Shetkrayachi Aatmkatha Essay In Marathi: शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी

Shetkaryachi Aatmakatha Marathi Nibandh : तुम्ही सर्वजण मला जगाचा पोशिंदा म्हणता. आज जर मी शेतात धान्य पिकवले नाही तर ते बाजारात उपलब्ध होणार नाही. जर बाजारात धान्य उपलब्ध झाले नाही तर आपोआपच त्याच्या किमती या गगनाला भिडू शकतात. तुम्ही सर्व लोक ज्याप्रमाणे सोन्याची खरेदी करण्यासाठी झुंबड करता तसेच धान्याच्या वाढत्या किमतीमुळे धान्य देखील महाग होऊन जाते.

जे धान्य आपल्याला आरोग्य देत असते, जे अन्न आपल्या पोटात गेले तरच आपण चालू फिरू शकतो त्या अन्नाला आपण कमी महत्त्व देतो तसेच ते धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला देखील काही लोक धान्याची किंमत जास्त सांगत आहे असे बोलून भांडण करतात. पण तुम्ही सर्वांनीच विचार करा की मी एक शेतकरी , उन्हामध्ये, पावसामध्ये कशाचीही पर्वा न करता हे धान्य पिकवत असतो मग त्यासाठी मी जी धान्याची किंमत ठरवली आहे ती देताना मात्र तुम्ही सर्वजण हात वर का करता?

माझे नाव सिताराम आहे. मी शेती करून माझा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहेत. माझे आई-वडील हे अतिशय वृद्ध असल्याकारणाने आता ते शेतीमध्ये मला मदत करू शकत नाहीत. माझी अर्धांगिनी ही मला शेतीमध्ये मदत करते तसेच माझ्या वृद्ध आई-वडिलांची काळजी देखील घेते. माझी दोन लहान मुले आहेत ती देखील शाळेमध्ये जातात आणि जसा वेळ मिळेल तशी मला शेतीमध्ये मदत देखील करतात.

मी एक साधा भोळा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबणे आणि मुखामध्ये विठ्ठलाचे नाव ठेवणे आणि वारकरी संप्रदायाची शिकवण लक्षात ठेवून मी माझी दिनचर्या पूर्ण करत असतो.

शेतकरी म्हणून आयुष्य जगताना मला रोज नवनवीन गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी खूप पाऊस येतो तर कधी अगदी दुष्काळ पडतो मात्र या अस्मानी संकटात सोबत मला दोन हात करावे लागतात. जेव्हा खूप पाऊस पडत असतो तेव्हा मला माझे पिक वाया तर जाणार नाही ना यार गोष्टीचे भय वाटते.

बाजारात पीक विकायला गेल्यानंतर देखील काही गिऱ्हाईक पिकाचा भाव योग्य लावला नाही म्हणून माझ्याशी वाद घालतात. कधीकधी मला तोट्यामध्ये जाऊन व्यवहार करावा लागतो कारण भाजीपाला हा नाशवंत असतो. मी इतके कष्ट करून पिकवलेला भाजीपाला मला तोट्यामध्ये विक्री करावा लागल्यामुळे पैशांची चणचण भासते. कधी कधी तर माझ्या मुलांच्या शाळेतील फी भरण्यासाठी देखील माझ्याजवळ पैसे नसतात. शेतकऱ्यांची मुले म्हणून माझ्या मुलांना सरकारने मोफत शिक्षण दिले पाहिजे असे माझे म्हणणे आहे.

मी माझ्या कुटुंबाचा एकमेव आधार आहे. जेव्हा मी आजारी असतो तेव्हा माझी बायको शेतात जाऊन काम करते. सरकार आम्हा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सरकार दप्तरी बनवत आहे मात्र या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेताना अगदी तुटपुंजी रक्कम आम्हाला मिळत असते. सरकार जे रक्कम आम्हाला देते त्या रकमेमध्ये महिन्याचा घरासाठी लागणारा किराणा देखील येऊ शकत नाही.

मी जरी एक लहान शेतकरी असलो तरी मी हार मानलेली नाही. मी माझ्या शेताच्या बांधावर विविध भाज्या पिकवतो. भाज्यांमधून मी थोडेफार पैसे कमावतो तसेच उरलेल्या भाज्या आम्ही स्वतःच्या घरामध्ये वापरतो. मी शेतामध्ये शेततळे देखील बांधले आहे जेणेकरून मला पाण्यासाठी इतरत्र वणवण भटकावे लागत नाही.

शेती करण्याबरोबरच मी पशुपालन हा जोडधंदा देखील करत आहे. पशुपालन करताना मी माझ्या घरी गाई आणि म्हशी पाळल्या आहेत. आम्ही नवरा आणि बायको मिळून रोज सकाळी या गाई म्हशींना चारा घालतो, पाणी पाजतो. आम्ही दोघे मिळून त्यांच्या धारा काढतो. धारा काढून झाल्यानंतर त्यातील काही दुधाचा भाग हा आम्ही स्वतःसाठी घरी ठेवतो आणि उरलेला भाग डेअरी ला देतो. डेअरी मधून जे दुधाचे पैसे येतात त्यात आम्ही आमचे घर चालवतो.

भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपल्याला माहित आहे. आजही भारतामध्ये बहुतांश लोक शेतीवर आपली उपजीविका चालवतात. शेती हा व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये निसर्गाचे संतुलन भरपूर गरजेचे असते. निसर्ग जर कोपला तर परिणामी त्याचा तोटा हा माणसाला भोगावा लागतो. एक शेतकरी म्हणून मला कायम असे वाटते की आपण निसर्गाला आपली देवता मानून वागले पाहिजे.

मी शेती करत असताना देखील निसर्गाने मला जे दान भरभरून दिले आहे त्याबद्दल सतत देवाचे आणि निसर्गाचे आभार प्रकट करतो आणि म्हणूनच हा निसर्ग मला प्रत्येक संकटातून तारून नेतो असे मला वाटते. माझ्याकडे एक बैल जोडी देखील आहे. मी बैलपोळ्याच्या दिवशी माझ्या बैलांना शेती कामापासून आराम देतो. मी आणि माझे इतर मित्र आम्ही नागपंचमी दिवशी शेतामध्ये कोणतेही काम करत नाही. आपल्या संस्कृतीने जे नियम शेतकऱ्यांसाठी घालून दिले आहेत त्या नियमांचे आम्ही पालन करतो कारण निसर्ग आपल्याला नेहमी काहीतरी शिकवत असतो असे मला वाटते.

एक शेतकरी म्हणून मी आपणा सर्वांना एवढेच सांगेन की आम्ही शेतकरी आपला घाम गाळून शेतात पीक पिकवत असतो. तुम्ही जेव्हा आमच्याकडून कोणतेही धान्य खरेदी करता तेव्हा त्याचा अनादर करू नका. अन्नाचा अपव्यय करू नका. अन्न म्हणजे साक्षात परब्रम्ह आहे असे आम्ही मानतो. जर तुम्हाला अन्न जास्त झाले असेल तर ते दान करत जा मात्र ते कचऱ्यात टाकून त्याचा अनादर करू नका. तुमच्यापेक्षा ज्याला त्या अन्नाची जास्त गरज आहे त्याच्या मुखी जर ते पडले तर तुम्हाला पुण्यच लाभते.

माझी सरकारला केवळ एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला शेतकरी म्हणजे गरीब माणूस असे समजून जे हप्ते देता त्या ऐवजी तुम्ही आमच्या पिकांना एक निश्चित भाव जाहीर करावा. सरकारने जर आमच्या पिकांना निश्चित भाव जाहीर केला तर त्यातून आम्हा शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे सोपे होईल . पिकांना योग्य भाव मिळाल्यास प्रत्येक शेतकऱ्याचे अर्थार्जन सुधारेल आणि सरकारला कोणत्या शेतकऱ्याला हप्ते देण्याची गरज भासणार नाही. शेवटी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे सरकारने देखील विसरून चालणार नाही. मी आता निरोप घेतो राम राम!

शेतकऱ्याची आत्मकथा या विषयावर दहा ओळींमध्ये निबंध

  1. होय, मीच बोलत आहे तुम्हा सर्वांसाठी जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेला मी एक शेतकरी बोलत आहे.
  2. मी सिताराम, माझ्याकडे एक एकर बागायती शेती आहे, यामध्ये मी विविध प्रकारच्या भाज्यांचे पीक घेतो.
  3. मी शेतीसोबतच जोडधंदा म्हणून पशुपालनाचा देखील व्यवसाय करत आहे.
  4. माझ्या शेतीच्या कामांमध्ये माझी बायको आणि माझी मुले मला सर्वतोपरी मदत करतात.
  5. माझ्या शेतामध्ये मी एका बाजूस एक शेततळे देखील तयार केले आहे जेणेकरून मला पाण्याची टंचाई भासत नाही.
  6. माझ्या शेतामध्ये मी मेथी, पालक , टोमॅटो, मिरच्या , गहू,ऊस आणि कांदा ही पिके घेतो
  7. बाजारामध्ये धान्य विक्रीस नेल्यानंतर मला कित्येकदा भाव कमी करण्यासाठी व्यापारी लोक त्रास देतात.
  8. जेव्हा गिऱ्हाईके कमी असतात तेव्हा मला अत्यंत कमी भावामध्ये माझा धान्यपाला व्यापाऱ्यांना विकावा लागतो.
  9. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी पिकांना बाजार भाव निश्चित करावा.
  10. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे कारण बाजारातील दलाल व्यापाऱ्यांमुळे आम्हा शेतकऱ्यांना पिकाचा योग्य मोबदला मिळत नाही.

शेतकऱ्याच्या आत्मकथेत कोणत्या अडचणी मांडल्या जातात?

शेतकरी निसर्गावर अवलंबून असतो. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि कमी उत्पन्न या अडचणी आत्मकथेत मांडल्या जातात.

शेतकऱ्याचे जीवन कठीण का असते?

दिवसरात्र मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. हवामान, बाजारभाव आणि कर्ज यामुळे त्याचे जीवन संघर्षमय होते.

शेतकऱ्याची आत्मकथा समाजाला काय संदेश देते?

शेतकऱ्याच्या कष्टांची जाणीव करून देणे, त्याचा सन्मान करणे आणि त्याच्या समस्यांकडे सहानुभूतीने पाहणे हा संदेश देते.

Leave a Comment