Dayalupanache Mahtva Nibandh Marathi : दयाळूपणा म्हणजे एखाद्या प्रसंगी एखाद्या मनुष्य, प्राणी, पक्षी अथवा कोणतीही सजीव घटक यांच्या विषयी निर्माण झालेली करुणा . आजच्या या कृत्रिम युगामध्ये जिथे मानवी भावभावना विलुप्त होत जात आहेत तिथे खरे तर दयाळू पणाची अत्यंत गरज आहे. आज आपण पाहतो की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण झालेली आहे.
विषमता आपल्याला शैक्षणिक स्तरावर आढळते. शैक्षणिक विषमतेमुळे पुढे सामाजिक विषमता वाढीला लागते. शैक्षणिक विषमतेचा दुर्गामी परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर होतो. परिणामी आर्थिक परिस्थितीतील विषमतेमुळे माणूस समाजामध्ये असलेल्या उच्चनीच या विभागांमध्ये विभागला जातो.
जेव्हा आपल्याला एखादा भिकारी भीक मागत असताना दिसतो तेव्हा आपल्याला त्याच्याविषयी करुणा उत्पन्न होते आणि आपण त्याचे पोट भरण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या पैशांमधून अथवा अन्नामधून त्याला मदत करतो आहे दयाळूपणाचे उदाहरण आहे. ही करुणा तात्पुरत्या स्वरूपाची असते कारण त्यानंतर पुढे दुसऱ्या दिवशी तो भिकारी दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा भीक मागत राहतोच. अशावेळी जर आपण त्या व्यक्तीला उत्पन्नाचे स्त्रोत देऊ शकलो आणि त्या व्यक्तीने याचा वापर करू स्वतःचे अर्थार्जन सुरू केले तर त्या व्यक्तीला पुन्हा कधीच भीक मागण्याची गरज पडणार नाही. अशा व्यक्तींना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून देणे हा माझ्यामते सर्वात योग्य निर्णय आहे आणि असे करणाऱ्या व्यक्तीला दयाळू म्हटले गेले पाहिजे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांची एक कविता फार प्रसिद्ध आहे.
“देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हातच घ्यावे”
या कवितेतून विंदा करंदीकर असे सांगू इच्छितात की जेव्हा एखादा व्यक्ती देत असतो तेव्हा घेणाऱ्याने त्याची जी देण्याची कुवत आहे ती स्वतःमध्ये देखील आत्मसात करून घ्यावी आणि आपल्यापेक्षा जास्त जो गरजवंत आहे त्याला आपल्या परीने मदत देखील करावी.
तुम्ही म्हणाल हा तर दानशूरपणा झाला यात दयाळूपणा कुठे आहे?? खरे तर दानशूरपणा अंगी असल्याशिवाय माणूस दयाळू होऊ शकत नाही. भले दयाळू माणसाची देण्याची कुवत कमी असेल मात्र त्याला इतरांविषयी सहानुभूती वाटते हे देखील थोडके नाही.
आज कितीतरी अब्जाधीश असलेले लोक जसे की बिल गेट्स, अझीम प्रेमजी आपल्या संपत्तीतील काही भाग हा जनतेच्या तसेच देशाच्या कल्याणासाठी देतात यामागे त्यांचा दानशूरपणा आहेच पण त्याचबरोबर त्यांना समाजाबद्दल असलेली माया आणि करुणा आहे.
आपण कधी कधी रस्त्याने चालत जात असताना एखादा अंध व्यक्ती रस्ता पार करताना दिसत असेल तर त्याला आवर्जून रस्ता पार करण्यासाठी मदत करणे हे देखील दयाळूपणाचे उत्तम उदाहरण आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा सर्वत्र पाण्याचा तुटवडा असतो अशावेळी पशुपक्षांसाठी पाण्याचे पाणवठे तयार करणे आणि त्यामध्ये पाणी ठेवणे यामधून प्राणी मात्रांविषयी असलेली भूतदया दिसून येते.
