवात नाही. पुस्तके वाचत राहिल्याने माणूस स्वतःचा विचार स्वतः करायला शिकतो म्हणजेच माणूस प्रगल्भ होतो.
दुसऱ्या कुणाच्या विचारांची कुबडी माणसाला घ्यावी लागत नाही कारण अवांतर पुस्तके वाचनाने व्यक्ती चांगले आणि वाईट यांचा फरक स्वतः समजायला सुरुवात करतो. पुस्तके वाचनाचे अगणित फायदे आहेत म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून पुस्तके वाचली पाहिजेत.
My Hobby Reading Books Essay In Marathi 10 Lines
- पुस्तके वाचनाची आवड मला शालेय जीवनापासूनच लागलेली आहे.
- पुस्तके म्हणजे आपले मित्र असतात आणि अशा चांगल्या मित्रांच्या संगतीत आपली ही वाढ अगदी चांगली होते.
- माझा पुस्तक वाचन हा आवडीचा छंद जोपासताना मी अनेक लेखकांच्या कथा कादंबऱ्या वाचल्या आहेत.
- पुस्तके वाचल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते तसेच आपल्याला इतर प्रदेशांची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती देखील पुस्तकांमधूनच मिळते.
- श्री शिवाजी सावंत लिखित छावा आणि मृत्युंजय या माझ्या आवडत्या कादंबऱ्या आहेत.
- श्रीकृष्णांवर आधारित युगंधर ही कादंबरी देखील माझी आवडती कादंबरी आहे.
- पु ल देशपांडे यांनी लिहिलेले बटाट्याची चाळ हे माझे आवडते पुस्तक आहे.
- मला प्रवासवर्णने वाचायला देखील फार आवडतात.
- पुस्तके वाचण्याने माणूस प्रगल्भ होतो आणि माणसाची एखादा निर्णय घेण्याची निर्णय क्षमता देखील सुधारते.
- प्रत्येक पुस्तक आपल्याला नवीन गोष्ट शिकवत असते म्हणूनच आपण कायम पुस्तके वाचत राहिले पाहिजे असे माझे मत आहे.
लेखकाला पुस्तके वाचण्याचा छंद का आवडतो?
लेखकाला पुस्तके म्हणजे ज्ञानाचे भांडार वाटते. पुस्तकांमधून नवीन विचार, अनुभव आणि जीवनाचे धडे मिळतात, म्हणून पुस्तके वाचणे हा लेखकाचा आवडता छंद आहे.
लेखकाला कोणकोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात?
लेखकाला कथा, कादंबऱ्या, कविता, भयकथा, प्रवासवर्णने, आत्मचरित्रे, चरित्रे तसेच ऐतिहासिक आणि भौगोलिक विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात.
पुस्तक वाचनाचे फायदे कोणते आहेत?
पुस्तक वाचनामुळे विचार समृद्ध होतात, ज्ञान वाढते, माणूस प्रगल्भ बनतो आणि चांगले-वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित होते.