आपल्याला जर कोणते वृद्ध व्यक्ती अडचणीत दिसले तर त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे म्हणजे खरा दयाळूपणा आहे असे मी मानते कारण वृद्ध व्यक्ती असो अथवा कोणीही असो प्रत्येकामध्ये परमेश्वराचा वास असतो असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते.
एखाद्या व्यक्तीची प्रेमाने विचारपूस करून त्याच्यासाठी आपण काही काम केले तर असा व्यक्ती आपल्याला कधीच विसरत नाही कारण संकट काळात आपण त्याला मदत केलेली असते आणि तो व्यक्ती त्याबद्दल कृतज्ञ असतो.
दयाळूपणा जर आपल्या अंगी असेल तर आपण पुण्याचे गाठोडे सोबत घेऊन फिरतो असे मला वाटते.
आपण सर्वांनीच सर्व प्राणीमात्रांविषयी मनामध्ये करुणा भाव ठेवून आचरण केले पाहिजे आणि दयाळू पणाचा हा गुण अबाधित ठेवला पाहिजे कारण तीच माणूस असण्याची खरी लक्षणे आहेत.
दयाळूपणाचे महत्त्व या विषयावर दहा ओळींमध्ये निबंध
- देवाने जेव्हा माणसाला माणूस म्हणून घडवले तेव्हा त्याला दयाळूपणाचा अंगीभूत गुण दिलेला आहे.
- माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळीकडे हुकूमत गाजवलेली आहे मात्र तरीही बुद्धीपेक्षा श्रेष्ठ ठरते ती माणसांमधील माणुसकी.
- जर तुमच्याकडे अमाप पैसा असेल पण तुम्हाला तो इतरांना देऊन त्यांचे दुःख कमी करावे असे वाटत नसेल तर त्या पैशांचा काही देखील उपयोग नाही.
- आपल्या समाजात अनेक दानशूर लोक अस्तित्वात आहेत जे आपल्या कमाईचा काही हिस्सा हा समाजाच्या हितासाठी वापरतात.
- दानशूर व्यक्तींच्या अंगी इतरांविषयी सहानुभूती तसेच करुणाभाव असतो.
- आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण देखील सर्वांशी दयाळूपणे वागले पाहिजे.
- आपली हिंदू संस्कृती ही इतरांविषयी करुणा,प्रेम आणि शांतीचा संदेश देते.
- एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची आपल्यापेक्षा जास्त गरज असेल तर ती त्या व्यक्तीला आपण दिली पाहिजे.
- समाजात जेव्हा आपण उच्च उत्पन्न असलेल्या गटामध्ये गणले जातो तेव्हा आपल्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना आपण मदत केली पाहिजे.
- दयाळूपणे वागल्याने आपल्याला इतरांचे आशीर्वाद तर लाभतात पण त्याचबरोबर समाजाची देखील यातून उन्नती होत असते.
दयाळूपणा म्हणजे नेमके काय?
दयाळूपणा म्हणजे इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांना मदत करण्याची भावना. कोणत्याही अपेक्षेविना प्रेम, सहानुभूती आणि करुणा दाखवणे म्हणजे दयाळूपणा होय.
दयाळूपणाचे समाजात काय महत्त्व आहे?
दयाळूपणामुळे समाजात सलोखा, विश्वास आणि माणुसकी टिकून राहते. लोक एकमेकांना मदत करतात, त्यामुळे सामाजिक नाती मजबूत होतात आणि समाज अधिक शांत व सुसंस्कृत बनतो.
दयाळूपणा आपण दैनंदिन जीवनात कसा अंगीकारू शकतो?
गरजू व्यक्तीला मदत करणे, प्रेमाने बोलणे, चूक करणाऱ्याला समजून घेणे, प्राणी-पक्ष्यांबद्दल करुणा ठेवणे अशा छोट्या कृतींतून आपण दैनंदिन जीवनात दयाळूपणा अंगीकारू शकतो.